अलीगढ, 09 मे : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) अलीगढ जिल्ह्यात अलीगढ मुस्लीम विद्यापीठात (Aligarh Muslim University) कोरोना विषाणूच्या संसर्गाचा अक्षरशः कहर झालेला पाहायला मिळत आहे. केवळ 18 दिवसांत एएमयूच्या 17 कार्यरत प्राध्यापकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. शुक्रवारी एएमयूच्या लॉ फैकल्टीचे डीन प्रोफेसर शकील समदानी यांच्या निधनानंतर एएमयूमधील परिस्थितीविषयी चिंता अधिकच वाढली आहे. एएमयूच्या लॉ फैकल्टीच्या डीनला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर अलीगढच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू होते.
अलीगढ मुस्लीम विद्यापीठात 20 एप्रिलला कोरोना संक्रमणामुळे पहिला मृत्यू झाला. तेव्हा माजी प्रॉक्टर आणि डीन स्टुडंट वेलफेअरचे प्राध्यापक जमशेद अली सिद्दीकी यांचे निधन झाले होते. आतापर्यंत मृत्यू झालेले हे सर्व प्राध्यापक अलीगढ शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते.
समदानी सामाजिक विषयांसाठी सक्रिय होते
प्राध्यापक शकील समदानी हे अखिल भारतीय मुस्लीम वैयक्तिक कायदा मंडळाच्या कार्यकारी समितीचे सदस्य होते. 10 दिवसांपूर्वी त्यांना अलीगढ विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड वॉर्डमध्ये दाखल केले होते. असे सांगितले जात आहे की, समदानी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने ग्रस्त होते. त्यांच्यातील मधुमेहाचे संतुलन अचानक बिघडल्याने त्यांचे निधन झाले. विधी विद्याशाखेचे डीन प्राध्यापक शकील समदानी हे सामाजिक विषयांसंबंधित कार्यात सक्रिय होते.
हे वाचा - गोशाळेत उघडलं कोरोना सेंटर, रुग्णांना दिली जातायंत दूध-गोमुत्रापासून बनलेली औषधं
याआधी शुक्रवारी वैद्यकीय विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक शादाब अहमद खान (वय 58 वर्षे) आणि संगणक विभागाचे प्राध्यापक रफिकुल जमान खान (वय 55 वर्षे) यांचा मृत्यू झाला होता. तर, कुलगुरू मन्सूर यांचे भाऊ उमर फारूक यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. ते विद्यापीठ न्यायालयाचे माजी सदस्य आणि मोहम्मदन शैक्षणिक परिषदेचे सदस्य होते. सध्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड वॉर्डात प्राध्यापकांसह 16 जणांवर उपचार सुरू आहेत.
या प्राध्यापकांचा झालाय मृत्यू
अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या शिक्षक संघटनेचे माजी सचिव प्रा. आफताब आलम यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी प्रा. शकील समदानी, माजी प्रा. जमशेद सिद्दीकी, सुन्नी धर्मशास्त्र विभागाचे प्रा. एहसानउल्लाह फहद, उर्दू विभागाचे प्रा. मौलाना बख्श अन्सारी, पोस्ट हार्वेस्टिंग अभियांत्रिकी विभागाचे प्रा. मो. अली खान, राज्यशास्त्र विभागाचे प्रा. काझी, मोहम्मद जमशेद, मोलिजात विभाग अध्यक्ष प्रा. मो. युनूस सिद्दीकी, इलमुल अडाव्हिया विभागाचे अध्यक्ष गुफ्राम अहमद, मानसशास्त्र विभागाचे अध्यक्ष प्रा. साजिद अली खान, संगीतशास्त्र विभागाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान, महिला अभ्यास केंद्राचे डॉ. अजीज फैसल, युनिव्हर्सिटी पॉलिटेक्निकचे मोहम्मद सैयदुज्जमान, इतिहास विभागाचे सहायक प्राध्यापक जिबरेल, संस्कृत विभागाचे माजी अध्यक्ष प्रा. खालिद बिन युसूफ आणि इंग्रजी विभागाचे डॉ. मोहम्मद यूसुफ अन्सारी यांचा समावेश आहे.
हे वाचा - भारतात पत्नीनं गळफास घेतल्यानंतर जर्मनीत पतीनं उचललं टोकाचं पाऊल, 4 महिन्याच्या संसाराला गालबोट
10 निवृत्त प्राध्यापकांचेही निधन झाले
त्याचबरोबर आतापर्यंत 10 निवृत्त प्राध्यापकांचेही निधन झाले आहे. कानपूरमध्ये चार प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. प्रा. आफताब आलम म्हणाले की, विद्यापीठासाठी हा अत्यंत वाईट काळ आहे. विद्यापीठाशी संबंधित इतक्या लोकांचा पाठोपाठ मृत्यू याआधी कधी झाला नव्हता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aligarh, Corona spread, Corona updates, Corona virus in india, Coronavirus