जमशेदपूर, 13 जुलै : आपल्या देशामध्ये अनेक नावाजलेल्या शिक्षण संस्था आहेत. या शिक्षण संस्थांमधून कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतात. अशाच शिक्षण संस्थांमध्ये एक्सएलआरआय जमशेदपूर या संस्थेचा समावेश होतो. एक्सएलआरआय जमशेदपूरमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट पॅकेजमध्ये दरवर्षी सातत्यानं वाढ होत आहे. तीन वर्षांत संस्थेच्या सरासरी पॅकेजमध्ये सात लाख रुपयांची वाढ झाली आहे. यामुळेच नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (NIRF) या संस्थेला, सर्वोत्तम मॅनेजमेंट इन्स्टिट्युट म्हणून नवव्या क्रमांकाचं स्थान मिळालं आहे. या शिवाय, येथील सर्व विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून येथील 100 टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळत आहेत. ‘लाईव्ह हिंदुस्थान’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एक्सएलआरआयनं एनआयआरएफ क्रमवारीत सर्व विभागांत सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. संस्थेला एकूण क्रमवारीत 70.75 गुण मिळाले आहेत. एनआयआरएफनं जाहीर केलेल्या आकडेवारीत अशी माहिती देण्यात आली आहे की, 2023 मध्ये एक्सएलआरआयला पाच श्रेणींमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. यापैकी ग्रॅज्युएशन रिझल्ट श्रेणीमध्ये संस्थेनं सर्वाधिक गुण मिळवले आहेत. संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं यश आणि त्यांना मिळालेल्या रोजगाराच्या संधींच्या आधारे त्याची गणना केली जाते.
या संस्थेतील, 2020-21 या शैक्षणिक वर्षात 356 विद्यार्थ्यांपैकी 351 विद्यार्थ्यांना (सरासरी पॅकेज 30 लाख), 2019-20 मध्ये 362 विद्यार्थ्यांपैकी 358 विद्यार्थ्यांना (सरासरी पॅकेज 23 लाख) आणि 2018-19 मध्ये 363 विद्यार्थ्यांपैकी 359 विद्यार्थ्यांना (सरासरी पॅकेज 23 लाख) प्लेसमेंट मिळाली आहे. यामुळे संस्थेला जीओ श्रेणीमध्ये 100 पैकी 98.07 गुण मिळाले आहेत. टीचिंग लर्निंग अँड रिसर्च श्रेणीत संस्थेला 87.55 गुण मिळाले आहेत. तर, आउटरीच अँड इनक्लुझिव्हिटी म्हणजेच संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांच्या नोंदणी श्रेणीत 67.97 गुण मिळाले आहेत. लोकांच्या मनातील स्थानाबाबत (लोकप्रियता) एक्सएलआरआयला 50.13 गुण मिळाले आहेत. रिसर्च आणि प्रोफेशनल प्रॅक्टिसेसमध्ये एक्सएलआरआयला सर्वात कमी गुण मिळाले आहेत. या श्रेणीत संस्थेला 100 पैकी केवळ 43.56 गुण मिळाले आहेत. त्यामुळे, मागील वर्षांच्या तुलनेत एका स्थानानं संस्था खाली, म्हणजेच नवव्या क्रमांकावर आहे. एक्सएलआरआय म्हणजेच झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट ही झारखंडमधील जमशेदपूर येथे सोसायटी ऑफ जीझसद्वारे चालवली जाणारी खासगी शैक्षणिक संस्था आहे. स्टील सिटी जमशेदपूरमध्ये 1949 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. भारतातील सर्वांत जुनं बिझनेस स्कूल असा या संस्थेचा लौकिक आहे.