मुंबई, 17 जानेवारी : आजच्या जीवनशैलीत माणसाच्या मनावर फक्त कामाचा ताण नसतो तर, त्याला इतरही कितीतरी समस्यांनी घेरलेलं असतं. त्याचा परिणाम त्या-त्या लोकांच्या कामावरही होतो, हे देखील खरं आहे. म्हणूनच जो आपल्या कार्य जीवनात आणि वैयक्तिक जीवनात सुसंवाद राखतो, त्यालाच एक यशस्वी व्यक्ती असं म्हटलं जातं. अशी व्यक्ती कामाच्या ओझ्यामुळं त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ देत नाही आणि वैयक्तिक आयुष्यातील घटनांचा त्याच्या कामावर परिणाम होऊ देत नाही. खरंतर आपल्या सगळ्यांकडेच दिवसाचे 24 तास असतात. हा वेळ कसा वापरायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. याचा आपल्या जीवनातील यशाशी खूप जवळचा (Tips to complete work on time) संबंध आहे.
सहसा तुम्ही पाहिलं असेल की अनेक लोक सुरू केलेलं काम वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत. तुम्ही त्या लोकांपैकी एक आहात का? जर या प्रश्नाचं उत्तर होय असं असेल, तर तुम्ही तुमची प्रॉडक्टिव्हिटी (उत्पादकता) वाढवण्यासाठी आणि जीवनात अधिक प्रगती करण्यासाठी या पद्धतींचा वापर करून पाहा.
परिपूर्णतेचा नियम पाळा
एकदा तुम्ही एखाद्या गोष्टीवर काम सुरू केल्यावर, तुम्ही ते नंतर करू म्हणून अर्धवट सोडण्याची सवय बदला. दुसर्या कशावर तरी काम सुरू करण्यापूर्वी शक्यतो हातात आधी असलेलं काम पूर्ण करा. जर तुम्ही या नियमाचं पालन केलंत तर, तुमच्या हातातील काम तुम्ही पूर्ण ऊर्जेसह कराल आणि त्या कामातील विलंब कमी होईल. उत्पादकता आणि यश वाढवण्यासाठी हे आवश्यक पाऊल आहे.
कामांची यादी तयार करा
तुम्हाला नोटबुक किंवा कॅलेंडरमध्ये किंवा तुमच्या मोबाईल फोनमध्ये पूर्ण करणं आवश्यक असलेल्या कामांची यादी बनवा. तुमचा मेंदू कामावर व्यवस्थितपणे केंद्रित ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. जेव्हा कामं लिहून ठेवली जातात, तेव्हा ती एक कृती-योजना बनतात आणि अवचेतन मन त्या कामांवर लक्ष केंद्रित करू लागतं. पण जर तुमचं काम फक्त तुमच्या मनात असेल आणि ते कुठंही लिहिलेलं नसेल, तर ते तुमच्या मनात आधीपासून असलेल्या किंवा नंतर चालू झालेल्या इतर शंभर विचारांमध्ये हरवून जाऊ शकतं.
वेळ निश्चित करा
तुम्ही जे काही काम कराल त्यासाठी वेळ ठरवून देण्याची पद्धत अवलंबणं अत्यंत आवश्यक आहे. उदा., एखादं काम साधारणपणे 45 मिनिटांत करता येत असतं. पण ते खूपच आरामात करत राहिल्यास त्याला दोन तास आणि त्याहूनही अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळं तुम्हाला पूर्ण करण्याची आवश्यकता असलेली कामं पूर्ण करण्यासाठी वेळ ठरवणं हा अधिक कार्यक्षम होण्याचा आणि वेळेत अधिक काम पूर्ण करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या यादीतील प्रत्येक कामासाठी कालमर्यादा ठेवता, तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला कामासाठी ठरवून दिलेल्या वेळेनुसार जुळवून घेण्याची शिस्त लावता.
छोटी-छोटी टार्गेट बनवा
एखादं मोठं काम पूर्ण करण्यासाठी, त्यास लहान-लहान तुकड्यांमध्ये विभाजित करा. असं केल्यानं ते पूर्ण करणं खूप सोपं होईल. असं केल्यानं कामाचा ताण आणि दबावही कमी होईल. जेव्हा ही छोटी कामं पूर्ण होतात, तेव्हा त्यामुळं तुमच्यामध्ये सफलतेची भावना तयार होते आणि ही भावना तुमची इतर कामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गावर राहण्यास प्रवृत्त करते.
हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात
पुढील दिवसाचे प्लॅनिंग करा
प्रत्येक दिवस संपल्यानंतर येणाऱ्या दिवसाची योजना किंवा त्या दिवशी करायच्या कामांची यादी तयार करा. दररोज सकाळी ही यादी वाचत जा. त्यानंतर प्राधान्यक्रमानुसार कामाला सुरुवात करा. पुढच्या दिवसाच्या कामाचं नियोजन केल्यानं तुम्हाला तुमचं मन वेळेपूर्वी सेट करता येतं आणि दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कामांवर लक्ष केंद्रित करता येतं.
तुमचं मन भरकटू देऊ नका
जर तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर वारंवार स्क्रोल करण्याची, मेल तपासण्याची किंवा मजकूर-संदेश वारंवार पाहण्याची सवय असेल, तर याच्यामुळं मन विचलित होत राहतं. याचा तुमच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ लागतो. तुम्हाला शक्य तितकं अधिक काम करत राहायचं असेल, तर तुम्हाला या डिजिटल माध्यमांमुळं विचलित होण्यापासून दूर राहावं लागेल. तुम्ही कामावर असताना, तुमचा फोन दूर ठेवा किंवा शक्य असल्यास दुसऱ्या खोलीत ठेवा. तुमचा फोन किंवा मेसेज तपासण्यासाठी एक विशिष्ट वेळ सेट करा. जोपर्यंत तुम्ही ठरवलेली कामं पूर्ण करत नाही, तोवर मोबाईल फोनमध्ये वेळ न घालवण्याचा नियम करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.