मुंबई, 1 मार्च : कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता आयसीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक (ICSE Boards Class X Examination Schedule) जाहीर केलं आहे. तसंच या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
आयसीएसई सोबतच सीआयएससीई बोर्डानेही दहावीच्या परीक्षांची तारीख जाहीर केली आहे. या परीक्षा 10 मे 2021 पासून सुरू होतील. आयसीएसई दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा पेन-पेपर पद्धतीत ॲाफलाईन होणार आहेत, असंही सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्रासह देशात कोरोना प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने अनेक ठिकाणी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अशा स्थितीतही विविध बोर्डाकडून दहावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. तसंच या परीक्षा ऑफलाईनच होतील, असंही सांगण्यात आलं आहे.
परीक्षेची तारीख घोषित झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात काहीशी चिंता निर्माण झाली आहे. कारण कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या ऑफलाईन परीक्षेबाबत मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रा बोर्डाकडूनही नुकतंच 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी या वेळापत्रकावर पालक, शिक्षण व विद्यार्थ्यांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. अखेर चर्चेनंतर नवीन वेळापत्रक ठरविण्यात आलं आहे, अशी माहिती शिक्षण बोर्डाकडून देण्यात आली.
नव्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र बोर्डाची 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान ठेवण्यात येणार आहे, तर दुसरीकडे 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होईल, असं सांगण्यात आलं आहे. या परीक्षांदरम्यान कोरोनाच्या नियमावलीचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 10th class, Exam timetable