पुणे, 14 जुलै : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश मिळवलं आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथील टेम्पो चालकाच्या मुलाने स्वयंअभ्यास करून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना मयूर पाटोळेने जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मोठं यश संपादित केलं असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. कसा झाला प्रवास? मयूरचे वडील मारोती पाटोळे टेम्पो चालक तर आई सुगंधा गृहिणी आहे. त्याने प्राणिशास्त्र विषयाची पदवी मिळवलेली आहे. त्याला लहानपणापासूनच वर्दीची आवड होती. बारावीला असताना एनडीएची परीक्षा दिली. त्यात दोन वेळा अपयश आले. त्यानंतर पोलिस भरतीच्या प्रयत्नांचा प्रवास सुरु केला. यात 2016 मध्ये चार गुणांनी तर 2017 मध्ये एका गुणाने अपयश आले. त्यानंतर लेखी परीक्षेची तयारी असूनही शारीरिक आजारपणामुळे माघार घ्यावी लागली. 2018 मध्ये अग्निशमन दलाच्या अधिकारीपदी निवड झाली. दिल्ली पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता. परंतु, पोटाच्या आजारामुळे त्याला जॉईन करता आले नाही.
त्यानंतर त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा, मुख्य शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीतसुद्धा यश आले. चांगल्या गुणांनी यश मिळाले, पण नशीब आडवे आले. हा निकालच राखून ठेवल्याने यश मिळवूनही भविष्य अधांतरी राहिले. पुढील तीन वर्षे अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या. वेगवेगळ्या पदांसाठी 25 स्पर्धा परीक्षा दिल्या. अपयश येत होते, पण जिद्द सोडली नाही. अखेर शासनाने 2020 च्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. कोचिंग क्लास लावला नाही मुयरने कुठल्या ही प्रकारचा कोचिंग क्लास लावला नाही. राजगुरुनगर नगर परिषदेतील स्व. बाळासाहेब आपटे स्मृती अभ्यासिका येथे स्वअध्ययन सुरू केले. अभ्यासिकेत तासनतास अभ्यास केला. या संघर्षाच्या काळात आई सुगंधा आणि वडील मारुती पाटोळे आणि कुटुंबाची तसेच अभ्यासिकेतील मित्र मंडळींची साथ त्याला मिळाली. कोणत्याही खासगी कोचिंग क्लासची मदत न घेता फक्त राजगुरुनगर नगरपरिषदेतील स्व. बाळासाहेब आपटे स्मृती अभ्यासिकेत स्वअध्ययन करीत यश मिळवले.
PSI Success Story : शेतकरी बापानं मोलमजुरी करून शिकवलं, लेकीनं जिद्दीनं PSI होऊन दाखवलं!
यश मिळतेच पण हवा फक्त संयम कोणत्याही प्रकारच्या आर्थिक, शारीरिक संकटांना न घाबरता, न खचता प्रयत्न केला पाहिजे. स्पर्धा परीक्षेचे क्षेत्र अवघड आहे. परंतु अशक्य नाही. यात यश मिळतेच पण हवा फक्त संयम, सातत्य, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी, असं मयूर पाटोळे सांगतो.