मुंबई, 9 सप्टेंबर : स्थानिक भाषेतून शिक्षण देण्याचे सरकारचे प्रयत्न आता सफल होताना दिसत आहेत. यंदाच्या NEET परीक्षेसाठी स्थानिक भाषेची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ (Increase In Number Of Students Preferring Regional Language) झाली आहे. ‘नीट’ अर्थात मेडिकल प्रवेशासाठी लागणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या निवड परीक्षेचे (National Eligibility Cum Entrance Test –UG 2022) निकाल काल (7 सप्टेंबर) जाहीर झाले. यंदा 18.7 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 1,37,492 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी स्थानिक भाषांची निवड केली. गेल्या वर्षी 1,20,616 विद्यार्थ्यांनी स्थानिक भाषेची निवड केली होती. त्या तुलनेत ही वाढ मोठी म्हणावी लागेल.
यंदा इंग्रजी भाषेतून ही परीक्षा देणाऱ्यांचा आकडा 14,76,024 इतका होता, तर हिंदी भाषेतून परीक्षा देणारे 2,58,827 इतके होते. ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना 13 भाषांपैकी एका भाषेची निवड करता येते. यात आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या भाषा असतात.
स्थानिक भाषेची निवड करणाऱ्या गेल्या 4 वर्षांतील विद्यार्थ्यांची संख्या
वर्ष विद्यार्थिसंख्या
2019- 1,34,550
2020- 1,29,763
2021- 1,20,616
2022- 1,37,492
इंग्रजी आणि हिंदी या भाषांव्यतिरिक्त यंदा सर्वाधिक विद्यार्थ्यांनी गुजराती भाषेची निवड केली आहे. यंदा जवळपास 49 हजार परीक्षार्थींनी गुजरातीतून, 42 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी बंगालीतून, तर 31 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी तमिळ भाषेतून परीक्षा दिली.
स्थानिक भाषांची निवड करणारे विद्यार्थी
स्थानिक भाषा विद्यार्थिसंख्या
हिंदी 2,58,827
आसामी 4063
बंगाली 42,663
गुजराती 49,638
कन्नड 1193
मराठी 2368
मल्याळम् 1510
ओडिया 822
पंजाबी 96
तमिळ 31,965
तेलुगू 1264
उर्दू 1910
यंदा 18,72,343 विद्यार्थ्यांनी ‘नीट’साठी नोंदणी केली होती. त्यापैकी 17,64,571 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यंदाच्या परीक्षेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांपेक्षा मुलींचा आकडा या वर्षी जास्त होता. यंदाची टॉपरही मुलगीच आहे. 4,29,160 विद्यार्थी, तर 5,63,902 विद्यार्थिनी यंदाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. मूळची हरियाणाची असलेल्या तनिष्कानं यंदा नीट परीक्षेत पहिला क्रमांत मिळवला आहे. ती राजस्थानमध्ये शिकत होती. ही परीक्षा 17 जुलै रोजी पार पडली, तर जवळपास 250 विद्यार्थ्यांसाठी 4 सप्टेंबरला पुन्हा परीक्षा घेण्यात आली. गेल्या वर्षी 15.44 लाख विद्यार्थ्यांनी 3858 केंद्रांवर ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 8.70 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा सुमारे अडीच लाख जास्त विद्यार्थ्यांनी ‘नीट’साठी नोंदणी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.