नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : गणित हा असा विषय आहे, ज्याबद्दल मुलांच्या मनात भीती असते. गणित विषय कठीण असल्यानं मुलांना आवडत नाही. या विषयाबद्दलची भीती इतकी असते की मुलं गणित विषय असलेल्या शाखेत प्रवेशसुद्धा घेत नाहीत. पण ही भीती मुलांच्या मनातून काढून टाकण्याचं खूप मोठं काम नीलकंठ भानू यांनी केलंय. तुम्ही नीलकंठ भानू यांचं नाव ऐकलं असेलच, 2020 मध्ये त्यांचं नाव खूप चर्चेत होतं. नीलकंठ भानू यांनी 2020 मध्ये मुलांची गणितात आवड वाढवण्यासाठी आणि त्यांना या विषयात मदत करण्याची त्यांचे स्टार्टअप Bhanzu लाँच केलं होतं. नीलकंठ यांनी माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाडच्या ‘मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यांच्या नावावर पाच वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि 50 लिम्का रेकॉर्ड्स आहेत. हैदराबादचे नीलकंठ भानू पूर्ण वेळ आकड्यांचा विचार करत असतात आणि आता ते जगातील सर्वात वेगवान ह्युमन कॅल्क्युलेटर आहेत. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया… वर्षभर होते अंथरुणाला खिळून नीलकंठ यांनी एक लहानपणीची दुर्घटना सांगितली. ते म्हणाले, ‘मी नियमित शाळेत जाणारा मुलगा होतो. पण वयाच्या पाचव्या वर्षी एका अपघातामुळे मला वर्षभर अंथरुणाला खिळून राहावं लागलं. डॉक्टरांनी माझ्या पालकांना सांगितलं होतं, की माझ्या पाहण्याच्या, ऐकण्याच्या आणि समजण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मग मी कोडी सोडवायला सुरुवात केली. स्वतःला व्यग्र ठेवण्यासाठी मी मेंटल मॅथ्स कॅल्क्युलेशन्स करू लागलो, हळूहळू मला ते आवडू लागलं.’ वाचा - Success Story: टोपल्या विकल्या, आई असूनही अनाथालयात राहिले अन् झाले IAS ‘माझ्या आई-वडिलांनी माझी आवड पाहून मला बुद्धिबळासाठी पाठवलं. त्यादरम्यान दोन अरिथमॅटिक चॅम्पियनशिप आयोजित केल्या जात होत्या, त्यात एकामध्ये मी भाग घेतला होता. यामध्ये मी तिसऱ्या क्रमांकावर आलो आणि अशा रीतीने मी चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत गेलो. मी सर्वांत फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटर होईन, असं मला आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं,’ असं नीलकंठ यांनी सांगितलं. अशी करायचे प्रॅक्टिस लहानपणी शाळेतून आल्यावर नीलकंठ सहा-सहा तास प्रॅक्टिस करायचे. पण चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर आणि रेकॉर्ड बनवल्यापासून ते दररोज इतकी फॉर्मल प्रॅक्टिस करत नाहीत. त्याऐवजी ते आता वेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस करतात. ते म्हणाले, “मी सतत संख्यांचा विचार करत असतो. मी मोठ्याने गाणी वाजवून प्रॅक्टिस करतो, त्यादरम्यान मी लोकांशी बोलतो, भेटतो आणि क्रिकेटही खेळतो. यामुळे आपला मेंदू एकाचवेळी अनेक गोष्टी करण्यासाठी ट्रेन होतो.”
नीलकंठ भानू 2020 साली यूकेमध्ये आयोजित ‘माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाड’ जिंकणारे पहिले आशियाई बनले. त्यानंतर त्याच वर्षी देशी आणि परदेशी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘भानझू’ लाँच केलं. या कंपनीचं व्हॅल्युएशन आता 10 कोटी डॉलर्स म्हणजेच 810 कोटी भारतीय रुपयांवर पोहोचलं आहे. Bhanzu च्या माध्यमातून त्यांना 30 हजारांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा विश्वास जिंकण्यात यश आलंय.