शक्ती सिंह, प्रतिनिधी कोटा, 2 जून : असं म्हणतात की, मेहनतीला कोणताही पर्याय नसतो. जे अगदी खरं आहे. मेहनत ही एक अशी चावी असते जी प्रत्येकाच्या नशिबाचा टाळा उघडू शकते. सध्या आपल्याला शालेय विद्यार्थ्यांची मेहनत पाहायला मिळतेय. सर्वच राज्यांमध्ये दहावी, बारावी बोर्डाचे निकाल जाहीर होत आहेत. त्यावरून कोणी अभ्यासात किती मेहनत केली हे दिसून येत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी घरची परिस्थिती हलाखीची असतानाही मेहनतीच्या जोरावर उत्तम गुण मिळवले आहेत. राजस्थानच्या कोटा शहरातील गोरा कुमारी शर्मा या विद्यार्थिनीनेही अनेक संकटांचा सामना करत कठीण परिस्थितीत आरबीएसई बोर्डात दहावीच्या परीक्षेत 89.67 टक्के मिळवले आहेत. कोटाच्या रामपुरा भागात राहणाऱ्या गोराच्या वडिलांची कोरोना लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली. अचानक नोकरी गेल्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला.
त्यानंतर गोराची आई मंजूदेवी या दुकान सांभाळून घरातील खर्च भागवू लागल्या. आपल्या 4 मुलांच्या शिक्षणाचा खर्चही त्याच करायच्या. वडिलांची नोकरी गेल्यानंतर गोराने खासगी शाळेतून दाखला काढून सरकारी शाळेत प्रवेश घेतला होता. मात्र, तिच्या कुटुंबावरील संकटं काही संपण्याचं नाव घेत नव्हती. मागील महिन्यात दुकानातून घरी येत असताना रस्त्यात गोराच्या आईचा अपघात झाला, या अपघातात त्यांचं निधन झालं. वडिलांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे आता घराची आणि स्वतःची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर आणि तिच्या ३ भाऊ-बहिणींवर आली होती. मात्र अशा परिस्थितीतही खचून न जाता गोराने दररोज 7 ते 8 तास मन लावून अभ्यास केला आणि दहावीत 89.67 टक्के मिळवले. गोराला भविष्यात डॉक्टर व्हायचं आहे. ती तिच्या भावंडांमध्ये सर्वात लहान आहे, परंतु तिला तिची परिस्थिती आणि नशीब पूर्णपणे पालटायचं आहे.