मुंबई, 28 ऑक्टोबर : मध्यप्रदेश सरकारने नुकताच वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदीतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता महाराष्ट्रातही अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मराठीतून वैद्यकीय अभ्यासक्रम बनविण्याची तयारी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आली. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील विविध तज्ज्ञांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. 2023 च्या शैक्षणिक वर्षांपासून वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होणार आहेत.
कोणत्या अभ्यासक्रमांचा समावेश -
यामध्ये एमबीबीएससह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेणे हे बंधनकारक नसून ऐच्छिक राहणार आहे.
राज्यातील सध्याची परिस्थिती काय -
राज्यात सध्याच्या परिस्थितीला एमबीबीएसचे शिक्षण देणारी 62 महाविद्यालये आहेत. त्यात 10,045 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये सरकार आणि महापालिकेची 27, खासगी 20, अभिमत विद्यापीठ 12 तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तीन वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.
हेही वाचा - Police Bharati 2022 : शिंदे सरकारची मेगा पोलीस भरती, 14 हजार 956 जागांच्या पोलीस भरतीची निघाली जाहिरात
समिती करणार मांडणी -
विशेष म्हणजे इंग्रजीतील पुस्तकांचे भाषांतर करताना कोणत्याही वैद्यकीय अभ्यासक्रमात फेरफार करण्यात येणार नाही. केवळ वैद्यकीय अभ्यासक्रमाची इंग्रजी पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी तीन स्तरावरील वैद्यकीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये समिती याची पाहणी आणि मांडणी करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Medical