मुंबई, 11 जानेवारी : लॉकडाऊन आणि वाढत्या कोरोनामुळे अनेक परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर काही परीक्षा तात्पुरत्या स्थगित कऱण्यात आल्या होता. CBSE बोर्डानं आपल्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या नंतर आता राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखा देखील प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आला होत्या. मात्र आता राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर झाली असून विद्यार्थ्यांकडे अगदी कमी दिवस उरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 14 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 27 मार्चला घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांकडे दोन महिन्यांचा अवधी उरला आहे. त्यामुळे या दोन महिन्यांत विद्यार्थ्यांनी कंबर कसून अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षांच्या तारखांची अद्यापही घोषणा करण्यात आली नाही मात्र साधारण ऑगस्ट महिन्यात मुख्य परीक्षा घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्द सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.त्यानंतर, ठाकरे सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मोठा निर्णय घेतला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते की परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला अपात्र ठरविण्यात येणार नाही. आता पूर्व परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून मुख्य परीक्षेची तारीख कधी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.