मुंबई, 28 सप्टेंबर : राज्यातील आरोग्य विभागाच्या (Health Department) अंतर्गत रिक्त पदांवर घेण्यात येणारी भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हॉल तिकीटांमध्ये असलेल्या घोळानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता या परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. परीक्षांच्या नवा तारखा जाहीर करताच आता नवी समस्या समोर आली आहे. ती म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची भरती परीक्षा (Health Department Recruitment exam) आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) एकाच दिवशी आल्या आहेत.
दोन्ही परीक्षा एकत्र आल्याने आता नवा घोळ निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं, 31 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभाग आणि (शिक्षक पात्रता परीक्षा) टीईटीची परीक्षा एकत्र आल्या आहेत. मी याबाबत वर्षा गायकवाड यांच्याशी बोललो आहे. मी त्यांना विनंती केली आहे की आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची आहे, त्यामुळे त्यांनी टीईटी परीक्षेच्या तारखेबाबत विचार करावा. मी याबाबत शिक्षण संचालकांशीही बोलणार आहे, अजून एक महिना आहे, यातून मार्ग काढला जाईल. विद्यार्थीचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल.
आरोग्य विभागाची परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबरला
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामार्फत घेतली जाणारी गट क आणि गट ड पदाची परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा आदल्या दिवशी करण्यात आली. ही घोषणा होण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी घरातून बाहेर पडले होते, काही विद्यार्थी पोहोचले होते तर काहीजण प्रवासात होते. आयत्या वेळी परीक्षा रद्द करण्याची घोषणा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. अनेकांच्या वेळेचं आणि पैशांचंही नुकसान झालं होतं. त्याबाबत दिलगिरी व्यक्त करत आता नवी तारीख जाहीर झाली आहे.
हॉल तिकीटांमध्ये घोळ झाल्यामुळे रद्द करण्यात आलेली महाराष्ट्र आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. पण, अखेर आता नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला घेतली जाणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
NYSA कंपनीचा घोळ
ही परीक्षा घेण्याचं काम सरकारनं न्यासा कंपनीला दिलं आहे. मात्र या कंपनीचा पूर्वइतिहास वादग्रस्त आहे. पंजाबमधील ढिसाळ कामगिरीबद्दल या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयानं या कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढलं. यापूर्वी अनेक घोळ घातलेल्या या कंपनीला महाराष्ट्र सरकारनं आरोग्य विभागाच्या परीक्षांचं काम दिलं होतं. शिवाय त्यातील गोंधळाबद्दल यापूर्वी कुठलीही कारवाई केली नव्हती. त्याचा नाहक ताप वारंवार विद्यार्थ्यांना सहन करावा लागला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Job, महाराष्ट्र