मुंबई, 18 जुलै: गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सर्वांचं लक्ष एका नवीन तंत्रज्ञानाकडे वळलं आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे ब्लॉकचेन. ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Blockchain Technology) हे वेगाने विकसित झालेलं, पुढच्या पिढीचं एक आश्वासक आणि क्रांतिकारक तंत्रज्ञान आहे. आपला व्यवसाय कशा प्रकारे काम करतो याची पूर्ण प्रक्रियाच यामुळे बदलली आहे. सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर हे तंत्रज्ञान अगदी गुगल डॉक्सप्रमाणे आहे असं आपण म्हणू शकतो; मात्र ते त्याहून कित्येक पटींनी प्रगत आणि गुंतागुंतीचं आहे. हे तंत्रज्ञान नेमके काय आहे, ते कसं काम (How does Blockchain work) करतं, ते इतकं लोकप्रिय का आहे (Why is Blockchain popular) अशा ब्लॉकचेनसंबंधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखामध्ये मिळतील. सोबतच भविष्यातल्या ब्लॉकचेनच्या व्याप्तीबद्दलही (Blockchain future scope) तुम्हाला यात माहिती मिळेल. ब्लॉकचेन तंत्रज्ञान काय आहे? ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे एक प्रकारचं डिजिटल लेजर तंत्रज्ञान (Digital Ledger Technology) आहे. यामध्ये माहिती आणि व्यवहारांचं रेकॉर्ड अशा प्रकारे ठेवलं जातं, की त्यामध्ये बदल करणं, ते हॅक करणं, डिलीट वा करप्ट करणं किंवा सिस्टीमची फसवणूक करणं अवघड होते. ब्लॉकचेनवर असणाऱ्या सर्व कम्प्युटर सिस्टीमच्या नेटवर्कवर हे व्यवहार कॉपी आणि वितरित केले जातात. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं, तर हे एक विकेंद्रित वितरण नेटवर्क (Decentralized distribution network) आहे, जे एका साखळीवरच्या ब्लॉक्सच्या स्वरूपात अनेक व्यवहारांची नोंद करतं. ब्लॉकचेनवर जेव्हा नवीन व्यवहार केला जातो, तेव्हा त्या साखळीतल्या प्रत्येक सहभागी व्यक्तीच्या लेजरवर त्याची माहिती जोडली जाते. या सर्व गोष्टी रिअल-टाइम अपडेट होत असल्यामुळे कोणतीही व्यक्ती यामध्ये बदल करू शकत नाही. यामुळेच ब्लॉकचेन व्यवहार खऱ्या अर्थाने पारदर्शक समजले जातात. कोणी यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्या व्यक्तीला संबंधित ब्लॉकचेनवरच्या प्रत्येक ब्लॉकमध्ये बदल करावा लागेल. हे व्यावहारिकदृष्ट्या किचकट आणि खरं तर अशक्य असं काम आहे. शिवाय, लेजरमधले व्यवहार हे मालकाच्या डिजिटल सहीने (Digital Sign) अधिकृत केले जातात. त्यामुळे ते अधिक प्रमाणित होतात. शिवाय, व्यवहारांमध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न केल्यास सिस्टीम ते लगेच ओळखू शकते. बिटकॉइन (Bitcoin) आणि इथेरियम (पर्यायी चलन) ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनं गेल्या काही वर्षांमध्ये भरपूर लोकप्रिय झाली आहेत. ब्लॉकचेन तंत्रज्ञान एवढं लोकप्रिय का आहे? ब्लॉकचेन तंत्रज्ञान लोकप्रिय होण्यामागे सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे त्याची पारदर्शकता आणि अपरिवर्तनीयता. ही एक विकेंद्रित पिअर-टू-पिअर नेटवर्क सिस्टीम आहे, जिचा विशिष्ट असा कोणी मालक नाही. इतर केंद्रीकृत, पारंपरिक व्यवहारांमध्ये ज्याप्रमाणे व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज असते, तशी इथे भासत नाही. हे तंत्रज्ञान वापरकर्त्यांच्या आणि डेव्हलपर्सच्या परस्पर सामंजस्यावर काम करतं आणि त्यामुळेच हे अधिक विश्वासार्ह (Blockchain is trustworthy) बनतं. पारंपारिक व्यवहार पद्धतींमध्ये दोन व्यक्तींमधल्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेहमीच एखाद्या मध्यस्थाची गरज पडते. पैशांच्या व्यवहारांबाबत तुमची बँक हे एक उत्तम उदाहरण आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला वा कुटुंबीयांना पैसे पाठवता, तेव्हा तुमची बँक या प्रक्रियेत सहभागी असते. तुमच्या सर्व व्यवहारांची नोंद ठेवून, त्यावर लक्ष ठेवण्याचं कामही बँक करते; मात्र हीच बँक यामध्ये छेडछाडही करू शकते, ज्यामुळे हे व्यवहार असुरक्षित होतात. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे हा मध्यस्थच गायब होतो. कारण हे एक एंड-टू-एंड तंत्रज्ञान आहे. शिवाय हे असं डिजिटल लेजर आहे, ज्यामधल्या रेकॉर्ड्ससोबत सहजपणे छेडछाड करणं शक्य नाही. सोबतच, ब्लॉकचेनमुळे व्यवहार प्रक्रिया (Blockchain is easier and faster) अधिक सुलभ आणि जलद होते. यामुळेच बिटकॉइन आणि फायनान्स, सप्लाय चेन, आरोग्य, उत्पादन या सेवांमधली ब्लॉकचेन उत्पादनं मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे फायदे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे असंख्य फायदे आहेत. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : अत्यंत सुरक्षित ब्लॉकचेन तंत्रज्ञान फसवणूक-मुक्त व्यवहारांसाठी डिजिटल स्वाक्षरीचा वापर करतं. त्यामुळे ते अगदी सुरक्षित होतं. शिवाय, कोणत्याही व्यक्तीने डेटामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केल्यास सर्वांना सूचना जाते. त्यामुळे हे तंत्रज्ञान अधिक विश्वासार्ह बनते. विकेंद्रित प्रणाली इतर पारंपरिक व्यवहार माध्यमांतून व्यवहार करताना त्याचं नियमन करणाऱ्या संस्थेची मान्यता आवश्यक असते. ब्लॉकचेनच्या माध्यमातून होणारे व्यवहार वापरकर्त्यांच्या परस्पर सहमतीतून होणाऱ्या पडताळणीने केले जातात. त्यामुळे तेथे कोणत्याही थर्ड-पार्टी मध्यस्थांची गरज भासत नाही. स्वयंचलित आणि जलद हे तंत्रज्ञान प्रोग्राम करता येतं आणि त्याचे आवश्यक निकष पूर्ण झाल्यानंतर विविध क्रिया स्वयंचलितपणे पार पाडू शकते. शिवाय मध्यस्थाची गरज नसल्यामुळे तिथले सर्व व्यवहार जलद गतीने आणि अगदी वेळेत होतात. ब्लॉकचेन डेव्हलपर्स कोण आहेत? ते बनण्यासाठी काय करावं? ब्लॉकचेन प्रोटोकॉल आणि आर्किटेक्चरसाठी विकेंद्रित अॅप्स तयार आणि ऑप्टिमाइज करणाऱ्या व्यक्ती म्हणजेच ब्लॉकचेन डेव्हलपर्स. ब्लॉकचेन प्रोटोकॉलवर आधारित अल्गोरिदम विकसित करणं, प्रोग्राम करणं आणि ऑप्टिमाइझ करणं आणि ब्लॉकचेन नोड्सवर चालविणं हा त्यांच्या कामाचा भाग आहे. सोबतच, त्यांना 3D मॉडेलिंग आणि 3D कंटेंट डेव्हलपिंगचं ज्ञानही असते. एका अर्थाने ब्लॉकचेन डेव्हलपर्स हे व्हिडिओ गेम डेव्हलपर्सप्रमाणेच काम करतात. अर्थात, ब्लॉकचेन डेव्हलपर्सनी तयार केलेली अॅप्स इतर अॅप्सच्या तुलनेत थोडी वेगळ्या प्रकारे काम करतात. उदाहरणार्थ, ते इंटरनेटच्या विकेंद्रित आवृत्तीवर काम करतात. ती आवृत्ती वेब 3.0 म्हणून ओळखली जाते. यामुळे ब्लॉकचेन डेव्हलपर्सची (Blockchain Developers) भूमिका थोडी किचकट आणि आव्हानात्मक होते. कारण त्यांचं कार्य सगळे वापरत असलेल्या सोप्या वेबच्या नाही, तर वेब 3.0 च्या मानकांशी संबंधित आहे. यामुळेच ब्लॉकचेन डेव्हलपर्सना विशेष कौशल्यांची गरज भासते. ब्लॉकचेन डेव्हलपर्स साधारणपणे दोन प्रकारचे असतात : कोअर ब्लॉकचेन डेव्हलपर्स : यांचा संबंध प्रामुख्याने ब्लॉकचेनच्या अगदी मुळाशी येतो. ब्लॉकचेन प्रोटोकॉल आणि नेटवर्क आर्किटेक्चरची रचना तयार करणं, विकसित करणं आणि त्यांचं मॉनिटरिंग करणं हा त्यांच्या कामाचा भाग असतो. सोबतच, Consensun Mechanisms आणि प्रोटोकॉलची देखरेख करणं, विविध फीचर्सची अंमलबजावणी करणं ही कामंदेखील कोअर ब्लॉकचेन डेव्हलपर्स (Core Blockchain Developers) करतात. ब्लॉकचेन सॉफ्टवेअर डेव्हलपर्स : यांचा संबंध ब्लॉकचेनच्या थोड्या वरच्या स्तरासोबत येतो. ब्लॉकचेन डेव्हलपर्सनी तयार केलेल्या अल्गोरिदमची अंमलबजावणी करणं आणि त्यांचा अॅप्लिकेशनमध्ये समावेश करणं, ब्लॉकचेन यंत्रणेवर चालणारे विकेंद्रित अनुप्रयोग विकसित करणं, एपीआय विकसित करणे, अॅपच्या फ्रंटएंड आणि बॅकएंडची रचना आणि विकास करणं इत्यादी गोष्टी करण्याची जबाबदारी ब्लॉकचेन सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची (Blockchain Software Developers) असते. ब्लॉकचेन तंत्रज्ञानात भरपूर लक्षणीय स्किल गॅप्स आहेत आणि त्यामुळेच ब्लॉकचेन डेव्हलपर्सना भरपूर मागणी आहे. याला कारण म्हणजे, ब्लॉकचेन डेव्हलपर होण्यासाठी या क्षेत्रातल्या व्यक्तीकडे भरपूर ज्ञान आणि कौशल्य असण्याची गरज आहे. शिवाय, बऱ्याच पूर्व-आवश्यकताही आहेत. ब्लॉकचेन डेव्हलपर होण्यासाठीचा संपूर्ण रोडमॅप (Roadmap to Become Blockchain Developer) पुढे दिला आहे : पहिला टप्पा आहे शिक्षण. ब्लॉकचेन डेव्हलपर होण्यासाठी कम्प्युटर सायन्स किंवा आयटीची पार्श्वभूमी असणं गरजेचं आहे. तसंच, इतर डेव्हलपर्सप्रमाणे C++, जावा, पायथन अशा बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेजेसची माहिती असणं गरजेचं आहे. सोबतच, डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम यांचीदेखील माहिती हवी. ब्लॉकचेन डेव्हलपर होण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीकडे उत्तम लॉजिकल ज्ञान आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स असणं गरजेचं आहे. पुढील टप्प्यामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा पाया आणि मूलभूत संकल्पनांचा समावेश आहे. यामध्ये आर्किटेक्चर आणि क्रिप्टोग्राफीचाही समावेश होतो. ब्लॉकचेनची मूलभूत तत्त्वं समजून घेतल्यानंतर आवश्यक डेव्हलपर टूल्स आणि ब्लॉकचेन प्रोग्रामिंग लँग्वेजेसची माहिती करून घेणं गरजेचं आहे. यामध्ये स्मार्ट काँट्रॅक्ट लिहिणं, कॉन्सेन्सस अल्गोरिदम तयार करणं आणि तंत्रज्ञानाचा प्रॅक्टिकल अनुभव मिळवणं याचा समावेश होतो. ब्लॉकचेन प्रोग्रामिंग शिकल्यानंतर पुढील टप्प्यात विकेंद्रित अॅप्लिकेशन तयार करणं आणि विकेंद्रित मोबाइल आणि वेब अॅप्स विकसित करण्यासाठी कार्यशाळांमध्ये सहभागी होणं याचा समावेश होतो. या टप्प्यात विविध फीचर्स अंमलात आणण्यासाठी वेगवेगळ्या फ्रेमवर्कचा विस्तृत वापर करणं याचाही समावेश होतो. ब्लॉकचेन सॉफ्टवेअर डेव्हलपर साधारणपणे हेच काम करतो. अर्थात, ब्लॉकचेन डेव्हलपर किंवा ब्लॉकचेन इंजिनीअर होण्यासाठी काही विशिष्ट कौशल्यांची गरज आहे. ब्लॉकचेन डेव्हलपर होण्यासाठी आवश्यक कौशल्यं ब्लॉकचेन डेव्हलपर होण्यासाठी (Skills required to become Blockchain Developer) ही कौशल्यं असणं गरजेचं आहे : डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम समजणं : ब्लॉकचेन हे क्रिप्टोग्राफीवर आधारित डेटा स्ट्रक्चर आहे आणि विविध ऑपरेशन्स अमलात आणण्यासाठी ते अल्गोरिदमवर अवलंबून असतं. त्यामुळेच या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदमची जाण असणं गरजेचं आहे. उच्चस्तरीय प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये प्रावीण्य : ब्लॉकचेन तंत्रज्ञानासाठी C++, C#, जावास्क्रिप्ट, पायथॉन, रूपी किंवा जावा अशा प्रोग्रामिंग लँग्वेजेस लोकप्रिय आणि गरजेच्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने यांपैकी एका किंवा अधिक लँग्वेजेसमध्ये पारंगत असणं गरजेचं आहे. क्रिप्टोग्राफीचं ज्ञान : माहितीचे कोणत्याही थर्ड-पार्टीपासून संरक्षण करणं क्रिप्टोग्राफीच्या माध्यमातून शक्य होतं. ब्लॉकचेन तंत्रज्ञान या क्रिप्टोग्राफीमुळेच सुरक्षित असतं. त्यामुळेच या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला क्रिप्टोग्राफीचं ज्ञान असणं अत्यावश्यक आहे. स्मार्ट काँट्रॅक्ट्स : स्मार्ट काँट्रॅक्ट हे स्वयं-अंमलबजावणी करणारे करार असतात. ब्लॉकचेनवरचे प्रोग्रामदेखील असेच स्वयंचलित असतात. ते स्वतःच दोन पक्षांमधल्या व्यवहारांवर लक्षव ठेवतात, मध्यस्थ म्हणून काम पाहतात आणि सेवांच्या देवाणघेवाणीस अनुमती देतात. यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला स्मार्ट काँट्रॅक्ट्सची माहिती असणं ही जमेची बाजू ठरते. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाबद्दल शिकून त्यामध्ये करिअर करण्यासाठी कित्येक सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध आहेत. हे क्षेत्र अगदी झपाट्याने विकसित होत असून, सध्या आणि भविष्यातही यात करिअरसाठी भरपूर वाव आहे. त्यामुळे कामाला लागा आणि ब्लॉकचेन डेव्हलपर होण्यासाठी स्वतःला तयार करा!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.