नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : नोकरीसाठी इंटरव्ह्युला जायचं असलं, की टेन्शन येतंच. कितीही अनुभवी व्यक्ती असली तरीही थोडी नर्व्हस होतेच. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मुलाखत नावाच्या टप्प्याला अनेकदा सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा लोक लेखी परीक्षा पास होतात, पण इंटरव्ह्युमध्ये फेल होतात. त्यामुळे नोकरीच्या मुलाखतीसाठी जाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबद्दल काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय. मुलाखतीआधी कंपनीबद्दल करा रिसर्च - मुलाखतीला जाण्याआधी संबंधित कंपनीबद्दल रिसर्च करून थोडी माहिती मिळवा. यामुळे तुम्हाला त्याची तुलना तुमच्या आधीच्या नोकरीशी करता येईल. तसंच मुलाखतीत प्रश्न विचारल्यास फ्युचर स्ट्रॅटर्जी आणि तुम्ही त्या जॉबसाठी का सुटेबल आहात, याबद्दल व्यवस्थित सांगता येईल. यामुळे इंटरव्ह्यु पॅनल आणि मॅनेजमेंटला तुम्ही संबंधित नोकरीबद्दल गंभीर आहात, याची शाश्वतीही मिळेल. ही प्रॅक्टिस करा - मुलाखतीला जाण्याआधी काही प्रश्न-उत्तरांची प्रॅक्टिस करा. याची तुम्हाला मदत होते. तसंच काही बेसिक प्रश्न ज्यामध्ये तुमच्याबद्दलची माहिती, शिक्षण काय आणि कुठून झालंय, इथे नोकरी का करायची आहे, पुढच्या पाच वर्षांत स्वतःला कुठे पाहायचंय, अशा प्रश्नांची प्रॅक्टिस केल्याचा फायदा होऊ शकतो. यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. हेही वाचा - यू-ट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून कमावता येतील लाखो रुपये; जाणून घ्या कसे होता येईल स्टार तुमच्या ड्रेसकडे द्या विशेष लक्ष - जॉब इंटरव्ह्युमध्ये फर्स्ट इंप्रेशन सर्वांत महत्त्वाचं असतं. तुम्ही फिजिकल किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून इंटरव्ह्यु देत असाल तरीही पॅनलचं लक्ष तुमच्या ड्रेसवर असतं. त्यामुळे मुलाखतीला जाताना व्यवस्थित फॉर्मल कपडे परिधान करा. काय घालायचं, याचा विचार आधीच करून ठेवा. शिवाय त्या कंपनीचा कोणता ड्रेस कोड असेल, तर त्याची माहिती मिळवा आणि त्यानुसार कपडे परिधान करून जा. कॉन्फिडंट राहा - नोकरी मिळवण्यासाठी फक्त शैक्षणिक पात्रता व स्किल्स आवश्यक नाहीत, तर मुलाखत घेणारा तुमचा आत्मविश्वासदेखील तपासतो. त्यामुळे मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं फॅक्ट्स व कॉन्फिडन्सने देणं आवश्यक असतं. म्हणून मुलाखतीत न घाबरता आत्मविश्वासाने उत्तरं द्या. बॉडी लँग्वेजवर लक्ष ठेवा - मुलाखतीच्या वेळी पॅनेलचं तुमच्या बॉडी लँग्वेजवर लक्ष असतं. तुम्ही त्या खोलीत प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत प्रत्येक छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवलं जातं. त्यामुळे बॉडी लँग्वेजची काळजी घ्या. आत जाण्याआधी पॅनलची परवानगी घ्या. बसण्यास सांगत नाहीत तोपर्यंत उभेच राहा, बसायला सांगितल्यानंतर धन्यवाद म्हणा. तसंच उत्तर देताना आवाज खूप मोठा किंवा कमी नसावा, बसण्याची पद्धत योग्य असावी. हातवारे करून प्रश्नांची उत्तरे देऊ नका. चेहऱ्यावर टेन्शन दिसणार नाही, याची काळजी घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.