मुंबई, 02 जानेवारी: आयएमएफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी मंदीबद्दल विधान करत सूचक इशारा दिला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश भाग यंदा मंदीच्या सावटाखाली असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिका, युरोपियन युनियन आणि चीनमधील मंदीमुळे 2023 हे वर्ष 2022 पेक्षा अधिक कठीण असेल, असं त्या म्हणाल्या. बीबीसीने रविवारी सीबीएस न्यूजच्या हवाल्याने याबद्दल वृत्त दिलंय. त्यानुसार, जॉर्जिव्हा म्हणाल्या, “जागतिक अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश भाग मंदीत असेल, असा आमचा अंदाज आहे. इतकंच नव्हे तर ज्या देशांमध्ये मंदी नाही, तिथल्याही कोट्यवधी लोकांना मंदी असल्यासारखं वाटेल.” या संदर्भात ‘टीव्ही 9 हिंदी’ने वृत्त दिलंय. जॉर्जिव्हा यांनी पुढे असा इशारा दिला की जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनची 2023 ची सुरुवात कठीण होईल. त्याच्या झिरो -कोविड पॉलिसीमुळे 2022 मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेची गती कमी झाली आहे. 40 वर्षांत पहिल्यांदाच, 2022 मध्ये चीनची वाढ जागतिक अर्थव्यवस्थेच्या सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या पूर्वी असं कधीच घडलं नव्हतं, असंही त्या म्हणाल्या. देशात बेरोजगारीचं भीषण वास्तव; गाठला गेल्या 16 महिन्यांतील उच्चांक; आकडेवारी बघून तुम्हालाही बसेल धक्का पुढील काही महिने चीनसाठी कठीण जाणार असून चीनच्या विकासावर त्याचा परिणाम नकारात्मक होईल. चीनच्या काही क्षेत्रांवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल आणि त्याचा जागतिक विकासावर नकारात्मक परिणाम होईल, असंही त्या म्हणाल्या. रशिया-युक्रेन युद्ध, वस्तूंच्या वाढत्या किमती, उच्च व्याजदर आणि चीनमधील कोविड-19 महामारीची नवी लाट यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव आला आहे, याच पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ऑक्टोबर 2022 मध्ये, युक्रेनमधील युद्ध तसंच वस्तूंच्या वाढत्या किमतींवर आळा घालण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या प्रयत्नांमुळे आयएमएफने 2023 साठीचा जागतिक आर्थिक वाढीचा दृष्टिकोन कमी केला होता. तेव्हापासून, चीनने आपली झिरो कोविड पॉलिसी समाप्त केली आहे. तसंच आपली अर्थव्यवस्था पुन्हा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. चीन सध्या कोरोनाच्या गंभीर लाटेचा सामना करत आहे, पण तरीही त्यांनी मंदीपासून अर्थव्यवस्थेचा बचाव करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. Maharashtra Megabharti: नवीन वर्ष, नव्या संधी; राज्यातील तरुणांसाठी ‘या’ विभागांमध्ये हजारो नोकऱ्या; संपूर्ण माहिती एका क्लिकवर चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे चीनमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे, त्याचा देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. रुग्णालये खचाखच भरली असून अनेकांना बेड्सदेखील मिळत नाहीये. अशा परिस्थितीत चीनला कोरोनाशी तर लढायचं आहेच, पण देशाची अर्थव्यवस्था कोलमडणार नाही, याकडेही लक्ष द्यावं लागणार आहे. चीन सध्या दोन्ही स्तरावर संकटाचा सामना करत आहे.