नवी दिल्ली, 12 एप्रिल : थोर भारतीय गणितज्ज्ञ आर्यभट यांनी इसवी सन 456 मध्ये जगाला शून्याच्या रुपात मोठी देणगी दिली. पूर्वीपासूनच गणिताच्या क्षेत्रामध्ये भारतीयांचं फार मोलाचं योगदान आहे. अशाच गणितज्ज्ञांमध्ये प्रख्यात भारतीय-अमेरिकन गणितज्ज्ञ आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ कल्यमपुडी राधाकृष्ण राव यांचा समावेश होतो. 102 वर्षांच्या सी. आर. राव यांच्या कार्याचा आता यथोचित सन्मान होणार आहे. राव यांनी 75 वर्षांपूर्वी सांख्यिकी क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना 2023 चा ‘इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक्स’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सांख्यिकी क्षेत्रात नोबेल पुरस्काराच्या समतुल्य मानला जातो. ‘टाइम्स नाउ’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जुलै महिन्यात कॅनडातील ओटावा येथे होणाऱ्या द्वैवार्षिक आंतरराष्ट्रीय सांख्यिकी संस्थेच्या ‘वर्ल्ड स्टॅटिस्टिक्स काँग्रेस’मध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. पुरस्कारासोबतच त्यांना 80 हजार अमेरिकन डॉलर्स रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक्स फाउंडेशननं एका निवेदनात म्हटलं आहे की, राव यांनी 75 वर्षांपूर्वी केलेल्या कामाचा अजूनही विज्ञानावर खोलवर परिणाम होत आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष गे नॅसन (Guy Nason) म्हणाले की, हा पुरस्कार देऊन आम्ही सी. आर. राव यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत आहोत. ज्यांनी त्यांच्या काळात केवळ सांख्यिकीय विचारात क्रांतीच केली नाही, तर विज्ञानबाबत मानवी आकलनावरही मोठा प्रभाव टाकला. कलकत्ता मॅथेमॅटिकल सोसायटीच्या बुलेटिनमध्ये 1945 मध्ये प्रकाशित झालेल्या उल्लेखनीय पेपरमध्ये, राव यांनी तीन मूलभूत सिद्धांत मांडले होते. ज्या सिद्धांतांमुळे आधुनिक सांख्यिकी क्षेत्राचा मार्ग मोकळा झाला आणि नवीन सांख्यिकीय पद्धती मिळाल्या. ज्यांचा आजही वापर होत आहे, असं फाउंडेशनने 1 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. The Miracle Man: स्वतः IAS तरीही सरकारची मदत नाही; बांधला 100 किमी लांबीचा रस्ता; कोण आहेत आर्मस्ट्राँग पाम राव यांचा जन्म सध्याच्या कर्नाटकातील हदगली येथे एका तेलुगू कुटुंबात झाला. त्यांनी आंध्र प्रदेशातील नुझिवेद, नंदीगम आणि विशाखापट्टणम येथे शिक्षण घेतलं. 1943 मध्ये आंध्र प्रदेश विद्यापीठातून गणितात एमएस्सी आणि कलकत्ता विद्यापीठातून सांख्यिकीमध्ये त्यांनी एमए केलं. त्यानंतर राव यांनी केंब्रिज विद्यापीठातील किंग्ज कॉलेजमधून पीएचडी आणि 1965 मध्ये केंब्रिजमधून डीएससी पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राव यांनी प्रथम इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युटमध्ये काम केलं आणि नंतर केंब्रिजमधील मानवशास्त्रीय संग्रहालयात काम केलं. त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्थेच्या संचालकपदासह अनेक पदं भूषवली आहेत. ते सध्या अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये ‘प्रोफेसर एमेरिट्स’ आणि बफेलो विद्यापीठात रिसर्च प्रोफेसर आहेत. राव यांना 1968 मध्ये भारत सरकारकडून पद्मभूषण आणि 2001 मध्ये पद्मविभूषण यासह अनेक सन्मानांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.