मुंबई, 18 मे: कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडून जाऊ नये, त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, यासाठी कंपन्या नवनवीन धोरणं आणत असतात. अमेरिकेतली मल्टिनॅशनल इन्व्हेस्टमेंट बँक असलेल्या गोल्डमन सॅक्सनं (Goldman Sachs) त्यांच्या अनुभवी आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी (Senior Staff) असंच एक खास नवं धोरण लागू केलं आहे. पुढील वर्षापासून वरिष्ठ कर्मचाऱ्यांना वर्षातून सक्तीची किमान तीन आठवडे रजा घ्यावी लागणार आहे. त्यापैकी किमान एक आठवडा सलग सुटी घ्यावी लागेल, असं या धोरणात म्हटलं आहे. ‘रेस्ट अँड रिचार्ज’ (Rest And Recharge) असं त्यांच्या या धोरणाचं नाव असून, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या व्यापातून आराम मिळून, ते ताजेतवाने होऊन अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतील, असा कंपनीचा यामागचा उद्देश आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीनं त्यांच्या जगभरातल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना पत्र पाठवलं आहे. नवीन वर्षात कंपनी या वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगारी सुट्ट्यांवर (Paid Leave) कोणतीही बंधनं घालणार नसल्याचं त्या पत्रात म्हटलं आहे. ज्युनिअर कर्मचाऱ्यांच्या सुट्टीबाबत मात्र पूर्वीप्रमाणेच नियम लागू असतील, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. “कंपनी म्हणून आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी त्यांना अनेक सोयीसुविधा द्याव्यात, यासाठी बांधील आहोत,” असं कंपनीनं आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे. नोकरी सोडताना चांगलं Resignation Letter लिहिणं महत्त्वाचं; ‘या’ टिप्स वाचाच ‘कर्मचाऱ्यांच्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची काळजी घेताना पार्टनर्स आणि मॅनेजिंग डायरेक्टर्स यांच्या अनुभवांवर आमचं लक्ष असतं. त्यामुळे पुढील वर्षीच्या ग्लोबल व्हेकेशन प्रोग्राममध्ये आम्ही काही बदल केले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना थोडा आराम मिळून त्यातून त्यांना नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास आहे,’ असं कंपनीनं त्यांच्या पत्रात नमूद केलं आहे. ‘चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल अँड डेव्हलपमेंट’च्या (CIPD) इन्क्लुजन अँड रिसोर्सिंग अॅडव्हायजर क्लेअर मॅकार्टनी यांनी गोल्डमन सॅक्सच्या या धोरणावर टीका होऊ शकते, असं मत व्यक्त केलं आहे. काही ठरावीक कर्मचाऱ्यांनाच या धोरणाचा लाभ मिळाला, तर इतर कर्मचाऱ्यांना कमी लेखल्यासारखं वाटू शकतं. या भेदभावामुळे त्या कर्मचाऱ्यांना संताप येऊ शकतो. त्याच वेळी, हव्या तेवढ्या पगारी सुट्ट्या दिल्यानं वरिष्ठ कर्मचाऱ्यांना काम करण्यास अधिक बळ मिळेल, असंही त्यांनी सांगितलं. तसंच, आपल्याकडे असलेले टॅलेंटेड कर्मचारी नोकरी सोडून जाऊ नयेत, यासाठीही केलेला हा प्रयत्न असू शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. या धोरणामुळे कंपनीतले कनिष्ठ कर्मचारी नाराज आहेत. त्यांच्याकडून या निर्णयाला विरोध होत आहे. गेल्या वर्षी गोल्डमनच्या ग्रॅज्युएट रिक्रुटमेंट स्कीममधून घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीत कामाचा अतिरिक्त बोजा पडत असल्याचं सांगितलं होतं. कंपनीतले हे ज्युनिअर कर्मचारी आठवड्याला 95 तास काम करतात, तर दररोज केवळ 5 तासच झोपू शकतात, असं कंपनीतल्या 13 कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत सर्वेक्षणात निदर्शनाला आल्याचं बीबीसीच्या वृत्तात म्हटलं आहे. नोकरीची मोठी संधी! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 641 जागांसाठी महाभरती; ही घ्या लिंक अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांसाठी पगार वाढविण्यासोबतच काही सोयीसुविधा देतात. कामाच्या वेळा कमी करणं हाही त्याचाच एक भाग असतो. गोल्डमन सॅक्सनंही आता कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं ठरवलं असून, त्यासाठी हे नवं धोरण आणल्याचं दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.