बांकुरा (पश्चिम बंगाल) इथल्या एका शेतकऱ्याचा मुलाचा चांद्रयान-3 मोहिमेत सहभाग आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या व्यक्तीने हे यश मिळवलं आहे. ‘तो या मोहिमेत सहभागी आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे,’ अशी प्रतिक्रिया या मुलाच्या वडिलांनी दिली आहे. कृष्णू नंदी असं या व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती इस्रोमध्ये इंजिनीअर आहे.
भारताने नुकतीच चंद्रावरची तिसरी मोहीम सुरू केली आहे. बांकुरातल्या पत्रसैरमधले कृष्णू नंदीही या मोहिमेत सहभागी आहेत. लहानपणापासूनच कृष्णू यांनी इंजिनीअर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं.
ते अभ्यासात हुशार होते. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि चिकाटीमुळे शेतकरी कुटुंबातल्या या मुलाचं स्वप्न साकार झालं. बांकुरा जिल्ह्यातल्या पत्रसैर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या डन्ना गावातील कृष्णू सध्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं एक पथक चंद्राच्या दिशेने चाललेल्या मून रोव्हरचे विविध तपशील आणि हालचालींवर लक्ष ठेवत आहे. कृष्णू नंदी यांचाही या पथकात समावेश आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी कृष्णू चांद्रयान 2 प्रकल्पात नव्हते.
दुर्दैवाने ती मोहीम अयशस्वी ठरली; मात्र कृष्णू यांना चांद्रयान-3 प्रकल्पात काम करण्याची संधी मिळाली.
पत्रसैरमधल्या बमीरा गुरुदास विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर, कृष्णू यांनी चटना इतल्या कमालपूर नेताजी हायस्कूलमधून विज्ञान विषयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं.
कोलकात्यातल्या आरसीसी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून त्यांनी बीटेक केलं. त्यानंतर जादवपूर विद्यापीठातून एमटेक पूर्ण केलं. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कृष्णू यांना इस्रोमध्ये नोकरी मिळाली. बांकुराची शान असलेल्या कृष्णू नंदी यांचे वडील तारापाद नंदी म्हणाले, की ‘कृष्णू लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. इंजिनीअर होण्याचं त्याचं स्वप्न होतं.
चांद्रयान -3 मोहिमेत त्याचा सहभाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे.’ जिद्द, चिकाटी आणि पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेले कठोर परिश्रम हे कृष्णू यांच्या यशाचं गमक आहे. या गुणांच्या जोरावर त्यांनी जीवनात मोठं यश मिळवलं आहे.