चंद्रपूर, 2 जुलै : विदर्भातील मुलाने थेट जगप्रसिद्ध चेव्हनिंग शिष्यवृत्ती (Chevening Scholarship) मिळवली आहे. ॲड. दीपक यादवराव चटप हा शेतकरी कुटुंबातील तरुण ब्रिटिश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लीडर’ (Chevening globar leader) ठरला आहे. त्याला तब्बल 45 लाखांची जगातील प्रतिष्ठित शिष्यवृत्ती मिळाली आहे. इतकेच नव्हे तर फक्त वयाच्या 24व्या वर्षी ही शिष्यवृत्ती मिळवणारा तो जगातील पहिला तरुण वकील ठरला आहे. ॲड. दीपक यादवराव चटप हा तरुण चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील रहिवासी आहे. तो शेतकरी कुटुंबातून येतो. मात्र, तरीसुद्धा त्याने या जगप्रसिद्ध शिष्यवृत्तीला गवसणी घातली. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ॲड. दीपक चटप याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गडचांदूर येथे झाले. यानंतर त्याने पुण्यातून एलएलबीचे शिक्षण घेतले. दोन पुस्तकेही प्रसिद्ध - शिक्षण घेताना मुंबई येथील अरबी समुद्रातील प्रदूषणाची याचिका त्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दाखल केली. तसेच शेतकरी आत्महत्येविषयी मानवाधिकार आयोगाकडे त्याने अनेक तक्रारी दिल्या. ‘लढण्याची वेळ आलीय’ हा काव्यसंग्रह आणि ‘कृषी कायदे : चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज’ ही दोन पुस्तके त्याने लिहिली. कोरो इंडिया फेलोशिपद्वारे संविधानिक हक्कांवर तो काम करीत आहेत. तर याआधी मागच्या वर्षी राजू केंद्रे या विदर्भातील तरुणाने जगप्रसिद्ध चेव्हनिंग शिष्यवृत्ती मिळवली होती. हेही वाचा - Career Alerts : सुरुवातीलाच 6 लाखांचं पॅकेज मिळतं; मुंबई विद्यापीठात 4 पैकी कुठलाही 1 कोर्स करा लंडनहून परतल्यावर काय करणार - लखमापूर ते लंडन हा प्रवास सोपा नव्हता. मात्र, कुटूंब आणि मित्रांनी खंबीर साथ दिली यामुळेच ब्रिटिश सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकलो. लंडनमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परत येऊन शेतकरी, आदिवासी व दुर्बल घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्य करणार, अशी प्रतिक्रिया ॲड. दीपक चटप या तरुणाने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.