मुंबई, 02 जानेवारी: प्रत्येक कंपनीच्या स्वतःच्या काही पॉलिसी असतात आणि ते त्यांच्या कर्मचार्यांसाठी वेगवेगळे नियम आणि कायदे बनवत असतात. यातील काही पॉलिसी कर्मचार्यांच्या हिताच्या असतात, तर काही वेळा अशा काही पॉलिसी असतात, ज्यामुळे कर्मचार्यांसाठी अनेक अडचणी निर्माण होतात. असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला जो आपल्या वरिष्ठांना न सांगता लंच ब्रेकवर गेला होता. लंच ब्रेकवर गेल्याने त्याला नोकरी गमवावी लागली होती. ही घटना 2018 साली ऑक्सफर्डमध्ये घडली होती. येथे बीएमडब्ल्यूमध्ये काम करणाऱ्या रेयान पार्किन्सन नावाच्या कर्मचाऱ्याने एक तासाचा लंच ब्रेक घेतला आणि बर्गर किंगमध्ये जाऊन बर्गर खाल्ला, त्यानंतर त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं. त्याची चूक अशी होती की पार्किन्सन्सने आपल्या वरिष्ठांना याबद्दल सांगितलं नव्हतं, त्याची शिक्षा म्हणून त्याची नोकरी गेली. आता न्यायालयाने या प्रकरणात कर्मचाऱ्याला मोठी रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत.
रेयान पार्किन्सन नेहमीप्रमाणे जेवायला बसला होता. त्याच्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना कबाब खायचे होते, पण त्याला बर्गर खायचा होता. एलबीसी न्यूजशी बोलताना त्याने सांगितले की, तो त्याच्या मित्रांना सांगून बर्गर किंगमध्ये त्याच्यासाठी बर्गर विकत घ्यायला गेला आणि नंतर गाडीत बसून तो बर्गर खाल्ला. त्यानंतर पार्किन्सन 2019 मध्येही 3 महिन्यांसाठी नोकरीवर आला होता, त्यानंतर त्याला काढून टाकण्यात आलं. त्याने त्याच्या चुकीच्या टर्मिनेशनविरोधात कोर्टात अपील केलं, त्यानंतर त्याला मे 2019 मध्ये पुन्हा नोकरी मिळाली आणि नोव्हेंबर 2019 मध्ये त्याला पुन्हा काढून टाकण्यात आलं. या वेळी ब्रेकमध्ये कारमधून सँडविच आणल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी रेयानने जीआय ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचं टर्मिनेशन चुकीचं असल्याचं तो म्हणाला. या कंपनीच्या माध्यमातून त्याला नोकरीवर घेण्यात आलं होतं. पण वर्णद्वेषामुळेच त्याच्याबाबत हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप त्याने केला होता. नंतर त्याने आरोप करत नुकसान भरपाई मागितली. न्यायाधीशांनी या खटल्यावर सुनावणी करताना म्हटलं की, असे अनेक लोक लंच ब्रेकच्या वेळी बाहेर जेवायला जातात, पण मग रेयानवर कारवाई का करण्यात आली? दरम्यान खटल्याच्या सुनावणीनंतर, न्यायालयाने रेयानला £16,916 म्हणजेच 17 लाखा रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. लंच ब्रेकमध्ये बाहेर जाणं चुकीचं नाही, अनेक कर्मचारी जेवायला बाहेर जातात, त्यामुळे रेयानवर कारवाई करणं योग्य नसल्याचं म्हणत कोर्टाने नुकसानभरपाईचे आदेश दिले.