मुंबई: जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे स्वतःला यश मिळालं तर इतरांचा अपमान करुन वेळोवेळी त्यांना मिळालेल्या यशाचा अहंकार दाखवतात. तर, दुसरे जे स्वतःसारखं यश इतरांना मिळावे, यासाठी इतरांना मदत करीत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल माहिती देणार आहोत, जो स्वतः गरीबीवर मात करीत यशस्वी झाला, आणि आज तो त्याच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. ही व्यक्ती एक व्यावसायिक असून त्याचे नाव मार्क नील्सन असे आहे. सध्या मार्क नील्सन नावाच्या एका व्यावसायिकाची जोरदार चर्चा होत आहे. कारण ते त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांसोबत ज्या पद्धतीनं वागतात, त्यासाठी त्यांना सर्वोत्तम बॉस म्हटलं जात आहे. नील्सन हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना केवळ महागड्या भेटवस्तू देत नाही, तर त्यांना श्रीमंत होण्यास देखील मदत करतात. मार्क नील्सन म्हणतात की, ‘मी स्वत: गरिबीतून श्रीमंत झालो आहे. त्यामुळे मला माझी संपत्ती आणखी वाढवण्याऐवजी लोकांना पैसे देऊन आनंदी ठेवायचं आहे.’ कर्मचाऱ्यांसाठी 4 कोटींचा हॉलिडे प्लॅन मिररच्या वृत्तानुसार, मार्क नील्सन यांनी त्यांच्या कर्मचार्यांसाठी 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च करून हॉलिडे प्लॅन बनवला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना कॅश हँडआउट्स देखील दिले जातील. इतकचं नाही, तर मार्क यांच्या कंपनीतील 50 कर्मचाऱ्यांना या वर्षी 82 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करून आइसलँडला पाठवण्यात आलं होतं. या कर्मचाऱ्यांची फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली होती. एवढचं नाही, तर खर्चासाठी त्यांना 61 लाख रुपये देखील दिले होते. नील्सन म्हणतात, ‘याद्वारे मी कर्मचाऱ्यांना प्रेरित करून त्यांना कंपनीच्या नवीन ध्येयाबद्दल माहिती देतो.’ कर्मचारी बदलण्यावर विश्वास नाही मार्क नील्सन म्हणतात की, ‘कर्मचार्यांनी त्यांच्या कंपनीत काम करताना 10 महिन्यात नोकरी सोडून जाऊ नये, निदान 10 वर्षे तरी काम करावे. यासाठी मला कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवायचा आहे.’ नील्सन विशेषतः अशा लोकांना प्रोत्साहन देतात, ज्यांना पैसे कमविण्याची संधी मिळाली नाही. कारण नील्सन स्वत: गरीबीतून श्रीमंत झाले आहेत. ते विमा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना प्रशिक्षण देतात. कारण त्यांनी स्वत: सेल्समध्ये काम करून हे यश मिळवलं आहे. कर्मचाऱ्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून हॉलिडे प्लॅन केल्यामुळे नील्सन यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कर्मचाऱ्यांसोबत अशा पद्धतीनं वागणाऱ्या बॉसचे अनेकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.