मुंबई, 20 मे- बँकेत नोकरी करावी हे अनेकांचं स्वप्न असतं. आता तुमच्या या स्वप्नपूर्तीसाठी एक नामी संधी समोर आलीय. भारतीय स्टेट बँक म्हणजेच एसबीआयमध्ये विशेषज्ञ संवर्ग अधिकारी या पदासाठी भरती निघाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना एसबीआयच्या विविध शाखांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच अधिक पगारासह चांगल्या सुविधाही मिळतील. या नोकरीसाठी पात्रता व अनुभवाचे निकष काय आहेत? कामाचे स्वरूप काय असणार? व सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा, या विषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ‘एबीपी न्यूज’ने याबाबत वृत्त दिलंय. तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार बँकेत विविध पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जून 2023 आहे. (हे वाचा: सीमा सुरक्षा दलामध्ये थेट कायदा अधिकारी होण्याची संधी; या उमेदवारांना विशेष प्राधान्य ) वयोमर्यादा व अर्जाची फी किती? उमेदवारांना अर्ज करताना 750 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. तर, भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 32 ते 42 वर्षांदरम्यान असावं, असंही अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलंय. 47 रिक्त पदे 47 विशेषज्ञ संवर्ग अधिकारी पदांच्या भरतीसाठी ही प्रक्रिया राबवली जातेय. अर्ज करणारा उमेदवार हा किमान 60 टक्के गुणांसह बी.ई, बी.टेक, एमसीए, एम.ई किंवा एम.टेक उत्तीर्ण असावा. निवडलेल्या उमेदवारांना 63,840 रुपये ते 78,230 रुपये प्रतिमहिना पगार दिला जाईल. दरम्यान, देशातील विविध बँकांमध्ये ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट तरुणांसाठी नोकऱ्या उपलब्ध असतात. बँकेतील नोकरीमध्ये चांगला पगार मिळतो, विविध सोयीसुविधा मिळतात, नोकरीची श्वाश्वती असते. त्यामुळे अनेक तरूण या क्षेत्राकडे वळत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियानंसुद्धा आता तरुणांना चांगली नोकरी मिळवण्याची संधी देऊ केलीय. नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होऊन दोन महिने होत आलेले असतानाच स्टेट बँक ऑफ इंडियानं कर्मचारी भरती सुरू केलीय. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वाची आणि मोठी बँक आहे. या बँकेत नोकरी करणे हे प्रतिष्ठेचं समजलं जातं. त्यामुळे आता इच्छुक व पात्र उमेदवारांना विशेषज्ञ संवर्ग अधिकारी पदाच्या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन या बँकेत नोकरी मिळण्याची उत्तम संधी असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.