मुंबई, 10 जून: केंद्रीय आयुष मंत्रालयाने आयुर्वेद विषयातल्या तज्ज्ञाची जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. ही नियुक्ती एका वर्षासाठी आणि कंत्राटी तत्त्वावर असेल, असं अधिकृत नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे. ‘स्टडीकॅफे’ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आयुर्वेद डोमेन एक्स्पर्ट या पदावर एका रिक्त जागेवर भरती केली जाणार आहे. ही नियुक्ती राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठात काँट्रॅक्ट बेसिसवर आणि एका वर्षासाठी असेल; मात्र उमेदवाराच्या कामगिरीनुसार नियुक्तीचा कालावधी वाढूही शकेल, असं नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे. इच्छुक उमेदवारांकडे आयुर्वेदामधली पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे. तसंच या संदर्भातला किमान पाच वर्षांचा अनुभवही त्यांना असायला हवा. निवड झालेल्या उमेदवाराला मासिक 75 हजार रुपये वेतन मिळेल. निवड झालेल्या उमेदवाराचं पोस्टिंग नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठात होणार आहे. आयुर्वेद आहार आणि पोषण या बाबींमधलं सखोल ज्ञान उमेदवारांना असणं आवश्यक आहे.
या पदासाठी इंटरव्ह्यूद्वारे निवड केली जाणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरू शकतात. 12 जून 2023 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत अर्ज पाठवण्यासाठी देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांचं वय 64 वर्षांपेक्षा जास्त नसावं, असंही अधिकृत नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे. ही तारीख आहे महत्त्वाची 19 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता उमेदवारांचे इंटरव्ह्यूज होणार असून, 11.30 वाजल्यानंतर कोणालाही इंटरव्ह्यूला येता येणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ, धन्वंतरी भवन, रोड नं. 66, पंजाबी बाग (वेस्ट), नवी दिल्ली - 11.0026 या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहेत. निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्तीही त्याच ठिकाणी केली जाणार आहे. अर्ज करण्याआधी नोटिफिकेशन बारकाईने वाचणे आवश्यक आहे. अधिकृत नोटिफिकेशन पुढील लिंकवर पाहू शकता : https://main.ayush.gov.in/vacancies/