मुंबई, 27 फेब्रुवारी : उद्योगपती आनंद महिंद्रा त्यांच्या उद्योगसमूहामुळे तर प्रसिद्ध आहेतच; पण त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ट्विट्ससाठीही ते ओळखले जातात. वेगवेगळ्या विषयांवरची आणि प्रेरक ट्विट्स ते करत असतात. दर सोमवारी ‘मंडे मोटिव्हेशन’ या शीर्षकाखाली ते एक ट्विट करतात. त्यांच्या अन्य ट्विट्सप्रमाणेच त्यांचं हे मंडे मोटिव्हेशन ट्विट म्हणजे त्यांच्या 10.4 दशलक्ष ट्विटर फॉलोअर्ससाठी प्रेरणेचं एक टॉनिकच असतं. या सोमवारचं (27 फेब्रुवारी 2023) ट्विटही त्याला अपवाद नाही. बुद्धिबळाच्या स्पर्धेसाठी रात्रभर प्रवास करून आलेल्या एका लहानग्याचा फोटो या वेळी आनंद महिंद्रांच्या ‘मंडे मोटिव्हेशन’चा मानकरी ठरला आहे. तमिळनाडूत होसूर इथे सुरू असलेल्या शालेय पातळीवरच्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी 1600 विद्यार्थी जमले होते. त्यापैकीच एका विद्यार्थ्याने आनंद महिद्रांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो मुलगा बुद्धिबळातला पुढचा मॅग्नस कार्लसन होऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. मॅग्नस कार्लसन हा सध्या बुद्धिबळातला जागतिक पातळीवरचा पहिल्या क्रमांकाचा खेळाडू आहे. वाचा - मुलांनी परीक्षेत टॉप करावं असं वाटतं ना? मग पालकांनो ‘या’ चुका कधीच करू नका आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये असं लिहिलं आहे - ‘होसूरमध्ये अलीकडेच शालेय पातळीवरची एक बुद्धिबळ स्पर्धा झाली. तिथे 1600 विद्यार्थी जमले होते. या फोटोत दिसणारा मुलगा रात्रभर दोन बस बदलून प्रवास करून डेपोपासून चालत आला आहे. आता तो सामना सुरू होण्यापूर्वी डुलकी घेत आहे. त्याला पुढचा मॅग्नस व्हायचं आहे. त्याच्यासारखी मुलं भारताचं भविष्य घडवत आहेत, भविष्याला आकार देत आहेत. तो माझं ‘मंडे मोटिव्हेशन’ आहे.’ असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.
A recent school chess competition in Hosur had 1600 kids from all over. This boy traveled all night by bus (changing buses twice) then walked from the depot. Took a nap before the match. Wants to be the next Magnus. Kids like him shape India’s future. He’s my #MondayMotivation pic.twitter.com/1WhlapiLCn
— anand mahindra (@anandmahindra) February 27, 2023
या फोटोत बुद्धिबळाचा पट मांडलेला दिसत आहे. त्याच्या दोन बाजूंना दोन खेळाडू आहेत. एका खुर्चीतला विद्यार्थी खुर्चीला मागे टेकून बसला आहे. तो शांत झोपलेला दिसत आहे. तो फोटो नुसता पाहिला तर त्यातून काही कळणार नाही; पण आनंद महिंद्रा यांनी सांगितलेली गोष्ट वाचून मग तो फोटो पाहिला, तर त्या मुलाचे कष्ट त्याच्या चेहऱ्यावर दिसतील. टुर्नामेंट सुरू होण्यापूर्वी तयारी करणारे अन्य खेळाडूही फोटोत दिसत आहेत. हे ट्विट व्हायरल झालं असून, साडेसहा लाखांहून अधिक व्ह्यूज सुमारे 12 तासांच्या आत मिळाले आहेत. हा फोटो 25 हजारांहून अधिक जणांनी लाइक केला असून, 1264 रिट्विट्स झाले आहेत.
‘भारतातल्या प्रत्येक बुद्धिबळ खेळाडू हे सहज समजू शकेल. माझ्या मुलामुळे मी गेली सात वर्षं हे पाहतो आहे. बुद्धिबळपटू मुलांचा आणि त्यांच्या आई-वडिलांचा संयम, समर्पण, संघर्ष मोठा असतो. अशा भरपूर टॅलेंटेड मुलांमध्ये अधिक वेगळी चमक दाखवणं सोपं काम नाही,’ अशी कमेंट एकाने केली आहे. अनेकांनी या फोटोतल्या, तसंच अन्य बुद्धिबळपटूंचं कौतुक केलं आहे, शुभेच्छा दिल्या आहेत. काही जणांनी त्यासाठी येणाऱ्या खर्चाचं गणितही मांडलं आहे.