मराठी बातम्या /बातम्या /ब्लॉग स्पेस /

BLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान?

BLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान?

पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन (mfn) हा दर्जा काढून टाकून पाकिस्तानला धक्का दिलाय. आता पाकिस्ताहून येणाऱ्या सामानावर लागणारी कस्टम ड्युटी 200 टक्क्यानं वाढलीय. याशिवाय फळं, चामडं आणि सीमेंट यासहित 10 उत्पादनांच्या आयातीवरही चांगलाच परिणाम होणार आहे.

पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन (mfn) हा दर्जा काढून टाकून पाकिस्तानला धक्का दिलाय. आता पाकिस्ताहून येणाऱ्या सामानावर लागणारी कस्टम ड्युटी 200 टक्क्यानं वाढलीय. याशिवाय फळं, चामडं आणि सीमेंट यासहित 10 उत्पादनांच्या आयातीवरही चांगलाच परिणाम होणार आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्ताननं भारताला धमकी द्यायला सुरुवात केली आहे. पण, स्वत: दहशतवाद्यांचा शिकार झालेला पाकिस्तान हा चीनच्या कह्यात गेला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यानंतर पाक लष्करानं देखील पत्रकार परिषद घेत पुलवामा हल्ल्यात हात नसल्याचं सांगत हात वर केले. विशेष म्हणजे पाकचा शत्रू हा भारत आहे याचा उल्लेख देखील लष्कारनं केला. तर, पुलवामा हल्ल्यासाठी भारतीय लष्कर जबाबदार असल्याचं म्हणत 'यह नया पाकिस्तान है' अशा शब्दात इम्रान खान यांची री ओढली. नया पाकिस्तानलं गौडबंगाल काय आहे हे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे पाकिस्तानचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार अरविंद व्यं. गोखले यांनी.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नया पाकिस्तानची घोषणा करूनही आता बरेच दिवस झाले आहेत. त्यांचा हा नया पाकिस्तान हा जुन्यापुराण्या अतिरेकी विचारांच्या पाकिस्तानपेक्षा काही वेगळा नाही हेही आता सिद्ध झाले आहे. पाकिस्तानमध्ये जन्मलेली जैश ए महमद ही संघटना पाकिस्तानच्या ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ची निर्मिती आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याची लष्कर ए तैयबा ही दहशतवादी संघटनाही आयएसआयच्याच पाठींब्यावर चालते. या दोन्ही संघटनांमध्ये सतत संपर्क असतो. पाकिस्तानच्या लष्कराने आणि इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ने दिलेल्या आश्रयाच्या आधारावरच अल कायद्याचा म्होरक्या ओसामा बिन लादेन हा अबोटाबादमध्ये राहात होता आणि आपल्याला त्याचा पत्ताच नव्हता, असा ढोंगीपणा तेव्हाच्या पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांनी केलेला होता. अबोटाबादमध्ये लष्करी छावणीनजिक असणाऱ्या एका घरात लपलेला लादेन म्हणजे अमेरिकेपासून दडवलेला लादेन होता. तसेच ते आता हाफिज सईद असो की मौलाना मसूद अजहर यांना पांघरूणाखाली घेत आहेत. या दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या संघटनांवर आयएसआय दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत असते. आयएसआयकडून भारतातल्या अनेक व्यक्तींनाही पोसण्यात येत असते. त्यात प्रामुख्याने हुर्रियत कॉन्फरन्सचे एक बंडखोर नेते सैयद अली शाह गिलानी आणि हुर्रियतचेच अन्य नेते यांचा समावेश होतो. गिलानी यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे आणि ते भारतीय प्राप्तीकर खात्याच्या सापळ्यात अनेकदा सापडले आहेत. दुसरे एक प्रमुख नेते मिरवाईज उमर फारूख तसेच दुख्तरन ए मिल्लतच्या (देशाच्या मुली) नेत्या असिया अंद्राबी यांचाही संशयास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये समावेश होतो. गिलानी हे काश्मीरमधल्या फुटिर चळवळींना मदत करतात आणि भारतात येणाऱ्या प्रत्येक पाकिस्तानी नेत्याच्या भेटीलाही आवर्जून जात असतात. आयएसआयचा हा पैसा गिलानी यांच्यापर्यंत बेनामी व्यवहारातून पोहोचतो असा दावा केला जातो. गुरुवारी झालेल्या फिदायिन हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४५ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाल्यानंतर एकाही हुर्रियत नेत्याने त्याबद्दल खेद व्यक्त केलेला नाही.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधल्या काही नेत्यांना जी संरक्षणव्यवस्था दिली जाते ती काढून घेण्याविषयी सांगितले आहे, मिरवाईज उमर फारूख आणि सैयद अली शाह गिलानी यांनाही असेच संरक्षण देण्यात येत असते. पाकिस्तान नेहमीच अशा हल्ल्यांविषयी ‘आपला त्याच्याशी काहीच संबंध नाही’ अशी भूमिका घेत असते, तशीच त्यांनी ती आता घेतलेली आहे. काश्मीरमध्ये एका काश्मिरी तरुणाने आत्मघात घडवला, त्याच्याशी आमचा संबंध कसा असू शकतो, हेच तुणतुणे त्यांनी लावलेले आहे. जैश ए महमद या संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अजहर हा भारताच्या ताब्यात होता, तेव्हा त्याला आयसी-८१४ या विमानातल्या १५५ प्रवाशांच्या बदल्यात सोडून देण्यात आलं होतं ही वस्तुस्थिती आहे. हा मसूद अजहर पाकिस्तानात बसून भारतात कारवाया करतो आणि ही संघटनाच मुळी आयएसआयची निर्मिती आहे. ही संघटना २००० मध्ये बनवण्यात आली. काश्मीरमध्ये जिहाद पसरवायच्या उद्देशाने तिला तयार करण्यात आले. १९९९ मध्ये मौलाना मसूद अजहर, मुश्ताक अहमद झरगर आणि अहमद उमर सईद शेख या तिघांना भारताने तेव्हा सोडून दिले होते. हे तिघेही हरकत उल मुजाहिदीनचे अतिरेकी होत. मसूद अजहरला सोडून दिल्यावर कंदाहरहून तो पाकिस्तानात भारतविरोधी वक्तव्य करत हिंडू लागला.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी निवडणुकीच्या प्रचार काळात या दहशतवादी संघटनांशी साटेलोटे केले होते. नवाझ शरीफ यांच्याविरोधात भूमिका बजावताना इम्रान खान यांनी पाकिस्तानातल्या सर्व पुराणवादी संघटनांशी जवळीक साधली होती. खुद्द पाकिस्तानात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचाही पंतप्रधान बनण्यापूर्वी इम्रान खानांनी उघड निषेध करायचे टाळले होते. पेशावरमध्ये एका लष्करी शाळेवर झालेल्या हल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांच्या मृत्यूनंतरच केवळ त्यांनी कडक भाषा वापरली. त्यावेळीही म्हणजे १६ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या त्या हल्ल्याबद्दल त्यांचा राग हल्ला करणाऱ्या तेहरिक ए तालिबान या दहशतवादी संघटनेपेक्षा अधिक तेव्हाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरूद्ध जास्त होता. पाकिस्तान पीपल्स पार्टी किंवा पाकिस्तान मुस्लिम लीग यांच्या सरकारांनी पाकिस्तानमधनं दहशतवाद संपवायचा तोंडदेखला प्रयत्न तरी केला, तेवढाही इम्रान खान यांनी केलेला नाही. त्यांच्या संपूर्ण प्रचार काळात भारताने जशा सावध अपेक्षा ठेवल्या होत्या त्याबरहुकूम ते सध्या वागत आहेत. जेव्हा ते निवडणुकीच्या रिंगणात होते तेव्हा त्यांनी भारताविषयी आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जेवढी म्हणून टीका करता येईल तेवढी केली होती. जेव्हा ते विजयी झाले आणि आता सत्ता आवाक्यात आहे असे त्यांना उमजले तेव्हा त्यांनी आपल्याला भारतात अधिक मित्र आहेत हे समजले.

इथपर्यंतच्या प्रवासात त्यांच्यालेखी मोदी हे एकेरीत होते. पंतप्रधानपदाची शपथ घेताना आपल्या काही क्रिकेटमित्रांना त्या सोहळ्यास पाचारण करावे असे त्यांना वाटले आणि त्यांनी सुनील गावसकर, नवज्योतसिंग सिद्धू आणि कपिलदेव यांना पाचारण केले. सिद्धू यांनी आपले दोन परिपक्व जुने सहकारी त्या यादीत आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्याशी संपर्क साधायला हवा होता. तो न साधताच त्यांनी निमंत्रण स्वीकारले आणि प्रत्यक्ष सोहळ्यात पाकिस्तानचे लष्करप्रमुख ख्वाजा कंवर बाज्वा यांना अलिंगन दिले. इम्रान खान यांनी आपल्या देशासमोर ‘नया पाकिस्तान’चे ध्येय ठेवले आणि त्यासाठी सरकारी साधेपणाच्या कृतीला प्राधान्य दिले. ते देताना त्यांनी आपण सदर ए पाकिस्तान या सरकारी निवासस्थानात न राहता साध्या निवासस्थानात राहणार आहोत, असे जाहीर केले. ते ज्या भागात राहायला गेले तो भाग हाच मुळात इस्लामाबादमधला लष्करी अधिकाऱ्यांच्या वसाहतीचा आहे. एका अर्थाने लष्कर आणि लष्कराची ‘आयएसआय’ ही गुप्तचर संघटना यांच्याशी कायमची जवळीक त्यांनी मान्य केली. त्यांनी प्रारंभीचे काही दिवस गप्प बसून राहण्यात शहाणपणा मानला, पण त्यांनी सिद्धूच्या त्या अलिंगनावर टीका करणाऱ्यांच्या वृत्तीवर टीका केली. जरा स्थिरस्थावर होताच त्यांनी १४ ऑगस्टला म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीदिनी मोदींना ‘प्रिय मोदीसाहेब’ असे संबोधून पत्र लिहिले. त्या पत्रात त्यांनी डिसेंबर २०१५ नंतर थांबलेली भारत-पाकिस्तान चर्चा सुरु होण्याची आवश्यकता आहे, असे म्हटले. त्यानंतर पाच दिवसांनी सौदी अरेबियाला जाऊन जेद्दाहमध्ये ते उमराहच्या धार्मिक विधीमध्ये सहभागी झाले. सौदी अरेबियामध्ये असताना त्यांची सौदी नेत्यांसमवेत अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या संबंधांवर चर्चा झाली असणार हे उघड आहे. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात आहे. चीनने ज्या अटींवर पाकिस्तानच्या गळ्यात ‘एक टापू, एक मार्ग’ (वन बेल्ट, वन रोड) ही योजना बांधली आहे ती पाकिस्तानला दिवाळखोरीकडे नेणारी ठरते आहे. आताच ग्वदार बंदरापर्यंतचा रस्ता आणि ग्वदार बंदराचा विकास यासाठी ७० अब्ज डॉलर एवढी मदत चीनकडून पाकिस्तानला देऊन झाली आहे. ती यथावकाश फेडायची असली तरी त्याबदल्यात चीनला पाकिस्तानकडून जे दिले जाणार आहे ते पाकिस्तानला खड्ड्यात घालणार आहे. ग्वदार बंदराचा जवळपास चाळीस चौरस किलोमीटरचा प्रदेश चीनच्या ताब्यात आंदण देण्यात आला आहे. त्याविरोधात बलोच नागरिक रोजच आकांत करत असतात. पण त्याला पाकिस्तानी लष्कर किंवा सरकार दाद देत नाहीत. आजवर असंख्य बलोच नागरिकांना या वादात आपले प्राण गमवावे लागले आहेत.

इम्रान खान यांनी लिहिलेल्या पत्राला भारताने सकारात्मक उत्तर दिले आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी तसेच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यात न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या निमित्ताने चर्चा होईल असे गेल्या वर्षी जाहीर केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा व्हायची शक्यता निर्माण झाली की, पाकिस्तानी जनतेकडून त्याचे स्वागतच केले जाते, पाकिस्तानी जनतेला अशी चर्चा होऊन वातावरण सुधारावे, असे वाटत असते, पण अशाच वेळी नेमके पाकिस्तानच्या ‘आयएसआय’च्या अंगात येते हा अनुभव आहे. ज्या ज्या वेळी चर्चा व्हायची असते त्या त्या वेळी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय एकदम जागे होतात आणि आपल्या कारवायांना वाढवतात. हे माहीत असूनही भारताकडून इम्रान खान यांच्या निमंत्रणाला होकार दिला गेला. ही घाई करायचे कारण नव्हते. कोणत्या तत्वांच्या आधारे ही चर्चा होईल आणि ती होईल तेव्हा सरहद्दीवर कोणते वातावरण राहील त्याबद्दलची हमी पाकिस्तानकडून घेऊन मगच आपण इम्रान खानांच्या निमंत्रणाला होकार द्यायला हवा होता. त्याचवेळी नेमके तिघा भारतीय पोलीसांना शोपियाँ भागामध्ये दहशतवाद्यांनी ठार केले आणि एका सीमा सुरक्षा रक्षकास पळवून नेऊन त्याच्या देहाचे तुकडे केले. ज्या व्यक्तीला भारताशी प्रामाणिक चर्चा करायची आहे, त्याने सरहद्दीवर शांतता राहील, हे लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करून निश्चिात करायला हवे होते, पण इम्रान खान झाले तरी ते उतावळेच आहेत. पाकिस्तानमधल्या वस्तुस्थितीवर पकड नसल्याने इम्रान खान तोंडघशी पडले. त्यातच पाकिस्तानने बुऱ्हान वाणीसह काही काश्मीरी दहशतवाद्याांच्या स्मृत्यर्थ टपाल तिकिटे काढून त्यांना गौरवले. आजपर्यंत असा आचरटपणा अन्य कोणत्याही सत्तेने केलेला नव्हता. गंमत अशी की, भारताने ही चर्चा रद्द केल्यानंतर इम्रान खान यांच्याप्रमाणेच शाह मेहमूद कुरेशी यांनी थयथयाट केला. कुरेशी यांनी तर त्याही पुढे जाऊन म्हटले की, टपाल तिकिटावरचे बुऱ्हान वाणी वगळता अन्य कोणी दहशतवादी नाही. याचाच अर्थ कुरेशी यांना बुऱ्हान वाणी दहशतवादी होता हे मान्य आहे असा होतो.

अखेर इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. या खेपेला त्यांना पाकिस्तानी लष्कराने आपले लाडके नेतृत्व म्हणून पुढे आणलेले होते. एकाच वेळी पाकिस्तानातले दहशतवादी आणि मुल्लामौलवी तसेच पाकिस्तानी लष्कर यांची मर्जी सांभाळण्याचे कौशल्य इम्रान यांच्या अंगी आहे आणि तेच त्यांच्या पक्षाच्या सत्तेवर येण्याला कारणीभूत ठरले आहे. या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने इम्रान यांनी झंझावाती प्रचार केला आणि प्रत्येक ठिकाणी नवाझ शरीफ यांच्यावर आणि त्यांचे बंधु पाकिस्तान मुस्लिम लीगचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांच्यावर जोरदार टीका केली. कधीतरी ते या दोघांचा एकेरीतून उल्लेख करत. त्यांनी मोदींचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही अनेकदा उल्लेख केला. मोदींचा मोडी असा उल्लेख करून ते बऱ्याचदा एकेरीवरच येत असतात. त्यांच्या प्रचार सभांमध्ये एक घोषणा दिली जात असे आणि ती म्हणजे ‘मोदी का यार, गद्दार है, गद्दार है’. हा उल्लेख अर्थातच नवाझ शरीफ यांच्यासाठी होता. शरीफ यांचे पैसे भारतातही आहेत, असे त्यांनी म्हटले होते, पण त्यांनी एकदाही पुरावा दिलेला नाही. नवाझ शरीफ यांची जागा तुरुंगातच आहे आणि ते पाकिस्तानात परतले तर त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असे त्यांनी शरीफ परतण्यापूर्वी सांगितले होते. आपली आजारी पत्नी कुलसुम यांना लंडनमध्ये पाहिल्यानंतर आणि त्यांच्या प्रकृतीला थोडा आराम मिळाल्यावर नवाझ शरीफ आणि त्यांची कन्या मरयम यांनी पाकिस्तानात परतायचा निर्णय घेतला. त्यांना राजकीय हौतात्म्य हवे होते, ते वेगळ्या स्वरुपात मिळाले. पाकिस्तानातल्या सर्वच राजकीय पक्षांनी गेल्या वर्षीच्या निवडणुकीत हस्तक्षेप झाल्याची तक्रार केली आहे. असे हे आरोप नेहमीच केले जातात.

आयएसआयचे माजी प्रमुख आसद दुराणी यांनी १९९० मध्ये पाकिस्तानातल्या निवडणुकीत लष्कराने खूपच मोठी भूमिका बजावली होती, असे आपल्या स्पाय क्रॉनिकल या पुस्तकात म्हटलेले आहे. हे पुस्तक त्यांनी रॉचे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांच्याबरोबर लिहिले आहे. तेव्हा लष्कराला पुन्हा एकदा बेनझिर भुट्टो नको होत्या, गेल्या वर्षी त्यांना नवाझ शरीफ नको होते. दुराणी यांच्या आरोपानंतर लष्कराने दुराणी यांना पाचारण करून खुलासाही विचारला होता. तेव्हा इम्रान हेच निवडून येतील, असे गेल्या निवडणुकीच्या वेळी सांगणारे निरीक्षकही आपले बोट लष्कराकडेच दाखवत होते. तेव्हा हा हस्तक्षेप लष्करी मदतीने निवडणूक आयोगाने केला आणि इम्रान यांना निवडून आणले ही वस्तुस्थिती आहे. असे हे इम्रान लष्कराच्या खिसात बसून अधिकच शिरजोर झालेले आहेत. स्वाभाविकच त्यांच्या कारभारात प्रत्येक बाबतीत लष्कराची ढवळाढवळ वाढलेली आहे. इम्रान यांची त्यांच्याविरोधात बोलण्याची हिंमत होत नाही आणि होणारही नाही. आजवर पाकिस्तानी वृत्तपत्रे काहीशी स्वतंत्र होती. त्यांना थ्रेट आणि वॉर्निंग या शब्दांमधला फरक चांगला कळायचा. आता त्यांनीही लष्कराची पट्टी डोळ्यांवर चढवलेली आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या कारवायांना ती दहशतवाद्यांची कारवाई आहे असे आजवर म्हणणारे आता त्यांना स्वातंत्र्यसैनिक संबोधू लागलेले आहेत. हाच आधीच्या काळातला आणि आताचा मोठा फरक आहे. इंडिया हेल्ड काश्मीर असे याही आदी ते म्हणत होते, पण तरीही ते त्यांच्या लेखी दहशतवादीच असायचे, पण आताचे हे चित्र वेगळेच काही सांगते आहे. थोडक्यात लष्कराने पाकिस्तानात प्रत्यक्षात सत्ता हाती घेतलेली नसली तरी अप्रत्यक्षरित्या लष्करच तिथे सत्ता उपभोगत आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर बदलेला पाकिस्तान आपल्याला आता अफगाणिस्तानसारखा प्रदेशही राबवायला मिळणार असल्याच्या तथाकथित आनंदात मश्गूल आहे. तालिबानांबरोबर पाकिस्तान आणि अमेरिका पडद्याामागे जी चर्चा करत आहेत, याचा अर्थ तोच आहे. तालिबानांच्या रुपाने पाकिस्तानला दहशतवाद्यांची मोठी फौज आणि त्यातही ती आत्मघाती पथकांच्या स्वरूपात वापरायला मिळणार आहे. एका पाहणीनुसार पाकिस्तानात सहा लाख आत्मघाती बॉम्ब तयार आहेत आणि त्यांना मिळणारी रसद ही हाफिज सईद किंवा मौलाना मसूद अजहरची आहेच, पण ती अधिक पाकिस्तानी लष्कराची आहे. काश्मीरमध्ये केरळ किंवा आंध्र प्रदेशातून जाऊन दोन दोन महिने राहणारे तबलिघी जमातीचे मौलवी तरूण वर्गाला फितूर बनवतात, त्यांचे ‘इनडॉक्ट्रिनेशन’ करतात, आणि त्यांना देशाविरूद्ध जिहादी बनवतात, असा एक आरोप केला जात आहे. त्यांना मिळणारा पैसा कोठून येतो तेही तपासायला हवे. त्याची कसून चौकशी व्हायची आवश्यकता आहे. तरच या पुढल्या काळात असे प्रकार वारंवार होणार नाहीत.

( अरविंद व्य. गोखले हे पत्रकार, लेखक आणि पाकिस्तान विषयक अभ्यासक आहेत. लेखकाचे विचार वैयक्तिक असून त्याच्याशी न्यूज18 सहमत असेलच असे नाही.)

First published:

Tags: Imran khan, Pakistan