रफीक मुल्ला, प्रतिनिधी,मुंबई
सतत नैतिकतेचा टेंभा मिरवणारी शिवसेना असे काहीतरी करेल यात शंका नव्हती..नेहमी 'बुंद से गयी वह हौद से आती' दावा करणारी शिवसेना असे बालिश प्रकार करत असते, नुकतंच शिवसेना रेडिओ जॉकी मलिष्का सारख्या उथळ बाईने दुसऱ्याच्या गाण्यावर रचलेल्या रिमिक्सवर तुटून पडली आणि तीही इतक्या जोरकस की स्वतःचेच दात तुटले, तरीही बोळके हसू घेऊन जगभर फिरत राहिली, थोडक्यात 'गिरे तो भी टांग उपर' ही सेनेची वृत्ती कितीही शोभा झाली तरी जात नाही आणि जाईल अशी शक्यता नाही..कारण 'आदत से मजबूर' है..!
भ्रष्टाचाराचे आरोप तेही तब्बल 50 हजार कोटीच्या घोटाळ्याचे आरोप झाले, आणि सर्व निर्णय योग्य म्हणणारे शिवसेनेचे चाणक्य उद्योगमंत्री सुभाष देसाईं अधिवेशनभर खुलासे करत सुटले आणि अधिवेशन संपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी 'वर्षा'वर गेले आणि मुख्यमंत्र्यांना भेटले, आता आपण राजीनामा द्यायला गेलो पण मुख्यमंत्र्यांनी तो नाकारला अशी माहिती स्वतः देसाई यांनीच वर्षा वरून बाहेर पडताच गेटवरून दिली. मोजक्या मिनिटाच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीत देसाई असे काय ते जोरकस आणि खऱ्या मानाने बोलले असतील बरे..?!, माझ्यावर आरोप झालेत तर राजीनामा घ्याच, किमान मी देतो आहे तो तुमच्याकडे घ्या, माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याची घोषणा तुम्ही केलेलीच आहे. माझ्या पक्ष प्रमुखांशी बोलून त्या चौकशीला वेग द्या, वेग एवढा की संपूर्ण चौकशी एखाद-दोन दिवसात होईल आणि मी निर्दोष असेन तर मला तो माझा राजीनामा परत द्या किंवा हा राजीनामा स्वीकारु नका, आणि जर दोषी सापडलो तर माझा राजीनामा तर आहेच तो स्वाभाविकपणे स्वीकारून टाका..सरकार ही अजस्त्र यंत्रणा आहे, देसाई यांच्यावर जे आरोप झालेत त्यात किती आणि काय सत्य आहे. हे शोधण्यास या यंत्रणेला काही तास लागतील किमान एक दिवस समजा, जर देसाईंना खरंच राजीनामा द्यायची इच्छा होती तर एकतर त्यांनी अधिवेशन काळात आरोप झाले तेव्हाच द्यायला पाहिजे होता, किमान अधिवेशन संपल्यावर राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली ती तरी तेव्हाच दाखवायला हवी होती, पण अधिवेशन संपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी हळूच वर्षावर ज्यायचे आणि राजीनामा देणार होतो मात्र मुख्यमंत्री नको म्हणाले असे म्हणत नैतिकता असल्याचा आव आणायचा हे म्हणजे 'सोनू, तुझा मायावर भरोसा नाय का?' हे विचारण्याची सोय राहू नये. एवढा अनादर त्या सोनूचा करायचा की तो नक्कीच नाही म्हणेल, शिवसेनेच्या या प्रकारात, सोनू नक्की म्हणेल की इतके बालिश नाटक पहिले त्यामुळे माझा तुझ्यावर अजिबात भरोसा राहिला नाही, आणि सोनुने फुकटचा आणि चुकीचा भरोसा ठेवायचा तरी किती..?
खरे तर देसाई यांचे विरोधातले प्रकरण अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सभागृहात आले, त्यानंतर पुढचा पूर्ण आठवडा ते गाजत राहिले, कामाचे किती तरी तास आणि तीन दिवस एकूण कामकाज वाया गेले, पण देसाई यांनी राजीनामा देण्याची इच्छा ना कुठे बोलून दाखवली, ना किमान पक्ष पातळीवर राजीनामा दिला, आता विरोधक समोर नाहीत, अधिवेशन नाही तर आपले एखादे दुसरे प्रकरण असले तरी ते बाहेर येणार नाही, ना आरोप होऊन सभागृहाचे कामकाज थांबणार आहे, ना समोर उत्तर द्यावे लागणार आहे, ना माध्यम या सर्व घडामोडींचे वृत्तांकन करणार आहे.
त्यामुळे अत्यंत नियोजनबद्धरित्या हे राजीनामा नाटक रचले गेले आणि वर्षावर काही मिनिटे चर्चा करून देसाई यांनी स्वतः ती माहिती माध्यमांना दिली, दुसऱ्या टोकाला पक्षाची भूमिका स्पष्ट करणारी स्क्रिप्ट तयार होती, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लगेच बोलते झाले, पक्षाचा कार्यक्रमच होता, राजीनामाबहाद्दर तिकडे गेले आणि पक्षप्रमुखानी घोषणा केली की, "पक्ष त्यांच्या पाठीशी आहे, त्यांनी काही चूक केलेली नाही, त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही..!" सरकार पेक्षा पक्ष मोठा आहे असे समजणाऱ्या शिवसेनेने आपल्या या आरोपाचे दाग लागलेल्या मंत्र्यांना तिकडे वर्षावर पाठवायाचेच का मग..? इकडे शिवसेना भवन किंवा शिवालय इथेच वॉशिंग पावडरने अंघोळ घालून माध्यमांसमोर उभे करायचे आणि सांगायचे की इतकी सफेदी पहिली आहे का कुठे..? "मैल कितना भी जिद्दी हो, हमारी टिकीया सबसे बहेतर थी और हमेशा रहेगी..! शिवसेनेची नेहमीची आत्मप्रौढी यासाठी पुरेशी ठरली असती पण रोज सामनात आदर्शवादी गप्पा मारल्यामुळे असे काहीतरी खमंग आणि मॅगी टाईप इस्टन्ट-तात्काळ करायला हवे होते. शिवसेनेने तसेच केले...!
तिकडे मुख्यमंत्र्यांच्या खडकावर त्यांच्या 'टिकीया' ने अंघोळ घालायला पाठवले, बरे अजून मुख्यमंत्र्यांनी त्या भेटीत नेमके काय घडले ते सांगितले नाही..नाहीतर सेना आणखी उघडे पडायची..! मागे नाही का कर्जमाफीच्या निर्णयावरून शिवसेना मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर ऐनवेळी बहिष्कार घातल्याचे सांगितलं आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना मंत्री मुख्यमंत्र्यांची पूर्व-परवानगी घेऊन गैरहजर राहिल्याची माहिती दिली, म्हणजे ही सुद्धा चालुगिरी स्पष्ट झाली होती, सरकारमध्ये राहून विरोधी पक्षाचे काम करून शिवसेना अश्या अनेक कोलांट्या उड्या मारण्यात तरबेज झाली आहे..!
खरे तर शिवसेनेची अधिक अडचण यामुळे झाली की,आदल्याच दिवशी पक्षाच्या मुखपत्र दैनिक सामनामध्ये प्रकाश मेहता यांच्यावर झालेल्या आरोपांच्या मालिकेमुळे शिवसेनेनं भाजपवर टीका करण्याची संधी घेतली होती. भाजपचे मंत्री कसे भ्रष्टाचाराच्या आरोपात लोळवले जात आहेत आणि या सर्व प्रकारणांची चौकशी झाली पाहिजे आणि आवश्यकता असेल तर मंत्र्यांचा राजीनामा घेऊन चौकशी झाली पाहिजे हा शिवसेनेचा त्या दिवशी आवाज होता, पण दुसऱ्याच दिवशी त्याच आरोपांच्या चिखलात शिवसेनेचा मंत्री ओढला गेला आणि पक्षाची पंचाईत झाली, बोलती बंद झालेली सेना एका फटक्यात गुडघ्यावर आली, देसाई तातडीने मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि खुलासा केला, निर्णय घेताना देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले नव्हते, खरे तर आरोपाप्रमाणे 31 हजार एकर जमीन जर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी MIDC मधून वगळली असेल तर सतत परकीय गुंतवणूक आणि उद्योग राज्यात यावेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या तसंच 'मेक इन इंडिया' आणि 'मेक इन महाराष्ट्र' असे महत्वकांक्षी धोरणं असताना त्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार असताना, राज्यात उद्योगासाठी अधिकाधिक जमीन आवश्यक असताना, MIDC ने घेतलेली जमीन मालकांना परत करण्याचा निर्णय घेतला गेला आणि तो ही मुख्यमंत्र्यांना न सांगता, हे सुद्धा आश्चर्यच आहे. इतके की कुणीही यात दाल में कुछ काला या दालच काळी असल्याची शंका घ्यावी..!
पक्षाची झालेली ही कोंडी फोडण्याची आणि 'साप भी मरे और लाठीभी ना तुटे', अशी गोष्ट रचून अमलात आणण्याचे नियोजन करण्यावाचून पक्षाला गत्यंतर नव्हते, पण संहिता जरा चांगली करता आली असती, पण पक्षाने मोगलीचा कार्टून शो रचला, काय तर- देसाईंनी वर्षावर जायचे, राजीनामा देण्याची इच्छा असल्याचे नाटक करायचे, इकडे पक्ष पातळीवर त्यांना स्वच्छ करायचे आणि शिवसेना कशी निर्मळ आहे. पक्षाला पदांचा मोह कसा नाही हे दाखवायचे..! नाही तरी सरकारमध्ये आल्यापासून राजीनामे शिवसेनेच्या मंत्र्यांनी खिश्यात ठेवले आहेत, ऊन-वारा- पाऊस काहीही असो ते राजीनामे खिश्यात असतात आणि शाबूत असतात, केव्हाही काढता येतात, देसाईंना आरोप झाल्याने ते देऊ का म्हणून दाखवण्याची नामी संधी मिळाली. पक्षालाही दाखवता आले की खरंच शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खिश्यात राजीनामे आहेत..!!
खरे तर देसाईंना विरोधकांनी आरोपांच्या चिखलात लोळवले की कुणी भाजपचा वस्ताद त्यामागे होता की मेहताना त्या आखाड्यात फारच निर्दयपणे लोळवले जात होते आणि शिवसेना केवळ मजाच नाही तर जखमेवर मीठ चोळत होती हे पाहून मुख्यमंत्र्यांनी तर तसा इशारा केला नाही ना..?! असे अनेक प्रश्नही उपास्थित झाले आणि तसे स्पष्ट विचारलेही गेले. नेमके हे सर्व प्रश्न मीडिया स्टँडवर बाजू मांडायला आलेल्या देसाई यांच्या सकट तिथे उपस्थित संपूर्ण शिवसेनेला केले गेले, तेव्हा देसाई होकारात्मक हसले आणि तुम्ही शोध पत्रकारिता करा असे सांगत अप्रत्यक्ष भाजप यामागे असल्याची हमी भरली, नाही तरी विरोधी पक्ष नेमकेपणाने वापरण्यात मुख्यमंत्री आता तरबेज झाले आहेत, त्यांनी काही सांगावे आणि विरोधी पक्षाने करावे. हे दाखवणारी अनेक उदाहरणे आहेत, मेहता-देसाई प्रकरणात हे काही प्रमाणात अधिक स्पष्टपणे दिसले आहे.
तर मुद्दा हा की, संपूर्ण अधिवेशनात भलतेच अडचणीत आलेले दोन्ही मंत्री अधिवेशन संपल्यावर अधिक नैतिकवान झाले आणि त्यांनी राजीनामा देऊ केला, एकाने प्रत्यक्ष देऊ केला आणि एकाने त्यानंतर दावा केला की, आपणही असेच नैतिकवान आहोत, रात्रीच आपण मुख्यमंत्र्यांना भेटलो. भेटून पाय धरले की राजीनामा देण्याचा बाणा दाखवला हे सांगताना त्यात काहीच अधिकृतपणा नव्हता, पण ही सोडलेली पुडी आहे हे तर स्पष्ट झालेच. शिवसेनेने आपले प्यादे घेऊन जी बालिश खेळी केली त्यानंतर आपण एवढ्या शिव्या खाऊनही मंत्री पदाला चिकटून राहिल्याचे दिसू नये म्हणून मेहतानी पुडी सोडून दिली, खरे तर मंत्रिमंडळातील 'गॅंग'वारची स्थिती अशी आहे की, मेहता मुख्यमंत्र्यांच्या हिट लिस्टवर आहेत आणि त्यांनी आपणहून देऊ केलेला राजीनामा ते स्वीकारणार नाहीत अशी स्थिती अजिबात नाही, सध्या मुख्यमंत्री पक्ष किंवा सरकारच्या प्रतिमेपेक्षा आपले पद आणि प्रतिमा अधिक जपण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी गँग मधील खडसे नंतर मेहतांचा एन्काऊंटर करण्यात ते अजिबात वेळ लावणार नाहीत. त्यामुळे मेहतानी सोडलेली पुडी सोडतानाच सुटलेली होती.
एकूण काय तर देसाईंनी वाघाची झेप घेतल्याचा आव आणत बेडूक उडी मारली आणि ते पाहून मेहतांनी लगेच सुटलेली पुडी सोडली..! या सर्वाना वाटते लोकांना काही कळत नाही, आणि ते फार विश्लेषणही करत नाहीत, पण घडा थोडा थोडा भरत असतो, आणि नेमके हेच प्रत्येक सत्ताधारी का बरे विसरत असतील...!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Subhash desai