मराठी बातम्या /बातम्या /ब्लॉग स्पेस /

#MeToo तेव्हाच का नाही बोलली ?

#MeToo तेव्हाच का नाही बोलली ?

अमेय चुंभळे

#MeToo चळवळ भारतात सुरू झाल्यापासून, आणि खास करून तनुश्री दत्तानं नाना पाटेकरांवर आरोप केल्यानंतर, वरील प्रश्न महाराष्ट्रात अनेक लोक विचारत आहेत. याचं उत्तर माझ्या परीनं देण्याचा प्रयत्न मी करतोय.

अभिनेते, दिग्दर्शक, नेते, मंत्री, संपादकांवर आरोप झाले. हे निव्वळ नागरिक नाहीत. नसतातच. ते ‘सिस्टम’चा भाग आहेत. आणि यांच्यावर आरोप करणे म्हणजे एका अनोळखी चोरावर चोरीचा आळ घेण्याएवढं साधंसोपं नाही. त्याला प्रचंड हिंमत आणि जोखिम पत्करायची तयारी लागते. आणि फक्त महिलाच नाही, पण प्रत्येत सामान्य महिला किंवा पुरुषात गुन्हा घडल्या घडल्या ती हिंमत असेलच असं नाही.

आज ही चळवळ सुरू झाल्यावर, अन्य महिलांना बळ मिळतंय. कारण संख्येत बळ असतं. आणि ज्यांना असं वाटतंय की संभाव्य गलेलठ्ठ पगार किंवा मोठ्या हुद्द्याची नोकरी जाईल म्हणून या महिला आतापर्यंत गप्प होत्या, त्यांनी याचा विचार करावा की अनेकांना जीवाचीही भीती वाटत होती, आजही वाटते. पण आज या महिलांनी सिस्टमशी दोन हात करण्याची तयारी दाखवली आहे.

आपल्या सिस्टममध्ये, जिथे तक्रारदारालाच अनेकदा अपराध्याची ट्रीटमेंट दिली जाते, पोलीस स्टेशनमध्ये तासंतास बसावं लागतं, केसेस दशकभर चालतात.. या सिस्टमकडून एका महिलेनं न्याय्य वागणूक आणि त्वरित तक्रार निवारणाची (आणि गुप्तता पाळायची असेल तर त्याचीही) अपेक्षा कशी करावी ? चळवळ सुरु झाली की चक्र फिरतात, त्या रेट्याच्या दबावानं कारवाया सुरू होतात.. निवारणाच्या प्रक्रियेला वेग येतो.

एक कारण हेही हे की ज्यांच्यावर आरोप झाले, ते जर आपले आवडते किंवा लाडके असतील, तर मन आरोप करणाऱ्या महिलेबाबत साशंक होतं. तनुश्री दत्ताच्या जागी काजोल असती तर हेच प्रश्न विचारले असते ? किंवा नानांच्या जागी इम्रान हाश्मी असता तर आरोप लावणाऱ्या महिलेच्या हेतूबाबत शंका घेतली असती ?

म्हणजे काय, तर यात प्रतिमा किंवा पर्सेप्शनची भूमिका महत्वाची आहे. अशा बाबतीत समाजाला तठस्थपणे विचार करता आला पाहिजे. पर्सनली, नाना पाटेकर मला प्रचंड आवडतात. त्यांच्या ‘अब तक 56’ची मी पारायणं केलेली आहेत. ‘वेल्कम’मधले संवाद मित्रांची मैफल जमली की मीही ऐकवतो. पण म्हणून त्यांच्यावर आरोप झाल्यावर मी न्यायमूर्तींच्या जागी स्वतःला बसवणं योग्य नाही.

ज्यांना अजूनही उमगलं नसेल, त्यांनी जरा आठवावं. बिल्डिंगचं गेट ब्लॉक करून एका राजकीय नेत्यानं त्याची फॉर्च्युनर पार्क केली असेल, त्याच्याशी पंगा घेण्याचं धाडस आपण कितीदा दाखवतो ? नाहीच. बहुतेकदा अंग चोरून, तडजोड करून निघून जातो. नेक्स्ट टाईम या महिलांच्या हेतूवर शंका घेण्याआधी, किमान याचा विचार करावा.

(लेखातले विचार हे लेखकाचं व्यक्तिगत मत आहे. त्या विचारांशी 'न्यूज18 लोकमत' सहमत असेलच असं नाही.)

गौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका

First published:

Tags: Sexual harassment