आधुनिक युगातील 'मातृसुक्त' श्यामची आई !

आधुनिक युगातील 'मातृसुक्त' श्यामची आई !

साने गुरुजींच्या आई, यशोदा सदाशिव साने यांच्या मृत्यला, आज , 2 नोव्हेंबर रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. अवघ्या मराठी मनाला मातृप्रेमाचे बोधामृत पाजणाऱ्या श्यामची आई या पुस्तकाने आणि त्यानंतर त्याच शीर्षकाच्या चित्रपटाने श्यामची आई घराघरात नेली.

  • Share this:

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

साने गुरुजींच्या आई, यशोदा सदाशिव साने यांच्या मृत्यूला, आज , 2 नोव्हेंबर रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. अवघ्या मराठी मनाला मातृप्रेमाचे बोधामृत पाजणाऱ्या श्यामची आई या पुस्तकाने आणि त्यानंतर त्याच शीर्षकाच्या चित्रपटाने  श्यामची आई घराघरात नेली. सर्वसामान्य मराठी घरांमधील बाळबोध वातावरण आणि नैतिक आचरण भावपूर्ण शब्दात मांडत साने गुरुजींनी त्यांच्या आईच्या स्मृती श्यामची आईमध्ये शब्दबद्ध केल्या आहेत.

साने गुरुजींनी  त्यांचे बहुतांश लेखन  तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली.  श्यामची आईमधील श्याम म्हणजे स्वत: साने गुरुजी.  ज्यावेळी भारतमातेला मुक्त करण्यासाठी तमाम स्वातंत्र्यसैनिकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली होती, त्या राष्ट्रप्रेमाने भरलेल्या काळात घर-परिवार सोडून देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाला ज्यावेळी आईच्या प्रेमाचे भरते येते, त्यावेळी लक्षावधी लोकांना प्रेरणा देणाऱ्या साहित्याची निर्मिती होते. श्यामची आईच्या निर्मितीची कहाणीही अशीच मन थक्क करणारी!

तुरूंगातील आपल्या सहकारी कैद्यांसोबत दररोज रात्री केलेला संवाद जसजसा सगळ्यांच्या मनाला भिडू लागला, तसतशी श्याम आणि श्यामची आई यांची संस्कारगाथा आकारास येत गेली. दररोज अश्रूभरल्या नेत्रांनी गुरुजींकडे येऊन मातृप्रेमाच्या महन्मंगल स्तोत्राची उजळणी  करणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि त्यानंतर साने गुरुजींनी या संवादांच्या ४५ रात्री शब्दबद्ध केल्या आणि आधुनिक युगातील 'मातृसुक्त' श्यामची आईच्या रूपाने लोकांपर्यंत पोहचले. आज पाऊण शतकांनंतरही त्या पुस्तकाचा मराठी समाजावर पगडा आहे.

साने गुरुजींना घडवण्याचे कार्य त्यांच्या आईने केले. त्याबद्दल श्यामची आईमध्ये साने गुरुजी लिहितात : आईच्या दुधाची चव काही न्यारीच असते. ते नुसते दूध नसते. त्यात प्रेम  आणि वात्सल्य असते. म्हणूनच ते दूध बाळाला बाळसे देते, तजेला देते. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आई-वडिलांचा असतो आणि त्यातही आईचा अधिक.खरी शिक्षणदायी आईच आहे. आई देहही देते आणि मनही देते. जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारी तीच. असे सांगताना साने गुरुजी आईची महती  आई माझा गुरू : आई माझे कल्पतरू, आईचे प्रेम आकाशाहून मोठे आणि सागराहूनही खोल आहे. अशा अर्थगर्भ आणि आशयपूर्ण शब्दात करून देतात.

साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला होता, त्यांचे घराणे मोठे तालेवार, खोतांचे, पण कालानुरूप गरिबी आल्याने प्रापंचिक अडचणीत आलेले. मात्र आईच्या संस्कारानी  गुरुजींच्या  वर्तनात आणि जीवनात प्रेमरसाची लावणी केली केली होती. त्यामुळे त्यांचे अवघे जगणे प्रेममय झाले होते. "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे... " असा प्रेमाचा पुरस्कार करणाऱ्या साने गुरुजींनी 'श्यामची आई' लिहून मुलांवर कसे संस्कार करावे याचा एक आदर्श वस्तुपाठ समाजासमोर ठेवला आहे.

विसाव्या शतकातील एका पिढीवर साने गुरुजींचा फार मोठा प्रभाव पडला, पण आता एकविसाव्या शतकातील बालक- पालक संबंधातील बदलते संदर्भ पाहिल्यानंतर पुन्हा एकदा साने गुरुजींचे शब्द आठवतात, गुरुजींच्या मते,  "मुलाचे शिक्षण हे मातेवर, पित्यावर, आप्तेष्टांवर, सभोवतालच्या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे. मुलांच्या समीप फार जपून वागावे. वातावरण स्वच्छ राखावे. सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो; त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात, ही गोष्ट खरी. आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो; त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात, हे खरे. सूर्यचंद्रांच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे  व्यवहार, आई-बापांची कृत्ये, स्वच्छ, सतेज व तमोहीन अशी असतील, तर मुलांची मने कमळांप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय व पवित्र अशी फुलतील; नाहीतर ती किडींनी खाल्लेली, रोगट, फिक्कट, रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील.

मुलांचे जीवन बिघडवणे यासारखे पाप नाही. स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. वसिष्ठऋषी वेदामध्ये वरूणदेवाला म्हणतात, "हे वरूणदेवा ! माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल, तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळीस जबाबदार धर....." थोडक्यात काय तर मुलाबाळांच्या चुकीच्या वर्तनास गुरुजी मुलांऐवजी त्यांच्या वडीलधाऱ्यांना जबाबदार धरतात.

पण आपल्या जीवनकहाणीचा आढावा घेताना गुरुजी आईबद्दल मोठ्या प्रेमाने लिहितात.

कशी होती, कोण होती श्यामची आई, आज जिच्या निधनाच्या एका शतकानंतरही तिच्या संस्काराची, तिच्या विचाराची गरज लोकांना वाटते. आजचे आई-मुलांचे संबंध अभ्यासाच्या ताणाने तणावाचे बनलेत, नोकरी-प्रवासाच्या दररोजच्या तापाने, संतापाने घरगुती वातावरण होरपळून गेलेले आहे . मुलांना वेळ देऊ शकत नाही, म्हणून त्यांच्या हाती संगणक, व्हिडिओ गेम आणि मोबाईल देणारे पालक दिवाळी किंवा उन्हाळी सुट्टी मुलं-मुलींना  संस्कार शिबिरात पाठवून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे स्वप्न पाहतात. संस्कार, चांगल्या वागणुकीची सवय लादता किंवा चिकटवता येत नाहीत. त्यासाठी कुटुंबाला वेळ देणे गरजेचे असते. साने गुरुजी आपल्या घरातील परिस्थिती प्रांजळपणे सांगतात, "माझी आई मूर्तिमंत प्रेम होती तरी वेळप्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते. खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला, आम्हा सर्वांना वागवीत होती. कधी ती प्रेमाने थोपटी; तर कधी रागाने धोपटी. दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती. ह्या बेढब व ऐदी गोळयाला रूप देत होती. थंडी व ऊब दोन्हींनी विकास होतो. दिवस व रात्र दोन्हींमुळे वाढ होते. सारखाच प्रकाश असेल तर नाश."

गुरुजींचे हे विश्लेषण आजच्या पिढीलाही लागू पडते. आजची समोर ध्येय नसल्याने  भरकटलेली आणि  दिशाहीन झालेली पिढी भारताचे भविष्य आहे.  समाजाकडे पाठ फिरवून  आत्मकेंद्री झालेले  तरुण जेव्हा जेव्हा भेटतात, तेव्हा  साने गुरुजींच्या आईची आठवण येते, आणि आपोआप आपल्या आईची आठवण येते. आपले बालपण डोळ्यासमोर येते. आज सोशल मीडिया असो किंवा कोणतेही मत व्यक्त करण्याचे ठिकाण , लोक खूप कडवटपणे बोलतात, त्यांच्या कटू विचारांतून कलुषित मनांचे दर्शन होते. पण जेव्हा श्याम आपल्या पायाला माती लागली असे आईला सांगतो त्यावेळी आपल्या पदरानं त्याचे ओले तळवे पुशीत आई म्हणते, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो ! हे वाक्य  मला 'श्यामची आई या मातृसुक्तातील हा सगळ्यात महत्त्वाचा बोधमंत्र वाटतो, त्यातून जगण्याचं  मोठं तत्त्वज्ञान श्यामबरोबर तुमच्या - माझ्यासारख्या वाचकालाही   मिळतं. म्हणून आज शंभर वर्षांनंतरही आम्हाला श्यामच्या आईची आणि तिच्यासोबत आपल्या आईची आठवण येते आणि आपल्या नकळत डोळे पाणावून जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2017 03:40 PM IST

ताज्या बातम्या