नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाने फायदा कुणाचा?

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाने फायदा कुणाचा?

आज आणि उद्या शाह - फडणवीस यांचा बैठका होतील असे सूत्रांकडून समजते. या बैठकांमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल, याच बैठकांमध्ये केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराची चर्चा होईल आणि याच बैठकांमध्ये होणाऱ्या निर्णयांमधून महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची दिशा ठरेल, अशी चिन्हे सध्यातरी दिसताहेत.

  • Share this:

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत यांची लेखमालिका - भाग २

दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहचले आहेत. आज आणि उद्या शाह - फडणवीस यांचा बैठका होतील असे सूत्रांकडून समजते. या बैठकांमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल, याच बैठकांमध्ये केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराची चर्चा होईल आणि याच बैठकांमध्ये होणाऱ्या निर्णयांमधून महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची दिशा ठरेल, अशी चिन्हे सध्यातरी दिसताहेत. मीरा - भाईंदरमधील दणदणीत यशाची बातमी घेऊन मुख्यमंत्री दिल्लीत जात असल्याने मुदतपूर्व निवडणुकांची चाचपणी होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाने नेमका फायदा कुणाचा होणार याविषयी सध्या खूप काही बोलले जाते, पण भाजपचा आजवरचा इतिहास पाहता, ज्यांनी भाजपच्या गोटात प्रवेश केला, ते भाजपच्या पोटात कधी गेले आणि कुठल्या कुठे गडप झाले  हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. पटत नसेल तर बबनराव पाचपुते किंवा विजय कुमार गावित या माजी मंत्र्यांना जाऊन विचारा. अर्थात गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नुकत्याच झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या आधी विविध पक्षातील, विविध स्तरांवरील आणि विविध तर्हेच्या  जेवढ्या लोकांना भाजपने 'शुद्ध' करून घेतले, त्याचा भाजपाला निश्चितच फायदा झालाय. कधीकाळी राज्याच्या राजकारणात दखलपात्र नसलेला भाजप आज  क्रमांक एकचा पक्ष बनलाय. आणि याचे सारे श्रेय निर्विवादपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  आक्रमक रणनीतीला द्यावे लागेल .

फडणवीसांच्या राजकीय कौशल्यापुढे सध्या काँग्रेस -राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आणि त्यांचे मातब्बर नेते  हतबल ठरलेले दिसताहेत.

त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील एकमात्र जनाधार असणारा नेता म्हणजे  नारायण राणे, तेच जर भाजपात आले तर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला निर्विवाद बहुमतासाठी नक्कीच मदत होईल. ज्या कोकणात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला एकही जागा मिळवता आली नाही, तेथे शिवसेनेला जोरदार टक्कर देण्यासाठी धडाकेबाज  राणे उपयोगी ठरतील. राज्यातील काँग्रेस प्रभावक्षेत्रातही राणेंना फिरवले तर भाजपच्या उमेदवारांना फायदा होऊ शकेल.  खरे  सांगायचे तर १२ वर्षांपूर्वी  काँग्रेस प्रवेशानंतर राणे परिवाराला स्वतःच्या विकासासाठी पक्षाचा जेव्हढा फायदा झाला होता, तेव्हढा काँग्रेसला राणेंच्या करिश्म्याचा लाभ झाला नव्हता.  पण जर ते भाजपात गेले तर भाजपचा फायदा निश्चित आहे, पण राणेंच्या भवितव्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह उमटलेले दिसते. मध्यंतरी कोकणातील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे, नितीन गडकरी यांना निमंत्रित करून राणेंनी स्वतःचा भाजपकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त केला होता.

त्याच कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी ' भाजपात वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो ' असे विधान करून राणेंच्या भाजप प्रवेशाचे सूतोवाच केले होते. 'पक्ष वाढीसाठी सर्व प्रकारच्या नेत्यांची आवश्यकता असते , ' असे विधान करून गडकरी यांनी राणे भाजपाला चालतील, असे उघडपणे सांगितले होते. पण तरीही  राणेंच्या 'स्वयंमेव मृगेंद्रता ' थाटाच्या आक्रमक  नेतृत्वाला पक्षाच्या कमानीखाली कसे आणायचे याचा भाजपाला नक्कीच विचार करावा  लागेल. सध्या राणे समर्थकांनी सोशल मीडियावर ' राणे साहेब हाच पक्ष, ते ठरवतील ते धोरण आणि ते बांधतील ते तोरण' अशी प्रचार मोहीम सुरु केली आहे. पक्ष प्रवेशापूर्वीच राणे समर्थक जर एव्हढे आक्रमक झाले असतील तर शिस्तबद्ध भाजपात आल्यानंतर काय होईल ?

भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मातृसंस्था रा.स्व.संघ यांच्या साधन शूचितेच्या राजकारणाच्या गोष्टी आज इतिहासजमा झाल्या असल्या तरी आज मोदी-शहांच्या पक्षात केंद्रीय नेतृत्व आणि पक्ष शिस्तीला खूप महत्त्व आहे.शिवसेना आणि काँग्रेसच्या मांडवाखालून आलेल्या राणेंनी याआधी दोन्ही पक्षातील नेतृत्वाला आव्हान दिलेलं हा नजीकच्या काळातला इतिहास सगळ्यांच्या स्मरणात आहे . शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी , राहुल गांधी, विलासराव , पृथ्वीराज , अशोक चव्हाण  असे सेना , काँग्रेसचे सगळे बडे नेते राणेंच्या टीकेचे लक्ष्य बनलेले आहेत. त्यांच्या बंडाच्या कहाण्या आजही या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये मोठ्या चवीने चर्चिल्या जातात . राणेंनी सेनेचा राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्येक भाषणात त्यांच्यावर जोरदार टीका होत असे  पण तरीही राणे राजकारणात पाय रोवून उभे राहिले . काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांचे सगळ्याच मुख्यमंत्रांशी खटके उडालेले दिसले. राणेंनी त्या गोष्टी कधी लपवून ठेवल्या नाहीत, ते उघडपणे आपली मते व्यक्त करीत , त्यामुळे काँग्रेसमध्ये काहीकाळ पर्यायी 'शक्तिकेंद्र' निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरलेला दिसला. राणेंच्या कारकिर्दीचे हे सगळे 'बारकावे' जाणणाऱ्या  भाजप नेतृत्वाकडून त्यांचे स्वागत होईल का आणि झाले तर कसे होईल , हे नजीकच्या काळातच समजेल.

आयुष्यात असंख्य चढ -उतार पाहिलेल्या नारायण राणे यांना परिस्थिती कशीही असली तरी तिचा यशस्वी  'सामना' असा करायचा याचे उपजत ज्ञान आहे.

'द अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स' अशी म्हण इंग्लिशमध्ये प्रचलित आहे. स्कॉट्स आणि आयरिश लोकांशी इंग्रजांच्या सुमारे तीनशे वर्षांतील युद्धाच्या अनुभवावरून ही म्हण इंग्रजी लोकांत रूढ झाली, असा प्रवाद आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीच्या आरंभ काळापासूनच 'आक्रमण हाच बचावाचा उत्तम मार्ग' मानलेला आहे. त्यामुळेच असेल कदाचित जेव्हा विरोधी पक्षात बसायची वेळ आली, दोनदा पराभवाचा कटू अनुभव पदरी पडला, तरी राणे कधी नरमले नाहीत. अर्थात जेव्हा दोन्ही मुलांवर पोलीस केसेस झाल्या, नितेश राणे याना तुरुंगात राहावे लागले, तेव्हा मात्र त्यांच्यातला बाप जागा झाला नसता तरच नवल होते. राज्यभर मराठा आरक्षणासाठी दौरे, मेळावे घेऊन राणे परिवाराने अवघा महाराष्ट्र 'जागा' केला होता.  त्यामुळे मराठा मोर्चाच्या मालिकेला खऱ्या अर्थाने बळ मिळाले होते . त्याद्वारे राणेंनी  पुन्हा एकदा 'अटॅक इज द बेस्ट डिफेन्स' हे सिद्ध केले होते , याची फडणवीस सरकारला पुरेपूर माहिती आहे, राणेंच्या भाजप प्रवेशामागे तेही एक कारण आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यातील जोरदार संघर्ष गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रंगला होता. विधानसभा निवडणुकीतील सलग दोन पराभव पचवून विधान परिषदेवर निवडून येणाऱ्या राणेंनी फडणवीस सरकारसमोर मोठे आव्हान उभे करण्याची तयारी केली होती. विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यापेक्षा आपण फडणवीस सरकार विरोधात जास्त टीका करतो, असे दाखवून त्यांना काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचे लक्ष वेधून घ्यायचे होते. पण त्यांचा तो प्रयत्न 'बुमरँग' होऊन त्यांच्यावरच उलटला . फडणवीस यांनी राणेंच्या दुप्पट आक्रमकपणे 'जुन्या फाईल्स ' बाहेर काढल्या आणि राणेंना गप्प बसवले होते. विधिमंडळात रंगलेले ते  संघर्षनाट्य राणे भलेही विसरले असतील , पण फडणवीस ते विसरले असतील का ?  मराठा आरक्षण असो, बाबासाहेब पुरंदरे याना 'महाराष्ट्र भूषण ' देण्याचा विषय असो किंवा मराठा मोर्चाची मालिका, राणे परिवाराने सातत्याने फडणवीस सरकारला धारेवर धरले होते, मग आता त्यांना पक्षात घेऊन मुख्यमंत्री आणि त्यांचे  सहकारी राणेंचे मोठेपण मान्य करणार, की फक्त मोदी-शहांचा आग्रह मानणार  हा कळीचा मुद्दा आहे .

ऐंशीच्या दशकात राणे प्राप्तिकर विभागात नोकरीला होते. त्याकाळात आपल्या सहकाऱ्यांबरोबर क्रिकेट खेळणे हा त्यांचा आवडता छंद होता. ते ऑफिसच्या क्रिकेट टीममध्येही असायचे. कदाचित क्रिकेटमुळे ही आक्रमकवृत्ती त्यांच्या अंगात भिनली असावी. भारतीय क्रिकेटला, नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्वाला आक्रमकतेचे वरदान सी. के. नायडू या महान खेळाडूने दिले आहे. आज ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यांमध्ये षटकारांचा पाऊस पडतो, अगदी त्याच स्टाइलने स्टेडियमच्या ज्या कोपऱ्यातून 'वी वॉन्ट सिक्सर' असा आवाज यायचा त्या दिशेने सी. के. नायडू चेंडू भिरकावून द्यायचे. खरे सांगायचे तर नायडू यांनी ज्या काळात क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. मुख्य म्हणजे तेव्हा चेंडू उचलून हवेत मारणे चुकीचे मानले जात असे. अशा वेळी नायडू यांनी षटकारांची आतषबाजी सुरू करून क्रिकेटमध्ये आक्रमकपणाचे रंग भरले. महाराष्ट्राच्या राजकारणापुरते म्हणायचे ठरवले तर नारायण राणे यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत हा आक्रमक 'फॉर्म' कायम टिकवला आहे.

१९८४ साली शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन राणे यांनी चेंबूरमधून शिवसेना शाखाप्रमुख म्हणून काम सुरू केले. लगेचच एका वर्षाने ते नगरसेवक झाले. १९९१ मध्ये राणे मालवणमधून आमदार झाले. त्याच सुमारास 'बेस्ट समिती'चे अध्यक्षपद सलग तीन वेळा भूषवून त्यांनी मुंबई   महापालिकेच्या आणि एकंदर सर्वच नागरी प्रश्नांचा अभ्यास केला. चेंबूरमध्ये एका छोट्या पतपेढीच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या लहानशा कार्यालयात बसून विधानसभेतील कामकाजाची तयारी करणाऱ्या राणे यांना आम्ही १९९३ च्या सुमारास प्रत्यक्ष  पाहिले आहे. विधिमंडळातील कामकाजात त्यावेळी  स्व. आर. आर. पाटील, सुभाष कूल, माणिकराव ठाकरे आदी तरुणतुर्क आमदार चमकायचे. लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न उपस्थित करण्यासाठी ज्या काही तांत्रिक करामती कराव्या लागत, त्या करण्यात ही मंडळी तयार होती. राणेसुद्धा त्यांच्याच पद्धतीने काम करून आपल्या लक्षवेधी सूचना पटलावर याव्यात, असा यशस्वी प्रयत्न करीत. या संसदीय आयुधांच्या लढाईत  अग्रभागी राहण्यासाठी राणे प्रसंगी ताकदीचा वापरही करीत.

विधिमंडळातील आपले प्रत्येक भाषण मुद्देसूद असावे, यासाठी ते आपल्या चेंबूरच्या कार्यालयात बसून गृहपाठ करायचे, त्यावेळी त्यांचे हे छोटेखानी कार्यालय पुस्तकांनी कसे खच्चून भरलेले होते, हे चांगलेच स्मरणात राहिले आहे. विधिमंडळातील कामकाजात संसदीय आयुधांचा वापर करून लोकांचे प्रश्न मांडताना राणे यांच्या अभ्यासूवृत्तीचे दर्शन सभागृहात घडायचे, आजही घडते. कारण कोणत्याही प्रश्नावर बोलण्यापूर्वी त्याचे व्यवस्थित आकलन करून घेणे गरजेचे असते, असे मानणाऱ्या अॅड. दत्ता पाटील, एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, सुदामकाका देशमुख आदी मान्यवर आमदारांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संस्कार राणे यांच्यावर झाले आहेत. मुळात आक्रमकवृत्तीला अभ्यासाची जोड मिळणे, हा योग तसा दुर्मीळ. पण राणे यांच्याबाबतीत तो योग जुळून आला होता.

राणेंच्या आक्रमक 'स्टाईल' ची जरा जास्तच 'कॉपी' करणाऱ्या  त्यांच्या  राजकीय  वारसदारांकडे राणेंच्या अभ्यासूपणाचा २५ टक्के भाग जरी आला असता तरी त्यांची राजकीय कारकीर्द अल्पावधीत उभी राहिली  असती. पण तसे घडले नाही. फक्त राणे कुटुंबाबाबत हे घडले असे नाही , ते जवळपास सर्वच राजकीय घराण्यातील युवराज - राजकुमारींबाबत घडलेले दिसतंय. त्यामुळे भाजपाला नारायण राणे यांच्यासोबत माजी खासदार निलेश आणि  'स्वाभिमानी' नितेश राणे यांना स्वीकारताना बऱ्याच तडजोडी कराव्या लागतील. मुख्य म्हणजे इतिहासातील अनेक गोष्टींकडे कानाडोळा करण्याची तयारी ठेवावी लागेल. कारण १२ वर्षांपूर्वी राणेंनी शिवसेना सोडली तेंव्हा  ' राणेंसमर्थक ' म्हणवणारे १० आमदार होते.  वेंगुर्ल्याचे शंकर कांबळी, राजापूरचे गणपत कदम , श्रीवर्धनचे श्याम सावंत, संगमेश्वरचे सुभाष बने, परळचे कालिदास कोळंबकर, अंधेरीचे जयवंत परब, चिमुरचे विजय वडेट्टीवार , पुण्याचे विनायक निम्हण, बार्शीचे राजा राऊत, प्रकाश भारसाकळे या सगळ्या आमदारांनी राणेंसाठी आपले  राजकीय अस्तित्व पणाला लावले होते.

पण काँग्रेसच्या साठमारीत स्वतः राणे  आणि  कालिदास कोळंबकर वगळता कुणाचाच टिकाव लागला नाही. काँग्रेस संस्कृतीशी जुळवून घेताना राणेंना अनेक तडजोडी कराव्या लागत होत्या, त्या धडपडीत त्यांचे या समर्थकांकडे दुर्लक्ष झाले आणि अल्पावधीतच हे सगळे सेनेचे शिलेदार मागे पडत गेले, राणेंपासून दूर गेले.निलेश आणि नितेश  अनुक्रमे कोकणात आणि मुंबईत सक्रिय झाल्यानंतर राणेंचा स्वभाव आणि प्रभाव स्वयंकेंद्रित राजकारणात रमताना दिसला . त्यामुळे परशुराम कोपरकर असो, राजन तेली असो , श्रीकांत सरमळकर असो, सदा सरवणकर किंवा रवी फाटक असो, असे एकेकाळी जिवाभावाचे साथीदार म्हणून  ओळखले जाणारे खंदे समर्थक राणेंपासून दूर गेले . त्याचा जोरदार फटका सलग ३ निवडणुकांमध्ये बसूनही राणेंची कार्यपद्धती बदलली नाही . जर भाजपच्या सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध वातावरणात राणेंची कार्यपद्धती बदलली तर तो त्यांना भाजपात येऊन  झालेला  सगळ्यात मोठा फायदा असेल .

(क्रमश :)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 03:18 PM IST

ताज्या बातम्या