S M L

गणेशोत्सवाच्या 'उत्सवीकरणा'मुळे गणेशभक्ती लोप पावतेय ?

शुक्रवारपासून महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाला प्रारंभ होतोय. हल्ली तर अगदी अमेरिकेतही मराठी बांधव मोठया उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. पण बदलत्या काळात या निरपेक्ष गणेशभक्तीचं उत्सवीकरणात कधी आणि कसं रुपांतर झालं हे कोणालाच कळलं नाही. म्हणूनच या बदलत्या गणेशोत्सवाचा आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांनी या विशेष ब्लॉगच्या माध्यमातून घेतलेला हा धांडोळा...

Chandrakant Funde | Updated On: Aug 24, 2017 08:07 PM IST

गणेशोत्सवाच्या 'उत्सवीकरणा'मुळे गणेशभक्ती लोप पावतेय ?

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

गणपती, म्हणजे गणांचा, प्राचीन काळातील गणराज्य संस्कृतीतील लोकांचा नेता. आजकालच्या लोकशाहीतील लोकनेत्यांपेक्षा, राजकारण्यांपेक्षा खूप वेगळा असणारा हा लोकनायक सकळविद्यांचा अधिपती आहे. ज्ञानी असला, पराक्रमी असला तरी विनम्र आहे. तो लोकांना तापदायक ठरणा-या असुरांचा, विघ्नांचा नायनाट करतो, म्हणून त्याला विघ्नहर्ता म्हणतात. त्याचे दर्शन, मार्गदर्शन आणि कार्य सगळ्या लोकांना सुखदायी असायचे म्हणून तो सुखकर्ता आणि मंगलमूर्ती म्हणून ओळखला जातो. मनासारख्या चंचल असणा-या उंदराला त्याने आपले वाहन केल्यामुळे तो मूषकवाहन म्हणून प्रसिद्ध झाला. त्याच्या अवाढव्य शरीरामुळे त्याला 'लंबोदर' आणि तुंदिलतनू म्हणतात, पण तसे असूनही तो छान नर्तन करू शकतो, हे त्याचे वैशिष्टय. त्याला गोड आवडते. मोद म्हणजे आनंद, आनंददायी मोदक तर गणपतीची ओळख बनली आहे, त्यामुळे जेव्हा घरोघरी गणपती येतात तेव्हा मोदकाच्या प्रतीकातून आनंदही घराघरात पसरतो.

गजमुख, गणेश हा बुद्धिमत्ता, विद्या आणि समंजसपणाचे उत्तम उदाहरण आहे. त्याच्यात अफाट सामर्थ्य आहे, पण तो त्याचा फक्त लोकरक्षणासाठी वापर करतो, त्याच्याकडे बुद्धी आहे, पण ती त्याने व्यासांकडे महाभारत लिहिण्यासाठी वापरली. एक समर्थ, संपन्न लोकनेता विद्वान व्यास मुनींकडे 'लेखनिक' होतो, हा मला आवडणारा गणेशाचा लोकविलक्षण गुण. त्यातही तो मला जास्त आवडतो तो त्याच्या मातृभक्तीबद्दल . तुम्ही त्याच्याबद्दल जसजसे जास्त वाचत जाता, तसतसा तुम्हाला तो जास्त कळत जातो आणि मग आवडू लागतो. भेटू लागतो, काही वर्षांपूर्वी दक्षिण कोरियामध्ये फिरताना मला विलक्षण सुंदर गणेश प्रतिमा मिळाली होती, गतवर्षी चीनमध्येही दोन बुद्ध मंदिरात मला गणेश मूर्ती पाहायला मिळाली.चार महिन्यांपूर्वी व्हिएतनामला गेलो होतो. त्यावेळी दनांग या शहरात इसवी सन तिसऱ्या ते तेराव्या शतकापर्यंत व्हिएतनामवर राज्य करणाऱ्या चाम राजवटीचे भग्न - वैभव पाहायला मिळाले. दनांगच्या पुराणवस्तु संग्रहालयात अगदी दर्शनी भागात आठव्या शतकातील गणेशमूर्ती उभ्या असलेल्या पाहायला मिळाल्या आणि मनातील गणेशप्रेम पुन्हा जागे झाले. होय, मराठी आणि त्यातल्यात्यात कोकणी माणसाला गणेशाची विलक्षण ओढ. म्हणून गणेशोत्सव हा आपल्याकडे इतक्या थाटाने साजरा केला जातो. अवघ्या मराठी मनांना मोहवणारा लेखक गणेश विलक्षण हुशार आहे, म्हणून रिद्धी-सिद्धी त्याच्या शेजारी उभ्या असतात. आजवर बौद्धिक क्षेत्रात देशाला मार्गदर्शन करणा-या मराठी लोकांनी गणपतीचा हा गुण ओळखला होता, पण आता मात्र कुणालाच विद्येची आराधना करण्यास, विज्ञानाची साधना करण्यास वेळ नाही. सर्वाना हवाय रिद्धी-सिद्धींच्या माध्यमातून मिळणारा सुखोपभोग.. तसे शक्य नाही. देवासमोर रांगा लावून, टांगा दुखवून यश आणि सुख मिळायला, देवकृपा म्हणजे दुकानातील वस्तू आहे का?

अवती-भवतीची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, आर्थिक आणि सामाजिक समस्यांनी सर्वसामान्य माणूस कितीही कंटाळून गेला असला तरी गणेशोत्सव आला की, अवघ्या महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात चैतन्याची लाट उसळते. हा सण धार्मिकतेपेक्षा सांस्कृतिक, सामाजिक आणि मुख्य म्हणजे कौटुंबिक बंध मजबूत करणारा आहे. म्हणूनच लोकमान्य टिळक यांना घरोघरी चालणारा गणेशोत्सव सार्वजनिक करण्याची कल्पना सुचली असावी. तसे पाहायला गेल्यास टिळकांच्याही एक वर्ष आधी, १८९२ मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा गणपती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा झाला होता, त्यावर सुरु असलेला वाद सध्या सार्वजनिक गणेशोत्सवाला गालबोट लावताना दिसतोय. त्यात लोकमान्यांच्याच घरातील पुण्याच्या महापौर यांनी गणेशोत्सवाला सव्वाशे वर्ष पूर्ण होण्याच्या कार्यक्रमात वादग्रस्त विधाने करून आणखी भर टाकलेली आहे. असे फक्त महाराष्ट्रातच घडू शकते. तसे पहिले तर टिळक-रंगारी त्यांच्याआधी पेशव्यांचे एक अग्रगण्य सरदार खाजगीवाले यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्यास सुरुवात केली होती; परंतु टिळकांनी हा उत्सव स्वातंत्र्य चळवळीशी जोडल्यामुळे त्या एकूण उत्सवाला राष्ट्रप्रेमाची बैठक मिळाली. अर्थात, १८९०च्या आसपास पुणे परिसरात झालेल्या हिंदू-मुस्लीम दंग्यांची पार्श्वभूमी असल्याने अगदी आरंभापासून गणेशोत्सव हा एक हिंदूंसाठी शक्तिप्रदर्शनाचा इव्हेंट ठरला. अगदी सुरुवातीलाच मिळालेल्या या स्वरूपातून गणेशोत्सव आजही सुटलेला नाही. फरक एवढाच की आता शक्तिप्रदर्शनाच्या जोडीला भक्तिप्रदर्शन आणि जमेल तेवढे श्रीमंती प्रदर्शनही सुरू असते.

Loading...
Loading...

नाही म्हणायला गणेशभक्तीची परंपरा महाराष्ट्रात खूप वर्षापासून सुरू आहे. इतिहासकार वि. का. राजवाडे यांच्या मते, गणेशपूजा अडीच हजार वर्षापासून प्रचलित असावी. आपले हे मत मांडण्यासाठी राजवाडे नारायण उपनिषदातील गणेश गायत्रीचा आधार घेतात; त्यांच्या या कालनिश्चितीला वैज्ञानिक पुरावा नाही, पण सुप्रसिद्ध इतिहासकार डॉ. भांडारकर आपल्या वैष्णवाइज्म अँड शैवाइज्म या ग्रंथात म्हणतात की, विनायकाची उपासना इसवी सनापूर्वी अस्तित्वात होती; परंतु अंबिकापुत्र विनायक गणपतीचा समावेश वैदिक धर्मातील उपास्य देवतांच्या समूहात झाला तो ब-याच नंतरच्या काळात. आपल्या या म्हणण्याला वस्तुस्थितीचा आधार देताना डॉ. भांडारकर सांगतात की, गुप्तकालीन एकाही कोरीव लेण्यात गणपतीचा उल्लेख नाही; पण वेरूळच्या लेण्यात सप्तमातृकांच्या सोबत गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. यावरून इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून आठव्या शतकापर्यंतच्या दरम्यान गणपतीची उपासना प्रचलित झाली असावी, असा निष्कर्ष डॉ. भांडारकर यांनी काढला होता.

महाराष्ट्रात गणेशपूजा देवगिरीच्या यादवांच्या राज्यात जास्त वाढली. त्या काळात बहुतेक मोठया नगरांमध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गणपतीचे मंदिर बांधण्याची प्रथा होती. म्हणूनच असेल कदाचित राजमान्य आणि लोकमान्य बनलेला हा देव तत्कालीन ग्रंथांमध्ये, काव्यांमध्ये आवर्जून पाहायला मिळतो. यादवकाळातील, विशेषत: राजा रामदेव रायाच्या काळातील दोन महत्त्वाचे मराठी ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आणि कवी नरेंद्र यांचे रुक्मिणी स्वयंवर. कोटयवधी मराठी मनांमध्ये आजही मानाचे स्थान असणा-या या दोन्ही ग्रंथांची सुरुवात गणेश स्तवनाने झालेली दिसते. ज्ञानेश्वर माऊलींनी गणेशाला जगाचे आदिकारण ठरवून, ॐ नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या ॥

जय जय स्वसंवेद्या आत्मरुपा ॥ असे म्हटले आहे. याची बहुतांश मराठी लोकांना कल्पना आहे.

ज्ञानेश्वरांनी गणपतीला वाङमयरूप देताना वापरलेल्या कल्पना आणि प्रतिमांमागील अर्थ ठाऊक नसला तरी लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय आवाजाने चित्तात ठसलेल्या ज्ञानोबांच्या त्या शब्दांचा आपल्याला परिचय आहे; पण महानुभाव हा पंचकृष्णांव्यतिरिक्त अन्य देव न मानणा-या पंथात प्रवेश करण्यापूर्वी कवी नरेंद्राने केलेली गणेशस्तुतीही मनोवेधक आहे. रुक्मिणी स्वयंवराच्या आरंभी त्यांनी एका ओवीत म्हटले आहे,

गणेशे मनोरथमुद्रा दीधली।

विता पढिक सेश भरिली।

तव पुढा सारदा देखिली।

सारस्वत फळेसी॥

गणेशाला विद्यांचे नंदनवन म्हणणारा कवी नरेंद्र गणेशाकडून मनोरथमुद्रा म्हणजे कविता करण्याची शक्ती मागतो, ज्ञानेश्वर ज्याच्यात शब्दब्रह्म पाहतात तो वाङमय गणेश आजच्या काळात विस्मृतीत गेलेला दिसतो. घरोघरी आणि अनेकदा सामुदायिकरीत्या सुद्धा ज्याचे पठण जाते, त्या अथर्वशीर्षात गणेशाचे वर्णन त्वं वाङ्मय त्वंचिन्मय:, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि असे येते. गणपती, जो साहित्य, ज्ञान, विज्ञानाचे प्रतीक आहे, त्या गणपतीला मुख्य देवता मानणा-या गाणपत्य संप्रदायात ज्या ग्रंथाला सर्वात जास्त मानले जाते त्या मुद्गल पुराणात तर तो वेगळ्याच रूपात भेटतो. या पुराणात जे रूपकात्मक वर्णन आहे, त्यात क्रोधासुर, लोभासुर, कामासुर, मदासुर आणि मत्सरासुर यांचा गणेशाने कसा नाश केला, याच्या कथा सांगितलेल्या आहेत. येथे वाङमयमूर्ती असणारा गणपती पूर्णपणे आध्यात्मिक स्थितीत गेलेला दिसतो. आम्हाला गणेशपूजा करताना त्याच्या या एकाहून अधिक सद्गुणांचा आणि लोकोपयोगी कार्याचाही विसर पडलेला दिसतो.

आज गणेशोत्सव मग तो सार्वजनिक असो वा घरगुती ज्या पद्धतीने साजरा होतो, त्याचा अवघ्या मराठीजनांनी कधी तरी विचार करण्याची वेळ आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील कोणत्याही गावातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आपण गेलात तर वर-वर दिसायला धार्मिक वाटणारा हा उत्सव भपकेबाज देखाव्यांपुरता मर्यादित झाल्याचे पाहायला मिळेल. ही गणपतीभोवती केलेली दिखावटी सजावट कुणाचे राजकीय स्थान, कुणाचा आर्थिक वा धार्मिक मान, वा एखाद्याची सामाजिक शान दाखविणारी असते. त्या सबंध उत्सव परिसरात सामाजिक कर्तव्याचे भान असणारे कार्यकर्ते विरळाच आढळतात आणि म्हणूनच गणपती, गणांचा अधिपती, जो सकल कलांचा अधिपती आहे, बुद्धिदाता आहे, त्याची त्याला न आवडणा-या पद्धतीने उपासना होते आणि उत्सवाचा मूळ हेतू बाजूला पडलाय का, याची आज गंभीरपणे विचार झाला पाहिजे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप खरोखरच राष्ट्रीय विचारांना चालना देणारे होते. त्या काळात गणपतीच्या ११ दिवसांत मेळे साजरे होत. त्या मेळ्यांमध्ये आपण काय सादर करणार, याची वर्षभर तयारी चाले, जणू काय मेळे म्हणजे राष्ट्रीय आकांक्षा जपणा-या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा हुंकार बनले होते, कुणी गाणे सादर करून, नव्या नाटकाची रचना करून तर कुणी एकपात्री प्रयोगाद्वारे आपल्या भावना व्यक्त करीत, त्याच सुमारास राष्ट्रीय भावनेने जागृत झालेले विद्वान, नेते आणि सामाजिक कार्यकर्ते लोकांना स्वातंत्र्य चळवळीसाठी मार्गदर्शन करायचे, त्यांच्या भाषणांनी, व्याख्यानांनी लोकांच्या मनातील राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग पेटत असे. तेंव्हापासून अगदी अलीकडे म्हणजे ऐंशीच्या दशकापर्यंत गणेशोत्सवाचे हे सांस्कृतिक वैभव टिकून होते. या सार्वजनिक व्यासपीठाने शेकडो कलाकारांना, गायकांना, वादकांना त्यांच्या आयुष्यातील सादरीकरणाची पहिली संधी दिली असल्याने अनेक नामवंत कलावंतांचे गणेशोत्सवाशी भावनिक नाते जोडले गेले होते; पण ऐंशीच्या दशकात आलेल्या व्हिडिओ-रंगीत टीव्हीच्या जोडीने आणि मोठया पडद्यावरील चित्रपटांनी सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवात वेगळया प्रकारच्या जागरणाची प्रथा निर्माण केली. आम्ही एका रात्रीत किती जास्त सिनेमे पाहिले, हे दुस-या दिवशी तारवटलेल्या डोळयांनी सांगण्यात नव्या पिढीला अभिमान वाटू लागला आणि तेव्हापासून खरे तर गणेशोत्सव, घरातला किंवा चौकातला फक्त मनोरंजनाचा मजा मारण्याचा पर्वकाळ ठरू लागला.

या स्थितीचा फायदा घेण्यासाठी सगळयात आघाडीवर होते राजकीयदृष्टया सजग लोक. गणपती म्हणजे मज्जा, हे समीकरण रूढ झाल्याने सार्वजनिक गणेशोत्सवात तरुणांची गर्दी वाढू लागली. हे तरुण आपल्याबरोबर असतील तर राजकीय शिडीच्या पाय-या चढणे सोपे जाईल, हे ओळखून नवे नेते पुढे आले. त्यांनी गणेशोत्सवाची सूत्रे हाती घेता-घेता स्थानिक अर्थकारण आणि राजकारण ताब्यात घेतले. त्यामधून गणपतीला पैसा आणि गणपतीच्या पैशातून मंडळाची कमाई असे मौलिक समीकरण तयार झाले. आजही ते तसेच आहे. त्यामुळे गणपतीच्या दारावर कधी गुटख्याचे तोरण, तर कधी दारूच्या बाटल्यांची आरास असते. त्याच परिसरातील चाळक-यांना छळणा-या बिल्डरची जाहिरात गणेशसाक्षीने झळकत असते. गणपतीसमोर सकाळ-संध्याकाळी गणेशदर्शनाला भलेही हजारो लोक रांगा लावत असतील, देव नवसाला पावेल या आशेने तिष्ठत बसत असतील; पण त्याचा उत्सव करणा-या मंडळांना तो चांगली बुद्धी का देत नाही ? हा प्रश्न मन अस्वस्थ करतो.

तुम्ही जगातील कोणताही धर्म घ्या आणि त्यांच्या दैवतविषयक संकल्पना पाहा, त्या सगळयात आपल्याला त्या-त्या समाजाच्या प्रगतीचे प्रतिबिंब दिसते. अर्थात त्यात समाजाची अधोगतीही तेवढयाच ठळकपणे उमटत असते; परंतु ती मान्य करण्यासाठी धाडस लागते. ते धाडस मराठी समाजमनाने फार क्वचितच दाखवले आहे आणि म्हणूनच जेव्हा प्रख्यात बौद्धतत्त्वज्ञ, भाषातज्ज्ञ आणि महात्मा गांधींचे ज्येष्ठ सहकारी धर्मानंद कोसंबी यांच्या अफाट बुद्धीच्या मुलाने दामोदर कोसंबी यांनी आपल्या धर्मकल्पनांची वेगळया पद्धतीने चिकित्सा केली, तेव्हा मराठी विचारवंतांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हार्वर्ड विद्यापीठात ज्यांच्या बुद्धिमत्तेची तारीफ होत होती, गणितासोबत पुरातत्त्वशास्त्र, खादीचा प्रचार, भाषा अभ्यास अशा वेगवेगळया क्षेत्रांत ज्यांनी अफाट आणि अचाट कार्य केले त्या दामोदर कोसंबींची कर्मठ, रूढीवादी मंडळींनी सतत उपेक्षाच केली. त्यामुळेच असेल कदाचित आमच्या समाजात कडवट हिंदुत्वाचे स्तोम माजले. धर्माचा मनाजोगा अर्थ लावून लोक धार्मिक बनू लागले.

आज या तथाकथित धार्मिकतेनेच आमच्या मानसिकतेला दुबळे केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईसाहेबांनी पुणे शहर वसविताना कसबा पेठेत गणपतीची स्थापना केली होती; पण महाराजांनी वा त्यांच्या मावळयांनी कधी गणपतीच्या भक्तीचे जाहीर प्रदर्शन केल्याचा इतिहासात उल्लेख नाही. आज मुंबईतील सिद्धिविनायक असो वा टिटवाळयाचा गणपती सगळीकडे मंगळवार असो वा रविवार, चतुर्थी असो आणखी कोणते निमित्त.. भाविकांची ही गर्दी जमते.. हजारो भक्तांसोबत मग शेकडो भिकारी, फुलवाले, वडा-पाव विकणारे, पाकीटमारी करणारे, अगदी नाना प्रकारचे लोक देवळाभोवती जमतात. सार्वजनिक गणेशोत्सवातही असेच चित्र पाहायला मिळते. गल्लोगल्लीतील नवसाला पावणारे राजे म्हणून जेव्हा गणपतीच्या अतिविशाल मूर्ती उभ्या करण्याची स्पर्धा लागते, अगदी गणेशोत्सव सुरु होण्याच्या आधीपासून हल्ली " मुखदर्शनाचे' फॅड सुरु झालेले दिसते, तेव्हा तर हसावे की रडावे, असा प्रश्न पडतो. गणपतीचा उत्सव हा सगळया पर्यावरणाला आणि परिसराला आनंद देणारा असला पाहिजे; पण आम्ही नद्या-नाले, समुद्र-खाडया प्रदूषित करणा-या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या अतिविशाल मूर्तीचा आग्रह धरतो.

गणपतीला मोठे कान आहेत, म्हणून तुम्ही ठणाणा आवाजात लाउड स्पीकर आणि डीजे लावता. या ध्वनिप्रदुषणाने आपल्या परिसरातील वृद्धांना, विद्यार्थ्यांना, रुग्णांना किती त्रास होतो, याचा कुणीही विचार करत नाही. हा सगळा गोंधळ, गोंगाट कमी म्हणून की काय, नाशिक बाजा नामक ध्वनिप्रदूषणाचा उच्चांक गाठणारा बँडबाजाही आणला जातो आणि हे सगळे केले जाते, सर्वसामान्य गणेशभक्तांच्या किंवा काही हितसंबंधी लोकांच्या पैशातून. त्याला आज न्यायालयाने चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे, ते पाहून बरे वाटले . पण अशा गोष्टी लोकांनी केल्या पाहिजेत. न्यायालय किंवा सरकारने सांगण्याचीआम्ही वेळ का येऊ द्यावी ? गणपती बाप्पा ही ज्ञानाची देवता आहे, मग त्याच्यासमोर पडणा-या पैशातून, त्याच्या नावावर गोळा होणा-या वर्गणीतून विद्येची साधना करणा-यांना का मदत होत नाही?

सार्वजनिक गणेशोत्सवात सगळयात प्रसिद्ध असलेले मंडळ म्हणजे लालबागचा राजा. या मंडळातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातील भक्तांची झुंबड उडत असते. सोन्याचे भाव कितीही वाढो; पण येथे येणारे गणेशभक्त बाप्पाला सोन्याच्याच वस्तू वाहतात. २०१० मध्ये लालबागच्या राजाला साडेसहा किलो सोने अर्पण करण्यात आले होते, २०११ मध्ये ते सात किलो झाले. म्हणजे दरवर्षी देवाला वाहण्यात येणा-या सोन्यात वाढ होत आहे. २०१० साली १३ कोटींच्या आसपास असणा-या देणग्या गतवर्षी ३० कोटींच्या आसपास पोहोचलेल्या दिसल्या. चार वर्षांपूर्वी तर एका भक्ताने गणपतीला चक्क सोन्याचा फुटबॉल दिला होता, अगदी भलामोठा. त्याशिवाय दरवर्षी लालबागच्या राजासमोर सोन्या-चांदीच्या वस्तूंचा ढीग असतो. मुंबई-पुण्यातील अशा शेकडो मंडळांकडे भक्तांच्या हातून कोटयवधी, खरेतर अब्जावधी रुपये जमा होतात, ते कुठे जातात? हुशार मंडळवाले चार-दोन ग्रंथालय, अभ्यासिका काढल्याचे दाखवतात. पाच-पन्नास विद्यार्थ्यांना फुटकळ शिष्यवृत्त्या देऊन चांगली प्रसिद्धी मिळवतात; पण या गणपतीच्या गणसेवकांकडून ख-या विद्यार्थ्यांना आधार देण्याचे जे काम व्हायला पाहिजे ते अजिबात होताना दिसत नाही.

सध्या महाराष्ट्रातील सर्वच छोटया-मोठया शहरांत शिक्षण घेणे, हा सर्वसामान्य लोकांसाठी कठीण विषय बनत चालला आहे. त्या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांना भलेही सहामाही किंवा वार्षिक परीक्षेचा सामना करावा लागत असेल; परंतु वाढत्या महागाईने नाडलेल्या गोरगरीब आणि मध्यमवर्गीय पालकांना दर महिन्याच्या अखेरच्या काळात परीक्षेला सामोरे जावे लागते. ही परीक्षा असते खर्चाचा मेळ बसविण्याची आणि म्हणूनच कठीण.. मुंबई-महाराष्ट्रातील २५ गणेशोत्सव मंडळे एकत्र आली तर अशा गरीब घरातील किमान पाच पन्नास हजार विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च करू शकतील. तेवढयाच संख्येच्या मुलांना पदव्युत्तर शिक्षणासाठी मदतीचा हात देऊ शकतील. फक्त त्यासाठी तसा विचार केला पाहिजे. होय, दरवर्षी कोटयवधी रुपयांच्या दानाचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करणा-या शिर्डी वा सिद्धिविनायकसारख्या असंख्य श्रीमंत देवस्थांनांनीही आपल्या परिसरातील गोरगरिबांचे जगणे सुलभ करण्यासाठी ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे.

आपल्या पुराणकथा आणि वास्तवता या जगभर गाजलेल्या ग्रंथात प्रा. दामोदर कोसंबी म्हणतात, मानवी व्यक्तिमत्त्वाची अधिभौतिक पातळीवर पूर्णता, ही जेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या भौतिक गरजा भागवल्या जातील, तेव्हा पुष्कळच सुलभ होईल. त्याचा अर्थ असा की, सर्व आपत्तींचे मुख्य कारण सामाजिक आहे. सामाजिक दु:खाची मूलभूत कारणे मानवी दृष्टीपासून आता लपलेली नाहीत. त्यावरचे उपाय धर्मशास्त्रात सापडणारे नसून ते समाजवादात सापडतील; योजनाबद्ध प्रयोगांपासून मिळणा-या तार्किक अनुमानांवर आधारलेल्या प्रगत विज्ञानाचा सामाजिक सुधारणेत वापर करण्यानेच ते मिळतील. आधुनिक ज्ञान-विज्ञान जर आजकालच्या मानवी जीवनाला समृद्ध करणारे आहे, तर मग आम्ही ज्या गणेशाला त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि म्हणतो, त्याची त्याला आवडेल अशा ज्ञानमार्गाने, वैज्ञानिक साधनेने आराधना का करीत नाही? दु:ख, दारिद्रय़ आणि अनारोग्याने गांजलेला आणि सुख-समृद्धी गमावलेला आपला देश सुखकर्ता होण्यासाठी तोच एकमेव मार्ग आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2017 07:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close