महेश म्हात्रे. कार्यकारी संपादक, न्यूज18 लोकमत
राम आणि कृष्ण हे जरी पुराणातील देव असतील तरी आजही गावखेड्यातील भारतासाठी त्यांचे जीवनचरित्र उद्बोधक आणि प्रेरक आहे. राम राजपुत्र आहे तर कृष्ण गवळ्याचा पोरगा, त्यातल्या त्यात नंद राजाकडे गोकुळचे नेतृत्व असल्यामुळे कृष्णाला गोकुळात मान असे. पण काम मात्र इतर गोपाळांसारखेच, गुरे राखण्याचे. गुरे राखता, राखता कृष्णाने गोपाळांमध्ये एकी निर्माण केली, त्यांना समान वागणूक देऊन सगळ्यांना सन्मान दिला होता. खरे सांगायचे तर तशी दोघांची तुलना करता येत नाही. अर्थात गोपाळ कृष्ण आणि प्रभू श्रीराम यांची तुलना करणाऱ्या मुलायमसिंह यादव यांचा राजकीय हेतू आपण जरी समजून घेतला तरी यानिमित्ताने राष्ट्रीय पातळीवर राम आणि कृष्ण या दोन्ही व्यक्तिमत्वाचे यथायोग्य मूल्यमापन होण्यास सुरुवात झाली, हेही नसे थोडके. मला आठवतेय, ज्या पद्धतीने समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंहांनी श्रीरामाला फक्त उत्तर भारतापुरते मर्यादित करून नवा आध्यात्मिक वाद निर्माण केला, अगदी त्याच पद्धतीने, जेव्हा रामजन्मभूमी आणि मंदिर बांधण्याचा वाद पेटला होता, त्यावेळी संसदेत हाच मुद्दा उत्तर भारतातील एका खासदाराने उपस्थित केला होता, त्याला सुषमा स्वराज यांनी तेवढ्याच जोरदारपणे उत्तर दिले होते. कोणीही केवळ राजकारणापोटी राम आणि कृष्ण यांची तुलना करणे आणि आपण गप्प राहणे, हे आपल्या करंटेपणाचे लक्षण आहे. चरित्र रामाचे असो वा कृष्णाचे, त्यातून तुम्ही काय बोध घेता हे महत्वाचे. 'मुखी राम आणि कृतीत हराम', असे असेल तर काय फायदा?
ज्या रामाला मुलायमसिंह यादव कमी लेखतात, तो त्या काळातील आदर्श पुरुष होता, आपल्या वडिलांचे ऐकून तो राज्य त्याग करायला तयार झाला होता, हे सत्तेला चिकटून बसलेल्या माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवला त्यांनी कधीतरी ऐकवले असेलच ना. तसे पाहायला गेल्यास राम हा अयोध्येचा युवराज होता. ज्येष्ठ पुत्र म्हणून महाराज दशरथानंतर राज्यावर बसण्याचा अधिकार त्याला होता. पण महाराणी कैकयीच्या डावपेचामुळे राम, सीता आणि लक्ष्मण यांना १४ वर्षांचा वनवास पत्करावा लागला आणि तेथून रामाच्या जीवनप्रवासासोबत 'रामायण' आकारास येताना दिसते. महर्षी वाल्मिकींच्या लेखणीतून उतरलेल्या या महाकाव्यातील शोक, विरह, प्रेम, त्याग, संघर्ष आणि पराकोटीच्या परस्परभिन्न घटनाक्रमाने अनेकदा मन थक्क होते. ज्या सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेले श्रीराम 'सीते, सीते' असा आक्रोश करत, अक्षरश: रडत, पडत वनामध्ये फिरतात, त्याच सीतेला शुद्ध चारित्र्य सिद्ध करण्यासाठी चक्क अग्निपरीक्षा घेण्यास भाग पाडतात. ज्या सीतेने आपल्या पतीच्या सोबत १४ वर्षे वनात जाण्याचा निर्णय घेतला, त्या सीतेला अग्निपरीक्षेनंतर वनात सोडल्यावर उर्वरित आयुष्य राम अयोध्येत, राजवाड्यातच राहिले. सत्यवचनी आणि एकबाणी म्हणून ओळखले जाणारे राम, बाली-सुग्रीवाच्या युद्धात मात्र लपून बाण मारतात. रामावर आसक्त झालेल्या शूर्पणखेचे नाक कापण्यासाठी लक्ष्मणाला रामाची संमती होती का? एक ना अनेक असे वेगवेगळे घटनाक्रम रामायणात आपल्याला पाहायला मिळतात. मला त्यातील 'बालकांड' विशेष आवडतो, त्यातील रामल्लाच्या लीला मनमोहविणाऱ्या आहेत.
बाळा जो जो रे कुळभूषणा । दशरथनंदना ।
निद्रा करि बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ॥धृ॥
हा कवी विठ्ठलाचा पाळणा प्रत्येक रामनवमीच्या दिवशी आमच्या वाड्यातील राममंदिरात मिलिंदादाच्या आवाजात ऐकणे हा एक अनुभव असे. वास्तविक पाहता आपल्याकडे, तुमच्या-माझ्याप्रमाणे जीवन जगणाऱ्या कृष्णाचे खोडकर बालपण मोठ्या प्रमाणात चर्चिले जाते, पण राजवाड्यातील चार भिंतीत दडलेले रामाचे बालपण तसे फार लोकांपर्यंत पोहोचले नाही. नाही म्हणायला त्याचा चंद्र मागण्याचा हट्ट, कौसल्यामातेने आरसा दाखवून कसा पूर्ण केला होता, ही गोष्ट आईच्या तोंडून ऐकली होती, पण त्यावरून त्याचा साधेपणा लक्षात येतो. लबाड कृष्णाला असे कोणाला 'पटवता' आले नसते. कृष्ण लहान होता, अगदी छोटा, त्या वेळी आईने आकाशातील इंद्राला नैवेद्य दाखवणे त्याला आवडले नव्हते. तो यशोदा मैयाला उद्देशून म्हणाला, 'आई गं, तो आकाशातला देव थोडीच हा नैवेद्य खाणार आहे? किती छान पदार्थ केले आहेत गं... चल आण तो नैवेद्य, मीच खातो.' कृष्ण फक्त बोलून थांबला नाही, तर त्याने तो नैवेद्य फस्तही केला आणि आईला म्हणाला, 'आता या गोवर्धन पर्वताची पूजा कर. हाच आपल्या गायी-गुरांना चारा-पाणी देणारा खरा देव.' कृष्णाच्या त्या आगळिकीने इंद्रदेव रागावला. त्याने पाऊस, धारांचा, गार गारांचा वर्षाव करून अवघ्या गोकुळवासीयांना छळण्यास सुरुवात केली; पण बोलणारा कृष्ण लढणाराही होता. त्याने स्वत:च्या करंगळीवर गोवर्धन उचलून धरला. दुबळ्या गोपाळांचा त्या पराक्रमात सहभाग असावा म्हणून त्यांना आपल्या काठ्यांवर गोवर्धन तोलण्याची विनंती केली. श्रीकृष्णाच्या त्या धाडसाला, आगळिकीला आपोआपच लोकलढ्याचे रूप आले आणि इंद्रदेव हरला. कृष्ण तिथेच थांबला नाही. त्याने आपल्या घरातील दह्या-दुधाच्या मडक्यांवर गोरगरीब गोपाळांचाही हक्क असल्याचे मान्य केले.
तसे पाहिले तर तो नंद राजाचा मुलगा होता. त्याने लोणी खावे म्हणून त्याची आई त्याच्या मागे असे; पण त्याने दहीहंडी फोडायची सुरुवात केली पेंद्या, म्हाद्या, गोंद्या या आपल्या सवंगड्यांसाठी. आज आमच्या देशात खेड्यापासून मोठ्या शहरापर्यंत कुपोषणाने थैमान घातलेले दिसते. जगातील दहा कुपोषित बालकांपैकी चार मुले भारतीय असतात. गरीबांच्या घरातील पोराबाळांना चांगलेचुंगले खायला मिळाले तर ते कोणताही 'गोवर्धन' उचलू शकतात, हे कृष्णाने हजारो वर्षांपूर्वी ओळखले होते, ते आमच्या राजकारण्यांना आजही कळत नाही. बालपणी इतरांचा विचार करणारा हा कृष्ण मोठा झाल्यावरही इतरांसाठीच जगला. अत्याचारी कंसाला धडा शिकवून तो मथुरेचा राजा बनू शकला असता, पण त्याने आजोबा उग्रसेनाला त्यांचे राज्य परत दिले. द्वारकेतही त्याचे मन रमले नाही. गोकुळ, मथुरेपासून सुरू झालेला त्याचा तो प्रवास पार हस्तिनापुरापर्यंत झाला, पण दुसऱ्यांसाठी. कधी गोपाळ, कधी पांडव, तर कधी यादवांच्या हिताची काळजी घेत कृष्ण जगला. लोकांना त्याची रासलीला आणि राधाप्रेमाची कथाकाव्ये ठाऊक आहेत. त्याची कपटकारस्थाने आणि रणछोडदासपणाच्या कहाण्या लोक रंगवून सांगतात, पण कृष्ण जी कोणती गोष्ट करायचा, ती तन्मयतेने, प्रेमाने, निष्ठेने आणि आनंदाने करायचा हे आपण विसरतो. द्रौपदीची भरसभेत विटंबना होत असताना सगळ्या 'पुरुषांनी' भरलेल्या त्या सभागृहात द्रौपदीच्या मदतीला धावून आला फक्त पूर्णपुरुषोत्तम श्रीकृष्ण... म्हणून मला कृष्ण खूप आवडतो, भावतो, पण म्हणून मी त्याची राम किंवा शिवशंकराशी तुलना नाही करत. आपल्या समाजमनात घर करून बसलेले हे राम-कृष्ण वा शिव प्रत्यक्षात होऊन गेले की नाहीत, यावर तज्ज्ञ-विचारवंत आणि अभ्यासक खूप चर्चा करीत असतात. त्यांच्या कोण मोठे, कोण छोटे यावर वाद करतात. आपल्याला त्या वादात पडण्याचे कारण नाही; पण कृष्णाने द्रौपदीची इज्जत वाचवली होती, यावर भारतातील तमाम आया-बहिणींचा विश्वास आहे. म्हणूनच असेल कदाचित आजही यमुना नदीच्या काठावर वृंदावनक्षेत्री एका झाडाला भाविक बायका ओढणी किंवा रुमाल बांधतात. द्रौपदीचे दुष्ट हातांपासून रक्षण करणारा कृष्ण आपला सखा, भाऊ, बाप बनून पाठराखण करो, हीच कामना त्यामागे असते... आज दिल्लीत, मुंबईत, ठाण्यात, पुण्यात, रेल्वेत, शेतात, घरात, ऑफिसात भीतीने वावरणाऱ्या महिलांना ५ हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या कृष्णाचा आधार वाटतो.. दर पाच वर्षांनी निवडून येणाऱ्या लोकशाहीतील लोकांच्या सरकारने त्यापासून काही तरी बोध घ्यावा... खासकरून कृष्णाच्या नावावर राजकारण करणाऱ्या यादवांनी ही गोष्ट विसरून चालणार नाही.
आपल्या एका आयुष्यात विविधरंगी भूमिका समरसून पार पाडणाऱ्या श्रीकृष्णाने भारतीय समाजमनाला गेल्या हजारो वर्षांपासून कर्मप्रवण केलेले आहे, हे कोणीच अमान्य करणार नाही. मथुरेपासून सुरू झालेला त्याचा जीवनप्रवास महाभारत युद्धाच्या काळात परमोत्कर्षाला पोहोचला होता. त्याच्या जीवनकाळातच लोकांनी त्याला 'देवत्व' बहाल करण्याचा प्रयत्न केला, पण कृष्ण कशाच्याही आहारी गेला नाही, तो सामान्य माणसासारखा जगला आणि सामान्य माणसासारखाच मृत्यूला सहजपणे सामोरा गेला. आपल्या सबंध आयुष्यात त्याने अनेक गोष्टी केल्या. दुष्टांचा संहार केला, युद्धात सत्याच्या विजयासाठी झटला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भगवद्गीतेसारखा जीवन-तत्त्वज्ञान सांगणारा अनमोल ठेवा मानवजातीला दिला. तरी कृष्णाचा उत्सव साजरा करायचा असेल तर एक तर गोपालकाला साजरा करतात किंवा रास गरबा खेळतात. कारण समाजातील गोरगरीबांच्या मुलांपर्यंत दा-दुधाचे, पौष्टिक लोण्याचे हंडे गेले पाहिजेत ही हंडी फोडण्यामागील कृष्णाची भावना होती. रास-गरबा नाचण्याच्या निमित्ताने कृष्णामार्फत गोकुळातील गौळणींना घराबाहेर पडण्याची संधी मिळाली होती. आजही लाखो भारतीय घरांमध्ये आया-बहिणींना नृत्याचा आनंद हवा असेल तर कृष्णाच्या रास-गरब्याचा बहाणाच उपयोगी पडतो, पण गेल्या दोनेक दशकांपासून आम्ही गोकुळाष्टमी आणि नवरात्रोत्सव या दोन्ही उत्सवांचा मूळ हेतू नाकारून त्यांचा 'बाजार' मांडलाय. अवघे आयुष्य माणसाला माणूसपण कसे सांभाळणे गरजेचे आहे, याची शिकवण देणाऱ्या कृष्णाला विसरून गेल्यामुळे या उत्सवातील माणुसकी साफ विरून गेलेली दिसते. दहीहंड्या फोडणाऱ्या तरुणाईचा आपल्या राजकारणासाठी, अर्थकारणासाठी वापर करणाऱ्या मंडळींनी या उत्सवाचा 'इव्हेंट' केला. तेथे सगळ्या नको त्या गोष्टींची गर्दी वाढली. परिणामी सगळाच उत्सव भलत्याच 'थराला' गेला.
कृष्णाने आपल्या गोरगरीब सवंगड्यांना दूध-लोणी मिळावे म्हणून सुरू केलेल्या या हंडी फोडण्याच्या प्रकाराला विचित्र वळण लागल्याने अल्पवयीन मुले मरू लागली आहेत. दरवर्षी दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात जखमी होणाऱ्या मुलांची संख्याही वाढत आहे. न्यायालयाने हा सगळा 'अमानवी' खेळ नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारला आदेश दिले आहेत. पण तरीही त्यातील अनिष्ट प्रकार काही थांबत नाही. राम काय आणि कृष्ण काय, समजून ना घेता आपण त्यांच्यामागे गेलो तर हे असे होणारच. प्रभू राम किंवा शिव भगवंताच्या जीवनापेक्षा श्रीकृष्ण चरित्र ही मोठी भन्नाट गोष्ट. काळोख्या रात्रीचे अनंत कृष्णरंग एका विश्वव्यापी पटलावर आपल्या डोळ्यादेखत चितारले जावेत, त्या अरूपाच्या रूपदर्शनाला बासरीच्या सुरावटीची जोड लाभावी, शरीराच्या प्रत्येक पेशीला डोळे फुटावेत, बासरीचे स्वर रोमारोमांत प्रतिध्वनित व्हावेत आणि हे विश्वरूपदर्शन हिमालयातील गंगौधाप्रमाणे स्वच्छ वितळून मनाच्या अबोध गुहेत बोधप्रदीप्त व्हावे... अगदी तसाच कृष्ण मला भेटत गेला. त्याच्या चरित्रलीलांच्या चमचमत्या चमत्कारांनी कधी डोळे दिपायचे तर कधी त्याचे प्रेमवेडे रूप मन मोहून टाकायचे. आमच्या वाड्यातील विठ्ठल मंदिरात कृष्णजन्माचे कीर्तन रात्री दहानंतर सुरू व्हायचे, त्या काळात खरे तर रात्री दहाला सामसूम होत असे. रात्रीच्या पाऊसभरल्या गाभाऱ्यात टाळ-मृदंगांच्या तालावर कृष्णकथा रंगायची, बाळकृष्णाच्या भक्तीचे अभंग कळायचे वय नव्हते, पण त्याच्या खोडकरपणाच्या कथा ऐकताना मन आपोआप त्याच्याकडे खेचले जायचे. खरे तर 'कृष्ण' या शब्दाचा एक अर्थ आहे, 'आकर्षित करणारा' हे लहानपणी ठाऊक नव्हते, पण मोठेपणी कृष्ण थोडा, थोडा कळू लागला. त्या वेळी मनाला भावला त्याचा करुणाकार स्वभाव.
साधारणत: येशू ख्रिस्त किंवा गौतमबुद्ध यांच्या करुणामयी वागणुकीचे आपल्याकडे नेहमी कौतुक होते. माझा कृष्णही तसाच अफाट करुणामयी. जेव्हा अठरा औक्षहिणी सैन्य महाभारत युद्धात दंग होते, तेव्हा सूर्यास्तानंतर, युद्ध थांबायचे आणि भगवान कृष्ण युद्धस्थळी जखमी झालेल्या पांडव आणि कौरव या दोन्ही पक्षांच्या सैनिकांची, हत्ती-घोड्यांची सेवा-सुश्रूषा करण्यात मग्न असायचा. त्याचे साधेपण इतके जीवघेणे की, त्या काळात अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या राजसूर्य यज्ञात जेव्हा आहुती देण्याचा पहिला मान कृष्णाला देण्याचा निर्णय झाला, तेव्हा हा पठ्ठ्या त्या मोठ्या राजा-महाराजांच्या बैठकीतून निघून गेला होता. त्याला शोधायला लोक गेले तेव्हा कृष्ण जेवणाच्या पंगतीतील खरकटे साफ करताना दिसला होता. आपल्याकडे कृष्णाच्या या सद्वर्तनाची फार क्वचित दखल घेतली जाते. आम्हाला मात्र भावतात, आवडतात त्याच्या अनंतलीला... बाललीला... रासलीला होय, आजही श्रीकृष्णाचे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येते दहीदुधाची चोरी करणारी, गोपिकांची मस्करी करणारी खोडकर बालमूर्ती, तर कधी डोळ्यासमोर येतो गोपिकांच्या गराड्यात एक पाय दुमडून बासरी वाजवण्यात तन्मय झालेला लावण्य सुकुमार श्रीरंग. श्रीकृष्ण चरित्राचे हे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे की, ते ज्याला जसे हवे तसे पाहायला मिळते. श्रीरंगाचा प्रत्येक रंग मन मोहून टाकणारा. जणू काही कॅलिडोस्कोपच. लहानपणी एका त्रिकोणी नळीत विविधरंगी काचेचे तुकडे टाकून धक्क्यानुसार बदलणारे त्यांचे आकार पाहणे मजेशीर वाटायचे. कृष्णचरित्रही तसेच विलक्षण प्रवाही, प्रत्येक टप्प्याला बदलणारे आणि पाहणाऱ्याला बदलविणारे.
आपल्याकडे कृष्णाच्या बाललीला आजही तितक्याच प्रेमाने, तन्मयतेने गायल्या जातात. तसे पाहिले तर आजही लाखो मातांना त्यांच्या बाळांच्या रूपात भेटणारा कृष्ण अभागी होता. दुष्ट कंसाच्या कारावासात अडकलेल्या आई-वडिलांच्या पोटी तो जन्मला आणि जन्मताच त्यांच्यापासून दूर फेकला गेला. नंद राजा आणि यशोदा मैयाने त्या जगन्नाथाला 'सनाथ' केले होते, पण मोठेपणी आपले जन्मदाते आई-वडील कोण हे कळल्यानंतर कृष्णाला कधी तरी वसुदेव-देवकीची तीव्र आठवण आलीच असेल. हस्तिनापुरातील राजकीय खलबतांत व्यग्र असताना किंवा महाभारताच्या महायुद्धात त्याला राधेचे रुसणे, पेंद्याचे बोबडे बोलणे आठवलेच असेल, पण श्रीकृष्ण म्हणजे मूर्तिमंत अनासक्ती. गीतेतूनही त्याची ही शिकवण सर्वसामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवते, म्हणून कृष्ण रामापेक्षा, शिवशंकरापेक्षा वेगळा. अर्थात भोलेबाबा शंकर आणि अयोध्यापती श्रीराम यांची तुलना श्रीकृष्णाशी होऊच शकत नाही, कारण राम हा 'मर्यादा पुरुषोत्तम' म्हणून ओळखला जातो. त्याच्या प्रत्येक वर्तनाला नीती-नियमांची मर्यादा किंवा 'सीमा' आहे, तर शिवशंकराला कुठल्याच सीमांचे बंधन नाही. त्याच्या सहस्र नामावलीतील एक नाव आहे 'असिम' आणि श्रीकृष्ण म्हणजे नियमांत राहून नियमबावागणारा, जगावेगळा, मोकळा-ढाकळा पूर्ण पुरुषोत्तम...
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जर्मनीतील ऱ्हाईन नदीच्या काठावरील कलोन या शहरात एका संध्याकाळी मी भटकत होतो. शनिवार असल्यामुळे नदी तिरावरील रेस्टॉरंट्स गर्दीने ओथंबलेले होते. अचानक माझी नजर एका युरोपियन माणसाकडे गेली. त्याने चक्क धोतर-कुर्ता घातला होता, कपाळावर वैष्णव गंध रेखलेले, गळ्यात तुळशीची माळ. मी ओळखले, तो 'हरे राम-हरे कृष्ण पंथा'चा होता. नजरानजर होताच मी सहजपणे उद्गारलो, 'हरे कृष्णा' त्यानेही उत्साहित होऊन गजर केला 'हरे कृष्णा'. 'तू भारतीय आहेस का?' मी, 'हो' म्हणालो. मग जुजबी चौकशी झाली. तेवढ्यात एक ढगळ साडी नेसलेली स्त्री आली. बहुधा त्याची मैत्रीण असावी. त्यांचे फ्रेंचमध्ये संभाषण सुरू झाल्यावर मी हळूच नदीच्या दिशेने जायचा विचार करीत होतो. तेवढ्यात तो म्हणाला, 'आता तू इथे आलाच आहेस, तर थोडा उजवीकडे जा, राधा-रासबिहारीजींची पालखी आली आहे.' माझी पावले आपोआप तिकडे वळली. काही भारतीय, काही आफ्रिकी आणि बहुतांश युरोपीय वंशाचे तरुण राम - कृष्ण नामाचा महामंत्र गात - नाचत होते. लगतच्या ऱ्हाईन नदीच्या पात्रावर मृदंगाच्या खणखणीत आवाजाचे तरंग उमटत होते. एका झाडाखाली छोटीशी पण आकर्षकपणे सुशोभित केलेली पालखी विसावली होती. कृष्णाच्या सुबक मूर्तीकडे माझी नजर गेली. यमुनेच्या तिरावर वाढलेला कृष्ण जर्मनीतील ऱ्हाईन नदीच्या तिरावर निवांतपणे बसला होता. त्याच्या शेजारी लोभस राधा होती, पण अवघ्या आसमंताला भारून टाकणारा मंत्र मात्र 'हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे'च्या गजरात, राम आणि कृष्ण वेगळे नाहीत, याची वारंवार आठवण करून देत होता. मुलायमसिंह यादवांना कुणीतरी हा मंत्र ऐकवेल का?
(समाप्त)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.