S M L

राम आणि कृष्णाची तुलना कशी कराल?

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांनी श्री रामाला फक्त उत्तर भारतापुरते मर्यादीत करून नवा अध्यात्मिक वाद निर्माण केलाय. उत्तर भारतातल्या याच अध्यात्मिक राजकारणावर न्यूज18 लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांनी लिहिलेला हा अभ्यासपूर्ण ब्लॉग

Chandrakant Funde | Updated On: Nov 21, 2017 08:14 PM IST

राम आणि कृष्णाची तुलना कशी कराल?

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, न्यूज18 लोकमत

राम, तुम्हारा चरित स्वयं ही काव्य है।

कोई कवि बन जाय, सहज संभाव्य है।


पं. मैथिलीशरण गुप्त यांची ही काव्यपंक्ती प्रभू श्री राम यांच्या जीवनचरित्राचा अवघा चित्रपट आपल्या डोळ्यासमोर आणण्यासाठी पुरेशी आहे. अवघ्या भारतवर्षाला आणि जेथे - जेथे भारतीय लोक गेले त्या सगळ्या परिसराला रामायणाने भुरळ घातली. रामचरित्र स्थळ - काळाच्या मर्यादेपलीकडे पोहोचलेले आहे हे आपल्याला इंडोनेशिया, व्हिएतनाम, कंबोडिया, मलेशिया, थायलंड, लाओस, श्रीलंका, चीन आदी अनेक देशांमधील 'रामप्रभावा'मुळे लक्षात येते. परंतु उत्तर भारतात जन्मलेल्या मुलायमसिंह यादव यांना मात्र राम हा उत्तर प्रदेश पुरता मर्यादित आहे, असे वाटते. मुलायम सिंह यादव यांच्या मते श्रीरामाची पूजा फक्त उत्तर भारतात केली जाते तर श्रीकृष्णाची पूजा देशभरात केली जाते. श्रीराम हे आपले आदर्श आहेत हे मान्य आहे. मात्र श्रीकृष्णाने समाजातील प्रत्येक घटक हा समान मानला त्याचमुळे कृष्णाची पूजा देशभरात केली जाते तर श्रीरामाची पूजा फक्त उत्तर भारतापुरती मर्यादित आहे, असे उद‌्गार काढून मुलायम सिंहांनी एक नवाच वाद निर्माण केला आहे. २०१९च्या लोकसभा निवडणूक समोर ठेवून देशातील राजकीय समीकरणे, ध्रुवीकरणे आकारास येत आहेत. आता महापुरुषांपाठोपाठ राम आणि कृष्ण या पुराणातील देवांना आधुनिक युगातील राजकारणात महत्वाच्या भूमिका मिळतायत. त्यामुळेच श्रीराम आणि श्रीकृष्णाला आपलेसे करण्यासाठी भाजपसमोर समाजवादी पार्टीसुद्धा उभी राहताना दिसतेय.

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत होत असलेली मोदी-शहांची दमछाक पाहता, २०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीत भाजप अयोध्येतील श्रीराम मंदिर पूर्ण करण्यासाठी आक्रमक होईल अशी चिन्हे सध्या दिसतायत. राजकारणातील हे नवे वारे पाहून देशातील सर्वाधिक खासदार देणाऱ्या उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाने आपसातील 'यादवी' विसरून आता कृष्णाचा मुद्दा पुढे आणला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या श्रीरामाच्या १०० फुटी पुतळ्याच्या घोषणेपाठोपाठ माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी श्रीकृष्णाचा ५० फूट उंचीचा पुतळा स्थापण्याची घोषणा केली केली आहे आणि यादव कुलपुरुष मुलायम सिंहांनी चक्क राम हा कृष्णापेक्षा कमी महत्वाचा, फक्त उत्तर भारतापुरता मर्यादित असणारा, अशी तुलना केली आहे. ते ऐकल्यावर तर हसावं की रडावं असे वाटले. कारण मुलायम सिंहांनी अन्य कोणाचे ऐकण्यापेक्षा त्यांचे राजकीय गुरू राम मनोहर लोहिया यांनी प्रभू श्रीराम, कृष्ण आणि शिव यांच्यावर केलेले भाष्य वाचले असते तरी त्यांच्या तोंडून असे निरर्थक उद‌्गार निघाले नसते. आज आपल्या शिष्योत्तमाचे हे उद‌्गार ऐकायला लोहियाजी जिवंत असते तर, 'हे राम' म्हणून डोक्याला हात लावून बसले असते.

Loading...
Loading...

राम हा आपल्या जगण्याचा आधार आहे. अगदी मरण्याचासुद्धा आधार रामच आहे. जर तो फक्त उत्तर प्रदेशापुरता मर्यादित असता, तर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक अंत्ययात्रेत रामनाम घुमले नसते.

तसे पाहायला गेलो तर राम-कृष्ण आणि शिव तिन्ही देवांमध्ये राम सगळ्यात लोकप्रिय आणि लोकमान्य. भारतातील काही राज्य वगळता तुम्ही कुठेही गेलात तर 'रामराम', 'जय रामजी की' आदी अभिवादनानेच संभाषणाला सुरुवात होते. कारण आमच्या समाजात मर्यादा पुरुषोत्तम राम हाच आदर्श मानला जातो. राम हा आदर्श पुत्र आहे, बंधू आहे, सखा आहे, खारीची काळजी घेणारा प्रेमळ माणूस आहे. मुख्य म्हणजे तो सामाजिक चौकट मानणारा आहे. त्यामुळेच असेल कदाचित सबंध गुजरात ज्या कृष्णाला भजतो, तो बिनधास्त, धडाकेबाज श्रीकृष्ण घेऊन महात्मा गांधी स्वातंत्र्य चळवळीत उतरले नाहीत. त्यांनी प्राधान्य दिले श्रीरामाला.

अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी राम आपल्या हृदयात आणि ओठांवर जपला होता. समजा, गांधीजींनी रामाऐवजी श्रीकृष्णाची बंडखोरी, संयम, जिद्द, प्रेम, करुणा, आस्था, धैर्य, शौर्य आणि कूटनीती यांचा पुरस्कार केला असता, तर कदाचित आजच्या भारताचे चित्र वेगळे दिसले असते. आम्ही ज्या मर्यादा पुरुषोत्तम रामाला जास्त मानले, तो प्रभू राम हा मानवातून देवत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करणारा होता. त्याउलट श्रीकृष्ण म्हणजे वारंवार आपले माणूसपण सिद्ध करणारा पूर्णपुरुषोत्तम. भागवत पुराणात असे म्हटले आहे की, रामाचा त्रेतायुगातील अवतार आठ कलांचा, तर कृष्णाचा द्वापारयुगातील अवतार हा सोळा कलांचा आहे, म्हणून तो सगळ्या पुरुषांमध्ये उत्तम. अगदी बालपणापासून तर जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत कृष्ण माणसासारखा वागला. फक्त माणसांशीच नव्हे तर सकल प्राणिमात्रांशी तो माणुसकीने वागला, म्हणून कृष्ण आमच्या सगळ्या देवांमध्ये वेगळा दिसतो.

रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांनी अवघ्या भारतवर्षाला उभ्या-आडव्या धाग्यांनी गुंफले आहे. राम हा रामायणाचा नायक, तर कृष्ण हा महाभारताचा कर्ता. रामायण आणि महाभारत यात रामायण हे इसवी सन पूर्व पाचव्या ते पहिल्या शतकात लिहिले असावे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महाभारतात सती प्रथा दिसते, पण रामायणात तिचा उल्लेख नाही, यावरून रामायण हे महाभारतापूर्वी लिहिले असावे असे मानता येते. पण प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या संशोधनानुसार गुप्तकाळात असणारी युद्धसज्जता, आर्थिक स्थिती यानुसार महाभारत युद्धाचा, पर्यायाने भगवद‌्गीता लेखनाचा काळ हा इसवी सन पहिल्या शतकाच्या आसपास असू शकतो. रामायण या शब्दाचा अर्थ रामअयन=रामायण म्हणजे "रामाची कथा" अशा अर्थाने येतो. 'अयन' म्हणजे मार्ग या अर्थाने सीता शोधनाकरिताची रामाची वाट... किंवा त्या वाटेवर घडलेल्या घटना या अर्थानेही असल्याचे सांगितले जाते. रामाचा प्रवास वनवासाच्या निमित्ताने उत्तरेतील अयोध्येपासून सुरू होतो, तो थेट दक्षिणेच्या रामेश्वरपासून लंकेपर्यंत जातो. तर कृष्णाचा प्रवास उत्तरेतील गोकुळ - मथुरेपासून सुरू होतो, तो गुजरातेतील द्वारका, विदर्भ, दिल्ली - इंद्रप्रस्थपासून अगदी मणिपूरपर्यंत अगदी इतिहास घडत, घडवत पुढे जात राहतो. तरीही आपल्याकडे रामायण, महाभारत, गीता या तीन महत्वपूर्ण काव्याच्या डझनावारी प्रति सापडतात.

अनेक भाषांमध्ये जाताना या महाकथानी वेगवेगळी वळणे घेतलेली दिसतात. त्या विदेशात गेल्यावर अनेक स्थानिक कथा, दंतकथांनी त्यात जागा पटकावली. प्रत्येक ठिकाणी ऐकणाऱ्याच्या मनोभावाप्रमाणे राम-कृष्ण रुजले, काही ठिकाणी लोकांनी त्यांना वगळून महाकाव्यात नवे नायक शोधले. अगदी रावण, मेघनाद, युधिष्ठिर, अश्वत्थामा, एकलव्य आदींना नायकत्व बहाल करणाऱ्या कथाकाव्याचा उदय झाला. बालीमध्ये चक्क कुंतीच्या भोवती संबंध महाभारत फिरते, आपल्याकडे ज्याला फार महत्व दिले जात नाही, तो पाच पांडवांपैकी सहदेव हा तेथील कथेचा नायक आहे. व्हिएतनाममध्ये इसवी सन तिसरे ते पाचवे या काळात राज्य करणाऱ्या चाम राजाच्या एका राजधानीचे नाव अयोध्या होते. आजही ही अयोध्या थायलंड-मलेशियामध्ये वेगळ्या स्वरूपातील राम-सीतेसह टिकून आहे. एकूण काय तर या दोन्ही महाकाव्यांनी हजारो वर्षांपासून भारतीय समाजमनाला मोहवलेले दिसते. त्या महाकाव्यांमध्ये असणाऱ्या नायक-नायिकांच्या अस्तित्वाचे पुरावे आपल्याला देता येणार नाहीत.

जसे अडीच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या तथागत गौतम बुद्ध आणि जैन तीर्थांकरांच्या असण्याचे असंख्य ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. पण जरी राम-कृष्ण किंवा शिवाच्या असण्याचे बाह्य पुरावे दिसत नसतील तरी अवघ्या भारतवर्षावर उमटलेली नाममुद्रा पृथ्वीच्या अंतापर्यंत टिकून राहील हे देखील वास्तव नाकारता येणार नाही. त्यामुळे रामायण-महाभारत कोणत्याही भाषेत असो, गद्य - पद्य स्वरूपात असो, नाटक किंवा कथारूपात असो, त्याच्या प्रत्येक पिढीत नव्या आवृत्त्या निघत राहिल्या, पुढेही निघत राहतील. कोणी त्यातील कथेने भुलून गेले तर, कुणाला त्यात ज्ञानाचा मार्ग दिसला, कुणासाठी त्यात भक्तीची वाट सोपी करून दाखवलेली दिसते. अगदी एका श्लोकात हे महाकाव्य 'घागरमध्ये सागर' या न्यायाने लोकांपर्यंत जात राहिले.

आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनम्

वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् ।

वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनम्‌

पश्चात् रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम्॥

रामायण-महाभारताच्या प्रदीर्घ परंपरेने भारतचे आध्यात्मिक सत्त्व जपलेले आहे, म्हणून राम-कृष्ण लोकांच्या मनात 'घर' करून राहिले. आजही मरताना आपल्या मुखी रामाचे नाव यावे यासाठी लोक आपल्या मुलांची नावे 'रामा'वरून ठेवतात, अगदी विश्वाचा संहारक भोलानाथ शिवसुद्धा रामनामाचा जप करत असतात. हे ठाऊक असूनसुद्धा मुलायम सिंहांनी देखील आपल्या मुलाचे नाव त्यांच्या आवडत्या कृष्णाच्या नावानुसार न ठेवता अखिलेश, या शिवशंकराच्या नावावरून का ठेवले, याचे कारण मुलायम सिंहांना सांगता येईल काय?

(भाग एक)

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 21, 2017 08:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close