'संताप मोर्चा'च्या माध्यमातून मनसेला नवसंजीवनी मिळेल ?

'संताप मोर्चा'च्या माध्यमातून मनसेला नवसंजीवनी मिळेल ?

मुंबईत राज ठाकरेंनी रेल्वेविरोधातील काढलेल्या संताप मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. पण या मोर्चामुळे मनसेला खरंच नवसंजीवनी मिळणार का ? हाच खरा प्रश्न आहे. यावरच आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांनी लिहिलेला हा परखड ब्लॉग...

  • Share this:

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

अनेक समस्यांनी तप्त असलेल्या मुंबईत आज राज ठाकरेंचा संतप्त मोर्चा निघालेला दिसला. अगदी विशेष तयारी न करता निघालेल्या या मोर्चाचं स्वरुप अर्थातच विराट असं होतं, कडक उन्हाचा कहर सहन करीत लोक झपाटल्यासारखे राज ठाकरेंच्या पाठीमागे धावताना दिसत होते, झेंडे, फलक फडकावून घोषणा देत होते. याआधी मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने मुंबईने अशी गर्दी पाहिली होती. मनसेच्या मोर्चाची क्षमता जरी कमी असली तरी त्यातील उत्स्फूर्तता आणि ऊर्जा अफाट असल्याचे जाणवत होते. त्यामुळेच कदाचित भाजप सरकारने या संताप मोर्चाचा 'शॉक' घेऊन राज्यभरातील वीज घालवली असावी. स्वत: राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात या 'वीजबंदी'चा उल्लेख केला आणि आपण या अशा बंदीला जुमानत नाही हेही ठणकावून सांगितले. नजीकच्या काळात गुजरातेत हार्दिक पटेलचे 'पाटीदार आंदोलन' जसे जोर धरत गेले तशी त्या-त्या भागात 'इंटरनेट बंदी' लागू होत होती, तरीही ते आंदोलन शमले नाही, उलट ते अधिक वाढले हे आपण अनुभवले आहे, त्यामुळे महाराष्ट्रात आलेले हे नवे 'वीजबंदी'चे स्तोम भाजप - सेना सरकारला फारसे उपयोगाचे ठरणार नाही. उलट या 'संताप' उद्रेकाने गेल्या ३ वर्षांपासून हळूहळू विझत चाललेल्या मनसेला नवसंजीवनी मिळेल.

मुंबईत निघालेल्या मनसेच्या या रेल्वे समस्यांवरील मोर्चाच्या निमित्ताने मला आज राज ठाकरे यांनीच 1993 साली काढलेल्या महामोर्चाची आठवण झाली. शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूर विधिमंडळ अधिवेशनात त्यांनी हा मोर्चा काढला होता. 27 लाख बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं. त्या लाखोंच्या संख्येने निघालेल्या बेरोजगार मोर्चापासूनच शिवसेनेत राज ठाकरे हे दुसऱ्या क्रमांकाचे नेतृत्व म्हणून प्रस्थापित झाले होते. अगदी शिवसेना-भाजप युती सत्तेवर आली, त्या १९९५च्या विधानसभा निवडणुकीतही ग्रामीण भागातील प्रचाराची धुरा राज यांच्या खांद्यावरच होती, त्यामुळे युती सरकारमध्ये राज ठाकरे यांना मानणाऱ्या मंडळींना प्रतिनिधित्व मिळाले होते. पण किणी प्रकरणाने राज ठाकरे यांच्या राजकीय भविष्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचा त्रास त्यांना कायम होत राहिला. तरीही राज यांना सेनेच्या वर्तुळात बाळासाहेबांचा राजकीय वारसदार म्हणूनच ओळखलं जायचं, पण १९९७-९८ सालापासून शिवसेनेत उद्धव ठाकरेचं नेतृत्व जाणिवपूर्वक पुढे आणलं गेलं.

मनोहर जोशी प्रभुतींनी त्यासाठी खास पुढाकार घेतला. 2003 ते 2006 या कालावधीत पक्षनेतृत्वाकडून सातत्याने राज यांना डावलण्याचे काम सुरू होतं. त्यावर शिक्कामोर्तब झाले २००३ च्या महाबळेश्वर येथील शिवसेनेच्या कार्यकारिणीत. त्या बैठकीत अगदी राज ठाकरेंनाच कार्याध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव सुचवण्यास भाग पाडलं गेलं. मग ३ वर्षांनी यासर्व पक्षांतर्गंत घडामोडींचा परिपाक म्हणून मग स्वतः राज ठाकरेंनाच शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं. तिथून पुढे मग त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अर्थात मनसेची स्थापना कशी केली, हा सर्व ताजा राजकीय इतिहास आपणा सर्वांना ठाऊक आहेच. पण आता हे सर्व आठवण्यामागचं कारण म्हणजे, 1993 सालचा राज ठाकरेंचा मोर्चा जो मी बातमीदार म्हणून 'कव्हर' केला होता. तो मोर्चा आणि आजचा हा मनसेचा मोर्चा पाहता तरुणांच्या मनातली राज ठाकरेंविषयी क्रेझ अजूनही कायम आहे, हेच सिद्ध होतं. किंबहुना गेल्या 4-5 वर्षांत मनसेची जी काही पडझड झालीय, त्यातून बाहेर पडण्यासाठी आजचा हा मोर्चा निश्चितच मनसेसाठी मोठी संजीवनी ठरण्याची शक्यता आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही.

नागपुरात बेरोजगारांसाठी काढलेल्या 1993 सालच्या मोर्चाने राज ठाकरेंना राजकीय अस्तित्व मिळवून दिलं होतं, तर आजच्या मोर्चाने मनसेला नवचैतन्य मिळवून दिलंय. त्यामुळे मधल्या काळात राज ठाकरे संपले म्हणणाऱ्यांसाठी त्यांनी आपण संपलो नाही तर आता संतापलो आहोत, हेच एकप्रकारे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. गेल्या महिन्या, दोन महिन्यांत सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदीं आणि भाजप सरकारच्या विरोधात जी काही असंतोषाची लाट निर्माण होऊ पाहतेय. त्यावर स्वार होऊन आपला राजकीय जनाधार पुन्हा मिळवण्याचं 'टायमिंग' राज ठाकरेंनी अगदी अचूकपणे साधलंय हेच यावरून सिद्ध होतंय. किंबहुना या अचूक टायमिंगसाठीच राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखले जातात. त्यांच्याइतकं अचूक टायमिंग साधण्याचं कसब असलेला दुसरा नेता सध्या दाखवता येणार नाही. सार्वजनिक राजकीय जीवनात कधी आणि कुठे काय बोलावं, याचं भान राज ठाकरेंइतकं महाराष्ट्रात तरी दुसऱ्या कोणत्याच नेत्याला नाही, कदाचित म्हणूनच राज ठाकरेंच्या या संताप मोर्चाला परवानगी नसतानाही तो अडवण्याची हिंमत राज्य सरकार दाखवू शकलेलं नाही. कारण राज्यात सध्या सगळीकडेच सरकारच्याविरोधात संतापाची मोठी लाट आहे. याच सरकारविरोधी सुराला वेळीच आवाज देण्याचं अचूक टायमिंग राज ठाकरेंनी पुन्हा साधलंय. त्याला निपुटपणे ऐकण्याशिवाय पर्याय नाही हे राज्य सरकारला मान्य करावंच लागलं. हेच राज यांचे वेगळेपण आहे.

तसं पाहिलं तर बाळासाहेबांनी उद्धव आणि राज यांना सारखंच वाढवलं, पण आपल्या काकाचे नेतृत्वगुण उचलण्यात राज ठाकरे नेहमीच पुढे राहिलेत. मला चांगलं आठवतंय. राज ठाकरेंनी मला एकदा त्यांच्या लहानपणीचा किस्सा सांगितला होता. तो असा की, राज ठाकरे तेव्हा 5 वर्षांचे होते. ते तेव्हा आपल्या काकांसोबत म्हणजेच बाळासाहेबांसोबत शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्याला जाणार होते. त्यावेळी त्यांनी आपल्या काकांनी शिवलेला जोधपुरी सूट पाहून स्वतःलाही अगदी हट्टाने तसाच सूट शिवून घेतला होता. त्याकाळी वसंतराव नाईक तशा पद्धतीचा सूट वापरत असत. तर इथं सांगायचा मुद्दा इतकाच की, अगदी लहानपणापासूनच राज ठाकरेंनी आपल्या काकांचे नेतृत्व अचूकपणे टिपले आणि आत्मसात केले, मग ते व्यंगचित्र काढण्याची कला असो वा भाषण करण्याची स्टाईल. फक्त संघटना बांधण्याचं कौशल्य तेवढं राज ठाकरे आपल्या काकांकडून घेऊ शकले नाहीत.

बाळासाहेबांचे 'अष्टप्रधान मंडळ' कमालीचे कार्यतत्पर होते. साहेबांनी वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांना नेतृत्व बहाल केल्याने शिवसेनेच्या भगव्याखाली 'बहुरंगी-बहूढंगी' लोक एकवटले होते. त्यांनी संघटना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. पण राज ठाकरे यांना ते अजिबात जमले नाही. नवे नेतृत्व उभे करण्याचे सोडा, त्यांच्याजवळचे महत्वाचे शिलेदार त्यांना, त्यांच्या लहरी कारभाराला कंटाळून पक्ष सोडून गेले. कदाचित त्यामुळेच मनसेची एवढी पडझड पाहायला मिळतेय. परंतू, आता अनेक संकटातून ताऊन सुलाखून निघालेले राज ठाकरे नक्कीच यातूनही बाहेर पडतील, किंबहुना त्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही असे मानायला काहीच हरकत नाही.

आजच्या संताप मोर्चाच्या माधम्यातून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा लोकांच्या मनातल्या मुद्द्यांना हात घातलाय. लोकांच्या वेदनेला त्यांनी आवाज दिलाय. त्यासोबतच 'राजाला साथ द्या', अशी भावनिक सादही घातलीय आणि त्यातूनच ते आपलं राजकारण पुढे नेऊ पाहत आहेत. महाराष्ट्रात सध्या सत्तेत असणारा शिवसेना विरोधी पक्षाचा 'डबलरोल' करताना दिसतोय. मोठ्या नेत्यांच्या रिकाम्या जागा भरून काढणारे नवे नेते आसपास दिसत नाहीत, शिवसैनिक आणि तोडफोड राजकारणाचे चाहते असणारा जो वर्ग आहे, तो आजही बाळासाहेबांची आठवण काढतोय. बाळासाहेबांची जागा भरून काढणारा राज ठाकरेंइतका दुसरा नेता सध्यातरी महाराष्ट्रात नाही, म्हणून असेल कदाचित, सेनेच्या दसरा मेळाव्यातून घरी परत जायला निघालेले सैनिक राज ठाकरेंना भेटायला जातात.

राज ठाकरेंचाही आपला स्वतःचा एक चाहता वर्ग आहे अगदी स्वतःला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या अभिजन वर्गातही राज यांना चाहणारे खूप आहेत. या भांडवलाची सगळ्यांची सांगड घालून, माणसांशी माणसांसारखे वागत, ते पुढे गेले तर नक्कीच त्यांना मनसेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देता येईल. होय, हे यासाठी येथे नमूद करावेसे वाटतंय की जमीनदारी मानसिकता असणाऱ्या आपल्या देशात 'माणसांना कुत्र्याप्रमाणे आणि कुत्र्यांना माणसाप्रमाणे, प्रेमाने वागवण्याचा नवा प्रघात पडू लागलाय. त्याला कोणत्याच राजकीय नेत्याचा अपवाद नाही. ते टाळणाऱ्या नेत्याला मात्र त्याच्या मृत्यूनंतरही विसरत नाही, हे आपण अनेक नेत्यांच्या बाबतीत अनुभवलंय. असो, तर या पहिल्याच संताप मोर्चाने, भाजप सरकारच्या डोक्याचा ताप निश्चितच वाढणार आहे.

पण तसंही मोर्चामधल्या गर्दीचं राजकीय मतात रुपांतर करणं एवढं सोपं काम नसतं, मराठा मोर्चाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. ज्या अर्धा डझन मराठा संघटनांनी निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावले, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. कारण मराठा मोर्चांमधील लोकांचं व्यक्त होणं हे संघटित नव्हतं, किंबहुना त्या मोर्चाला नेतृत्वच नव्हतं, पण राज ठाकरेंचं तसं नाही. त्यांच्या हाती मनसेसारखी संघटना आहे, तिची जर नीट बांधणी झाली तर राज चमत्कार करू शकतील. त्याजोडीला तरुणाईच्या सरकारविरोधातल्या या असंतोषाला संघटनेच्या माध्यमातून, राज्यव्यापी मोर्चा, आंदोलनांच्या माध्यमातून हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं तर त्यांची मनसे ही राजकीय संघटना देखील पुन्हा नव्या जोमाने राजकीय वाटचाल करेल, यात काहीच शंका नाही.

First published: October 5, 2017, 6:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading