शेतकरी संप का ?, शेतकरी संपला म्हणून शेतकरी संप झाला !

शेतकरी संप का ?, शेतकरी संपला म्हणून शेतकरी संप झाला !

शेतकरी संपाच्या पहिल्याच दिवशी असे आक्रमक आंदोलन होईल असेही वाटले नव्हते. पण हे सारे घडतंय, कारण शेतीचं अर्थकारण बिघडलंय. त्यासाठी कोणतेही एक सरकार जबाबदार नाही, त्यासाठी या देशातील अवघी 'व्यवस्था' जबाबदार आहे. अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या 'सिस्टीम'ने शेती संपवण्याची 'व्यवस्था' केली, म्हणून आज शेतकरी संपावर गेलाय.

  • Share this:

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, IBN लोकमत

पूर्वी शाळेमध्ये निबंध आणि भाषणासाठी भलते विनोदी विषय दिले जात, उदा. सूर्य संपावर गेला तर ? पाऊस पडलाच नाही तर... वगैरे वगैरे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी यासाठी असे विषय चर्चेसाठी पुढे येत असावेत. प्रत्यक्षात त्या विचारांनी हसायलाच येत असे. एकवर्षी "शिक्षक संपावर गेले तर ? " असा विषय निबंध लेखनासाठी होता, मला आठवते, वर्गातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मोठ्या 'आनंदाने' त्याच विषयावर भरभरून लिहिले होते. गंमतीचा भाग सोडा, पण खरं सांगतोय शेतकरी संपावर जाईल असे कल्पनेतही वाटले नव्हते, आज महाराष्ट्रात ते प्रत्यक्षात घडताना दिसतंय. पुणतांब्यातून पहिल्यांदा शेतकरी संपाची हाक दिली गेली आणि काही तासातच राज्यभरात संपाचे लोण पसरले.  सकाळपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून संपाच्या  बातम्या धडकताहेत, कुठे कृषी उत्त्पन्न बाजार समित्या बंद पडल्यात, कुठे शेतकरी रस्त्यावर उतरलेत, कुठे दुधाचा टँकर फोडलाय तर कुठे भाजी-पाला रस्त्यावर फेकलाय.

शेतकरी संपाच्या पहिल्याच दिवशी असे आक्रमक आंदोलन होईल असेही वाटले नव्हते. पण हे सारे घडतंय, कारण शेतीचं अर्थकारण बिघडलंय. त्यासाठी कोणतेही एक सरकार जबाबदार नाही, त्यासाठी या देशातील अवघी 'व्यवस्था' जबाबदार आहे. अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या 'सिस्टीम'ने शेती संपवण्याची 'व्यवस्था' केली, म्हणून आज शेतकरी संपावर गेलाय. एरवी हाडाच्या शेतकऱ्याला शेतीपासून दूर करणे केवळ अशक्य आहे, हे मी माझ्या घरातील अनुभवावरून सांगू शकतो.

जवळपास वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. माझे वडील थोडे आजारी होते. वयाची सत्तरी उलटली तरी शेती आणि दगदग करण्याचा त्यांना कंटाळा येत नव्हता. खरेतर भातशेती कधीच फायद्याची नव्हती , तरीही भर पावसात भिजत घरी येणाऱ्या वडिलांनी तसा 'हिशोब' कधीच केला नव्हता. मुंबईत व्यवहार शिकणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला मात्र असे बेहिशोबी वागणे पटत नव्हते.  त्यामुळे अशाच एका वाड्याच्या भेटीत ,  थोडया काळजीने आणि त्राग्याने मी त्यांना उद्यापासून शेतावर जाणे बंद करा असे म्हणालो होतो. माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर काय परिणाम होईल याचा विचार न करता.   त्यावर बाबा  शांतपणे उद्गारले होते, शेतावर जाणे बंद केले तर कायमचा आजारी पडेन. अरे, जमीन आपली आई आहे, तिच्यापासून दूर होणे शक्य आहे का?

वडिलांच्या  प्रत्येक शब्दांतून त्यांची शेतीनिष्ठा व्यक्त होत होती.तशी आपल्या राष्ट्र-महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याची आपल्या शेतावर तेवढीच माया असते.

परवा विण्डेल बेरी यांचे ब्रिंगिंग इट टू द टेबल; रायटिंग ऑन फार्मिग अ‍ॅण्ड फूड वाचताना वडिलांचे ते शब्द पुन्हा आठवले. विण्डेल यांनी शेतकऱ्याच्या त्याच भावना मोठ्या अलंकारिक शब्दांत मांडल्या आहेत. आर्थिक ताणतणाव, अनंत अडचणी आणि वैफल्याचा सामना करीत शेतकरी शेती का कसतात? याचे नेहमीच उत्तर असेल प्रेमासाठी. होय, ते हे सारे शेतीवरील निखळ प्रेमासाठी करीत असतात. शेतकरी नांगरतो, पेरतो, पिकांचे रक्षण करतो, केवळ त्या कामावरील प्रेमामुळे, त्याला पशुधनाच्या गोठ्यात राहायला आवडते. निसर्ग भलेही शेतकऱ्याचे नुकसान करीत असेल, पण हा शेतकरी त्याच्यावरसुद्धा प्रेम करतो. जिथे काम करतो, तिथे राहायला आणि जिथे राहतो तिथे काम करायला शेतक-यांना आवडते, थोडक्यात सांगायचे, तर अनंत अडचणींचा सामना करत स्वतंत्र राहणे शेतकऱ्यांना आवडते.

आपल्या शेतावर एवढे मनसोक्त प्रेम करणारा, आपल्या स्वातंत्र्यासाठी जीव देणारा शेतकरी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात संपावर जाण्याचा अगदी टोकाचा मार्ग का पत्करतो, याचा विचार शासन, प्रशासन यासह शेतकऱ्याची 'सेवा' घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे.  शेतकऱ्याला अन्नदाता या उपाधीने  आजवर गौरवले गेले, पण  त्या शेतक-यांना त्यांचे स्वातंत्र्य दिले पाहिजे, त्यांच्या मालाला योग्य भाव, कामाला योग्य दाम दिला पाहिजे, तरच शेती आणि शेतकरी टिकेल. याचा गांभीर्याने विचार झाला नाही.

आम्ही प्रत्येक नैसर्गिक संकटाच्या वेळी तात्पुरती उपाययोजना करीत गेलो. बदलते हवामान आणि सामाजिक स्थिती याचा शेतीच्या संदर्भात आढावा घेण्याचे कोणालाच भान नव्हते.  वाढती लोकसंख्या, आहारातील वेगाने होणारे बदल याकडे आम्ही बऱ्यापैकी दुर्लक्ष करतो. ज्याचा शेतकऱ्याच्या जगण्याशी आणि हो मरण्याशीही संबंध असतो त्या शेतमालाच्या भावावर नेहमीच व्यापाऱ्यांचे नियंत्रण असते. तेच भाव पडतात, तेच वाढवतात. त्याच्या शेतात तो माल पिकतो तो शेतकरी आणि ज्याच्या घरात पोहचतो तो ग्राहक मात्र व्यापाऱ्यांकडून वेळोवेळी नाडला जातो. अगदी सालाबादप्रमाणे आपल्याकडे कांदा एकतर बाजारभाव न मिळाल्याने सडतो किंवा, साठेबाज व्यापाऱ्यांनी बाजारकोंडी केल्यामुळे महागतो. तीच बाब तुरीची, कापसाची .भाजीपाल्याची, फळांची . जागतिक आणि देशांतर्गत बाजारभाव आणि आमची शेती याचा मेळ बसावा यासाठी कृषी खात्याने सातत्याने उपाय योजण्याची आवश्यकता होती. पण तशी नजर असणारे नेतृत्व देशाला आणि राज्याला लाभले नाही. म्हणून वर्षानुवर्षे शेती तोट्यात जात राहिली, विशेष फायदा होत नसतानाही शेतकरी जमीन कसत राहिला, ज्यांना शेती झेपणे असह्य झाले त्या  शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत राहिल्या. दर निवडणूक शेतकऱ्यांना नवनव्या आश्वासनांचे गाजर दाखवत येत होती आणि विजयाच्या गजरात दिलेली आश्वासने विसरूनही जात होती.

अनेक वर्षांपासून सुरु असलेला हा क्रम आजही सुरु आहे. त्यामुळेच आज सत्तेपासून दूर असलेले काँग्रेस, राष्ट्रवादीसारखे राजकीय पक्ष याआधी सत्तेवर असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कानाडोळा करायचे ही वस्तुस्थिती संपामध्ये सामील झालेल्या सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे कारण आजपासून सुरु झालेल्या  या शेतकरी संपाच्या निमित्ताने राज्यात नवे राजकारण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जे मराठा मोर्चाच्या मालिकेने साध्य झाले नाही, जे 'संघर्ष यात्रे' च्या माध्यमातून जमले नाही, ते राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न  शेतकरी संपाच्या निमित्ताने होऊ शकतात. यासाठी राज्यातील तमाम शेतकऱ्यांनी सजग राहिले पाहिजे.

जागतिक आकडेवारीनुसार जगातील एकंदर गरीब लोकांपैकी एक तृतीयांश लोक भारतीय आहेत. साधारणत: ४५ कोटीच्या आसपास असणारी ही गरीब लोकसंख्या पूर्वीपासून शेती आणि शेतीशी संबंधित उद्योगधंद्यांवर अवलंबून होती. भारत स्वतंत्र झाला, त्या वेळी औद्योगिक वाढ फक्त मुंबई आणि कोलकत्ता या दोन शहरांपुरतीच मर्यादित होती. १९०१ मधील जनगणना अहवालानुसार त्या काळात १० पैकी फक्त १ व्यक्ती शहरात राहणारी होती. आता १० पैकी ५ व्यक्ती शहरात राहतात . १९५१-५२ मध्ये शेतीचा जीडीपीमधील वाटा ५२ टक्के होता, आता तो १६ टक्क्यांवर घसरला आहे. तरीही शेतात राबणा-या किंवा शेतीशी संबंधित व्यवसायावर जगणा-या लोकांची संख्या एकूण कष्टकरी वर्गाच्या ५२ टक्के असल्याचे दिसते. त्यामुळे भारतीय शेतीला संजीवनी देण्यास अजून पुरेसा वाव दिसतोय. देशातील ६०-६५ टक्के लोकसंख्या तरुण आहे. तिशीच्या आत आहे. या तरुणांच्या फौजेला पुन्हा एकदा शेतीचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. आपल्या आजोबा-पणजोबांच्या काळात उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी अशी म्हण प्रचलित होती; पण सध्याच्या युगामध्ये उत्तम नोकरी, मध्यम धंदा आणि कनिष्ठ शेती असे बोलले जाते, हे बदलणे गरजेचे आहे; कारण विख्यात शेतीतज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन् यांना ९७ व्या इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये सांगितले आहे की, फ्युचर बिलाँगस् टू नेशन्स विथ ग्रेन्स नॉट गन्स या वाक्याचा सोपा अर्थ असा आहे की ज्या देशांकडे बंदुकीच्या गोळ्या नव्हे, गव्हाच्या पोळ्या असतील, त्यांच्याच हाती भविष्यकाळाची सूत्रे असतील; पण सध्याच्या काळात धान्य, डाळी, कांदे-बटाटे, भाज्या, तेलबिया या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव ज्या पद्धतीने वाढतात आणि पडतात, ते पाहिल्यावर आम्ही शेतीला उद्योग समजून प्रतिष्ठा दिलेली नाही, हे स्पष्ट होते.

ज्या डॉ. स्वामीनाथन् यांनी भारतातील हरितक्रांतीची सुरुवात केली आणि देशाला भूकमुक्त केले आहे. अशा असामान्य प्रतिभेच्या आणि विलक्षण बुद्धीच्या माणसाने आपले अवघे आयुष्य देशातील गरिबांची भूक नष्ट करण्यासाठी समर्पित केले आहे. त्या स्वामीनाथन् यांनीच नॅशनल कमिशन ऑन फार्मर्सचा अहवाल नोव्हेंबर 2007 मध्ये संसदेसमोर मांडला आहे. त्यातील त्यांच्या सूचनांवर सरकारने तातडीने अमलबजावणी केली, तर भारताला, महाराष्ट्राला  पुन्हा सुगीचे दिवस येतील.

त्यांनी आपल्या अहवालात शेतीकडे तरुणवर्ग यावा यासाठी शेतक-यांना सरकार जी मदत करते, त्याच्यात समग्र बदल सुचवला आहे. जसा नोकरी करणा-यांसाठी सहावा वेतन आयोग बसवला होता, तसे शेतकऱ्यांना दिले जावे. त्यांना निवृत्तीवेतन मिळावे, महिलांना कर्ज मिळण्यासाठी विशेष सुविधा दिल्या जाव्यात असे त्यांनी सुचवले आहे. आजही भारतातील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहत आहे. वातावरणातील बदलांनी संपूर्ण जगातील अर्थकारण, समाजकारण ढवळून निघाले आहे. तरी आम्ही मात्र बदल स्वीकारायला आणि काळानुरूप बदलायला तयार नाही. अनास्था अति झाली अन  शेतीची माती झाली तर हाती काय उरेल, याचा विचार कोण करणार आहे का ? आज सकाळीच धोरण विश्लेषक आणि अर्थतज्ज्ञ श्रीकांत बारहाते यांच्या फेसबुक वॉलवर अल्लामा इक्बाल यांच्या काव्यपंक्ती वाचल्या आणि त्यातील आशयघन शब्द अर्थासहित डोळ्यासमोर तांडव करीत राहिले...

" जिस दहकां से न हो मझदूर को मयस्सर रोजी,

उस खेत के हर खोसा-ए-गंदुम को जला दो "

अर्थ :  'ज्या शेतातून शेतकरी, कष्टकरी लोकांना उपजीविका प्राप्त होत नाही त्या शेतातील तृणाची प्रत्येक पाती न पाती जाळून टाका'...

First published: June 1, 2017, 4:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading