महाराष्ट्रधर्म वाढवावा !

महाराष्ट्रधर्म वाढवावा !

कुपोषण, दारिद्रय, रोगराई आदी एक ना अनेक संकटातून वाटचाल करीत मऱ्हाटी जन पुढे जात असताना त्यांच्या बुद्धिकौशल्याला, पराक्रमाला दाद देणे आवश्यक आहे. तसे केल्याने महाराष्ट्रधर्माचा प्रसार जास्त वेगाने होईल.. अवघे जग एकविसाव्या शतकात चालले असताना आपणही खेकड्याची वृत्ती सोडून प्रगतीचे मनोरे बांधण्याची आता प्रॅक्टिस केली पाहिजे.

  • Share this:

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत  

राष्ट्रवाद ही संकल्पना राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येशी मिळतीजुळती आहे. जागतिकीकरणाने आता राष्ट्रीय सीमा तोडून अवघे जग एकत्र आणलेले दिसते. वसुधैव कुटुंबकम् या न्यायाने लोकल टू ग्लोबल असा एक सांस्कृतिक परीघ निर्माण होताना दिसतोय. ही अठराव्या शतकातील औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून सुरू झालेली आधुनिकीकरणाची प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने स्थिरावतेय. या सगळ्या प्रक्रियेत महाराष्ट्राला स्वत:चे असे एक स्थान आहे ; कारण आजही भारतात गुंतवणूक करणाऱ्या जगातील कोणत्याही उद्योगाची पहिली पसंती महाराष्ट्राला असते. महाराष्ट्राच्या या महत्त्वाचे आकलन जगभरातील लोकांना होते, पण आम्हा मराठी  मंडळींना अजूनही ही स्वत्वाची, स्वसामर्थ्याची जाणीव झालेली नाही .

महाराष्ट्र आणि मऱ्हाटे हे दोन्ही शब्द अनेक शतकांपासून पराक्रम या शब्दाला समानार्थी म्हणून वापरले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाने निर्माण झालेल्या या भगव्या वादळाने अवघ्या जगाला महाराष्ट्र धर्माचा परिचय करून दिला होता. म्हणूनच ३४१ वर्षांपूर्वी, फेब्रुवारी १६७२ मध्ये द लंडन गॅझेट या वृत्तपत्रात छत्रपती शिवाजी राजांच्या सूरतेवरील स्वारीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या बातमीमध्ये सूरतेच्या ब्रिटिश गव्हर्नरने महाराजांचे वर्णन असे केले होते, .... शिवाजी.. मुघलांना अनेक लढायांमध्ये खडे चारणारा बंडखोर आता या देशातील सर्वेसर्वा बनला आहे.

मराठ्यांना पराक्रमाचे धडे देणऱ्या छत्रपतींच्या वंशजांनी पुढे अटकेपर्यंत धडक मारली आणि महाराष्ट्र धर्म, हिंदुत्व व भारतीयत्वाचा जन्म होण्यापूर्वी सर्वत्र प्रचलित, प्रस्थापित केला होता. नेमक्या याच गोष्टीचा आजच्या मराठी लोकांना विसर पडलाय. रामायणातील हनुमानाला आपल्यातील शक्ती-सामर्थ्यांची आठवण करून द्यावी लागत असे, मगच त्याच्या शरीरात बळ संचारायचे आणि तो अचाट कार्य करण्यास सज्ज व्हायचा. अगदी तसेच काहीसे आमच्या मऱ्हाट्यांचे झालेले आहे. त्यांच्या पराक्रमी इतिहासावर पिढ्यानपिढ्या राखच जमा होत गेली त्यामुळे आपल्यातील अग्नी विझला असावा, अशी त्यांनी खात्री करून घेतलेली दिसते. त्यांच्यातील हा जन्मदत्त अग्नी पेटवण्यासाठी आता एक दिवा पाहिजे.. नवा एक शिवा पाहिजे..

होय, महाराष्ट्राच्या आधारावर गेली अनेक शतके हे भारतवर्ष उभे आहे. महाराष्ट्राने भारताला स्वराज्याचा मंत्र जसा मुघलांच्या दमनकारी राजवटीत दिला तसा ब्रिटिशांच्या अन्याय्य कारकीर्दीतही स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे ही सिंहगर्जना 'केसरी'च्या माध्यमातून महाराष्टातूनच घुमली. याच महाराष्ट्राने गांधीजींना गुरू दिले. शहीद भगतसिंग यांना राजगुरू दिले. स्त्रीशिक्षण असो वा लैंगिक शिक्षण, महाराष्ट्र नव्या ज्ञानमार्गाचा आद्य पुरस्कर्ता ठरला. आजही ठरतोय.

महाराष्ट्र राज्य भारत स्वतंत्र होण्याआधीपासून आर्थिक आणि औद्योगिकदृष्टया समृद्ध आणि संपन्न आहे. अगदी आजही परकीय गुंतवणूक असो वा बँकेत ठेवी ठेवण्याचे प्रमाण असो, महाराष्ट्रच सगळ्यात आघाडीवर आहे. फक्त आर्थिक वा औद्योगिक प्रगतीच नाही तर भारताला वैचारिक मार्गदर्शन करणारे समाजसुधारक, प्रगतीला दिशा देणारे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक प्रकाश दाखवणारे संत अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांत महाराष्ट्र पुढे आहे आणि पुढे राहील. महाराष्ट्राला जेवढी पराक्रमाची परंपरा आहे तेवढीच त्यागाची. महाराष्ट्रावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केल्यामुळे मऱ्हाटी लोकांना फारसे स्थलांतर करावे लागले नाही. त्याउलट गुजरात-राजस्थानची स्थिती. निसर्गाच्या अवकृपेमुळे त्या भागात जन्मणाऱ्यांना पिढ्यानपिढ्या स्थलांतर करावे लागले. परिणामी त्या भागातील लोक देशभर-जगभर विखुरले गेले. ज्यावेळी माणूस आपल्या मातृभूमीपासून दूर जातो तेव्हा त्याच्या वर्तनात खूप फरक पडतो. तो नम्र बनतो, तडजोडींसाठी तयार असतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यश मिळवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करतो. मऱ्हाटयांचा इतिहास पाहिला तर वरील तीनही गोष्टीत आम्ही किती कमी होतो आणि आजही त्याचे महत्त्व आम्हाला कसे कळलेले नाही, याची खात्री पटते. वास्तविक पाहता, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सतराव्या शतकात लावलेले स्वराज्याचे तोरण अवघ्या दीडशे वर्षात देशभरात पोहोचले होते.

अटकेपार मुलुखगिरी करणाऱ्या पेशव्यांनी एकोणिसाव्या शतकात एक तृतियांश भारत आपल्या ताब्यात घेतला घेतला होता; परंतु ज्या ठिकाणी मराठयांनी राज्य मिळवले होते, त्या सगळ्याच संस्थानात राहून आम्ही राज्य टिकवले नाही. गुजरातमधील बडोदा वा मध्य प्रांतातील ग्वाल्हेर, इंदूर इत्यादी अपवाद वगळता बहुतांश संस्थानी प्रदेशात आता मऱ्हाटी संस्कृती व समाज नावापुरता उरलेला दिसतोय, कारण गुजराती वा मारवाडी लोकांप्रमाणे आपण आपला मुलुख विसरू शकलो नाही आणि पराक्रमाने मिळवलेला मुलुख टिकवू शकलो नाही, हे वास्तव आहे. त्यासंदर्भात तरुण पिढीचे प्रबोधन करून त्यांना देशोदेशीच्या सीमा पार करायला उद्युक्त करणे, ही काळाची गरज आहे. त्या जोडीला श्रमसंस्कृतीचे महत्त्व, सद्वर्तनाची गरज आणि ध्येयासक्ती या नव्या पिढीमध्ये संक्रमित केली पाहिजे. दुर्दैवाने तसे होत नाही. तरुणांना उद्यमी करून त्यांच्याकडून सकारात्मक काम करवून घेणे दूरच राहिले, आमच्याकडील काही नेते या तरुणांची माथी भडकावून त्यांना वेगळ्याच दिशेकडे नेत आहेत. त्यामुळे आज सर्वच माध्यमांमध्ये मराठी माणसाची प्रतिमा हट्टी, हेकट, आक्रमक आणि दुसऱ्यांचा दु:स्वास करणारी अशी झाली आहे. आम्ही तसे आहोत का? मग एखाद दुसऱ्या नेत्याच्या भडक ठाकरी भाषेला अवघ्या मराठीजनांचा उद्गार समजण्याची जी प्रथा पडत चालली आहे, ती आम्ही प्रयत्नपूर्वक रोखली पाहिजे. मराठी लोकांचे देशप्रेम किंवा राष्ट्रनिष्ठा याविषयी कोणीही शंका घेऊ शकत नाही, कारण महाराष्ट्र या संकल्पनेत राष्ट्र सामावलेले दिसते. म्हणूनच चित्रपटाची मुहूर्तमेढ असो वा क्रिकेटचा खेळ किंवा महासंगणक बनविण्याचे काम, मराठी माणूस सर्वत्र पुढे असतो. भारतीय राज्यघटना लिहिण्याचे काम असो वा देशाचे कृषी वा अर्थकारण ठरविण्याचे धोरण, मराठी माणूस नेहमीच राष्ट्रवादाला आत्मीयतेने महाराष्ट्रावादामध्ये परावर्तित करण्याची धडपड करीत असतो.

महाराष्ट्र या नावातच महानता दडलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रधर्म, छत्रपती शिवाजी महाराजांना थोरले महाराज, शहाजीराजांनी शिकवला तेव्हापासून त्यातील महान तत्त्वांचा मऱ्हाटमोळ्या लोकांना चांगलाच परिचय झाला आहे.   श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी बहु असोत सुंदर संपन्न की महा। प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा॥ हे महाराष्ट्र गीत लिहिताना मऱ्हाटी मनांचा महाउद्गारच व्यक्त केला होता. त्या गीतामधील भाव आणि आशय आजही स्फूर्तिदायक वाटतो. ते लिहितात, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे तो महाराष्ट्र. धर्म राजकारण एकसमवेत चालती तो महाराष्ट्र. आणि शेवटी ते म्हणतात, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो.. देह पडो सत्कारणी ही असे स्पृहा.. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....

महाराष्ट्र धर्माचे असिधाराव्रत घेण्यासाठी . महाराष्ट्रधर्माला नव्या युगात नव्याने प्रतिष्ठा मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी नियतीने आपल्यासमोर  ठेवली आहे. हा महाराष्ट्र धर्म बाराव्या शतकापासून महानुभाव संप्रदायाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी पुढे आणला. ते स्वत: गुजराती होते. त्यांनीच मराठीला महानुभावांची   धर्मभाषा करून अटकेपार पोहोचवले. त्यापाठोपाठ संत ज्ञानेश्वर, नामदेवांनी आध्यात्मिक लोकशाही स्थापन करून त्या महाराष्ट्रधर्मासाठी भूमी तयार केली. संत तुकारामांच्या अनुभवातून आलेल्या शहाणपणातून आणि संत रामदासांच्या व्यावहारिक चातुर्यातून महाराष्ट्रधर्माला विचारांची बैठक मिळाली. तोवर शहाजीराजांच्या शौर्याचा आणि तेजाचा वारसा लाभलेल्या शिवाजी महाराजांनी मावळभूमीत स्वराज्य स्थापण्याची तयारी सुरू केली होती. छत्रपती झाल्यानंतर महाराजांच्या प्रत्येक मोहिमेची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाऊ लागली. त्यावेळी रामदास स्वामींनी छत्रपतींच्या महापराक्रमाचे गुणगान गाताना लिहिले होते, तुम्ही झाला म्हणून महाराष्ट्रधर्म काहीतरी राहिला. पुढे ते महाराजांना मोठ्या प्रेमाने विनवतात, आपण धर्मस्थापनेची कीर्ती उत्तरोत्तर अशीच सांभाळली पाहिजे. ही कीर्ती/प्रसिद्धी कायम राहण्यासाठी काय केले पाहिजे, याबद्दल ते सुचवतात, अमर्याद फितवेखोर लोकांचा नाश करावा, न्यायाच्या सीमांचे भान ठेवावे, तुरुंग बांधावे, सशस्त्र स्वार जमवावे. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचे म्हणजे मराठा तितुका मेळवावा; जगात सगळीकडे महाराष्ट्रधर्म वाढवावा.

रामदास स्वामींनी आपल्या काव्यात छत्रपतींना महाराष्ट्र राज्य करावे। जिकडे तिकडे॥ अशी विनंती केली आहे. कारण छत्रपतींनी महाराष्ट्रात निर्माण केलेली सुरक्षा, सुव्यवस्था आणि त्यातून आलेली सुबत्ता रामदासांनी पाहिली आणि अनुभवलेली होती. छत्रपतींचे स्वराज्य संकुचित नव्हते. ते सर्वधर्म व भाषांच्या पलीकडे जाणारे होते. आचार्य विनोबा भावे यांनी 1923 साली महाराष्ट्रधर्म या नावाने एक मासिक सुरू केले होते. त्या मासिकाच्या पहिल्याच अंकात त्यांनी मासिकाचे नाव महाराष्ट्रधर्म असे का ठेवले याचे विवेचन केले होते. ते म्हणतात, महाराष्ट्र म्हणजे रूढ अर्थाने एक प्रांत, पण त्याच शब्दाने महाराष्ट्र म्हणून सबंध हिंदुस्थानचा बोध होऊ शकेल. आणि राष्ट्रसंघ अशा अर्थाने विश्वभारती असा अर्थही निघू शकेल. आमच्या प्रांताचा विशिष्ट महाराष्ट्रधर्म, देशाचा समान महाराष्ट्रधर्म आणि जगाचा सार्वभौम महाराष्ट्रधर्म अशा तिहेरी अर्थाने हा शब्द योजिला आहे. विनोबा इथेच थांबत नाहीत. ते म्हणतात, स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा या विषयीच्या शिवाजी महाराजांच्या कल्पना उदार होत्या. महाराष्ट्रधर्म हा प्रथमदर्शनी जरी वामनासारखा दिसला, तरी वस्तुत: तो दोन्ही पावलांत विराट विश्व व्यापणाऱ्या त्रिविक्रमासारखा होता. त्याचे एक पाऊल महाराष्ट्रीय, दुसरे राष्ट्रीय आणि तिसरे अतिराष्ट्रीय आहे.

मधल्या काळात महाराष्ट्रात बरेच बदल झालेले आहेत. औद्योगिक प्रगतीसोबत शिक्षण आणि सामाजिक सुधारणांमुळे मराठी समाज वेगाने प्रगतिपथावर जात आहे. कुपोषण, दारिद्रय, रोगराई आदी एक ना अनेक संकटातून वाटचाल करीत मऱ्हाटी जन पुढे जात असताना त्यांच्या बुद्धिकौशल्याला, पराक्रमाला दाद देणे आवश्यक आहे. तसे केल्याने महाराष्ट्रधर्माचा  प्रसार जास्त वेगाने होईल.. अवघे जग एकविसाव्या शतकात चालले असताना आपणही खेकड्याची वृत्ती सोडून प्रगतीचे मनोरे बांधण्याची आता प्रॅक्टिस केली पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2017 04:07 PM IST

ताज्या बातम्या