S M L

प्रतिमा,प्रतीकांच्या पुस्तकी देशा... महाराष्ट्र देशा !

महाराष्ट्रदिन साजरा झाल्या झाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाबळेश्र्वर जवळील एका पुस्तकाच्या गावाचे लोकार्पण केले त्यावेळी, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कानावर पडलेले 'मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा ' हे गीत वेगळ्या पद्धतीने आठवले.

Sachin Salve | Updated On: May 4, 2017 04:45 PM IST

प्रतिमा,प्रतीकांच्या पुस्तकी देशा... महाराष्ट्र देशा !

- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

महाराष्ट्रदिन साजरा झाल्या झाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाबळेश्र्वर जवळील एका पुस्तकाच्या गावाचे लोकार्पण केले त्यावेळी, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कानावर पडलेले 'मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा ' हे गीत वेगळ्या पद्धतीने आठवले.

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा


 प्रतिमा, प्रतीकांच्या पुस्तकी देशा ...

होय,तुम्ही-आम्ही सर्वच जण सामान्य नागरिक, विचार करणारे, चिंतन करणारे आणि राज्य करणारे, सगळेच जण आपल्या समोरील प्रत्येक विषयाकडे, प्रत्येक प्रश्नाकडे प्रातिनिधिक आणि प्रतीकात्मक स्वरूपात पाहतो. त्यामुळे तो प्रश्न किंवा विषय प्रतीकात्मक पद्धतीनेच हाताळला जातो. प्रातिनिधिक पद्धतीने त्याची जाहिरात झाल्याने तो विषय आपल्या भौगोलिक सीमारेषा ओलांडत नाही. पुस्तकांच्या गावाची याहून वेगळी स्थिती होणार नाही. गेल्यावर्षी ठाणे जिल्यातील मुरबाड जवळ सुरू झालेल्या 'आजीबाईंच्या शाळेची' सर्वात प्रथम आयबीएन लोकमतने दाखल घेतली होती. त्यानंतर मराठीतीतील बहुतेक वृत्तपत्र, साप्ताहिक, वृत्तवाहिन्यांनी त्या आगळ्या वेगळ्या प्रयोगाला उचलून धरले. मग देशभरातील सगळ्या माध्यमांनी 'आजीबाईंच्या शाळेला' भेटी दिल्या, अगदी युरोप, अमेरिकेतून पत्रकार आले. पण आजवर तशी दुसरी आजीबाईंची शाळा कुठे निघाल्याचे ऐकिवात नाही. पुणे जिल्यातील सकट गुरुजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी सुरू केलेले शैक्षणिक प्रयोग खूप गाजले पण त्याची शेजारच्या तालुक्यात देखील पुनरावृत्ती होताना दिसत नाही.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची 'आदर्श गाव योजना' असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'स्वच्छ भारत मोहीम'. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईतील भव्य स्मारक असो किंवा  भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे रखडलेले स्मारक.  हा सगळं प्रतिमा, प्रतीकांच्या माध्यमातून मांडलेला पुस्तकी आणि प्रचारकी  खेळ आहे. या खेळातून उत्तम मनोरंजन होते, काहीकाळ मन भारावून जाते, स्वत: काहीतरी केल्याचा आभास आपल्या कल्पक मनाला झकास आत्मविश्वास देतो. पण शंभर दिवस उलटले की मन भानावर येते, जडावलेली नजर स्वप्नातून सत्याकडे पाहायला तयार होत नाही. मग त्यातून एक नवी खोटी दुनिया उभारण्याचा व्यर्थ प्रयत्न होतो. पुस्तकांच्या गावाचे तसे काही होऊ नये, असे एक पुस्तकप्रेमी म्हणून वाटणे साहजिक आहे... म्हणून  महाबळेश्वरला थंड हवेचे ठिकाण म्हणून मजेत राहायला जाणारे लोक, फावल्या वेळात स्ट्राबेरी खाताखाता पुस्तके वाचतील आणि पुस्तकांच्या गावासोबत पुस्तकांना वाचवतील  एवढी एकच अपेक्षा.

Loading...
Loading...

पुस्तक वाचणारे आपल्याकडे दिवसेंदिवस कमी होत आहेत अशी एकीकडे ओरड होत असताना मराठी सोबत इंग्लिश वाचणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे 'द निल्सन इंडिया बुक मार्केट रिपोर्ट' च्या दीड वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार  भारतातील छापील पुस्तक प्रकाशनाची उलाढाल चित्रपट निर्मिती करणाऱ्या बॉलिवूड एवढी वाढू शकते. दुर्दैवाने आम्ही तिकडे लक्षच द्यायला तयार नाही. 'द निल्सन इंडिया बुक मार्केट रिपोर्ट' सारखा आमच्या संपूर्ण प्रकाशन उद्योगाचा विचार करणारा समग्र अहवाल तयार करण्याची गरज आजवर कोणालाही वाटली नव्हती. पण तो प्रसिद्ध झाल्यावर कळले की देशातील २२ प्रमुख भाषांतील ९ हजार प्रकाशक दरवर्षी कोट्यवधी पुस्तके प्रकाशित करतात आणि २२ हजार लहान-मोठ्या पुस्तक विक्रेत्यांकडून ते ग्राहकांपर्यंत पोहोचतात. या प्रमुख २२ भाषांसह १६०० उपभाषा, बोलीभाषांमधील पुस्तकेही प्रसिद्ध होत असतात. पण हा सगळा ग्रंथव्यवहार एका शिस्तीत आणि चांगल्या पद्धतीत उभा राहायला हवा होता, तो राहिला नाही. या वस्तुस्थितीकडे आम्ही नेहमी दुर्लक्ष करतो.

पण प्रत्यक्षात पुस्तकांचे विश्व मोठे अजब असते. मन मोहून टाकणारे, जीवन बदलवून टाकणारे ! अर्थात ज्यांचा पुस्तकांशी शाळा-महाविद्यालयातील अभ्यासाशिवाय संपर्क आला नाही, त्यांना पुस्तकांच्या या गुणवैशिष्ट्यांचा परिचय असण्याचे काहीच कारण नाही. खरे सांगायचे तर अशा मंडळींचीच संख्या जगात जास्त दिसते.परंतु पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या पुस्तकप्रेमींची संख्याही कमी नाही. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ज्ञान, माहिती आणि मनोरंजन माध्यमांमध्ये प्रचंड बदल होत गेले.

या नव्या बदलांनी माणसातील माणूसपण बदलत गेले; पण पुस्तकातील पुस्तकपण अद्याप शाबूत आहे, हे सुदैव...अर्थात पुस्तकछपाई, निर्मिती आणि वितरणाच्या एकंदर प्रक्रियांमध्ये खूपच प्रगती झाली. आधी हाताने लिहिली जाणारी पुस्तके, कागदाचा शोध लागण्यापूर्वी भुर्जपत्र, रेशमी कापडावर लिहिली जाणारी पुस्तके, 1440 मध्ये जोहान्स गटेनबर्गच्या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे ‘छापली’ जाऊ लागली. गटेनबर्गच्या या एका शोधाने जगातील ज्ञानाचा ठेका घेतलेल्या धर्मसत्तेला सुरुंग लागला. जर्मनीत गटेनबर्गने 1450 मध्ये बायबल छापायला सुरुवात केली. त्याने आपल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये बायबल छापण्यापूर्वी सामान्य ख्रिस्ती माणसाला त्याचे दर्शन दुर्मिळ होते. गटेनबर्गने तो लोकांना उपलब्ध करून दिल्याने धर्मग्रंथात नेमके काय सांगितले आहे, याची माहिती लोकांना होऊ लागली. धर्माच्या मक्तेदारांसाठी हा मोठा धक्का होता.

गटेनबर्ग तेथेच थांबला नाही. 1454 मध्ये त्याने ‘इंडलजन्सेस’ छापायला सुरुवात केली. या एक प्रकारच्या शिफारसपत्रांची तत्कालिन युरोपियन समाजात क्रेझ होती. ख्रिस्ती धर्मगुरू पोप लोकांकडून पैसे घेऊन पापमुक्त केल्याची शिफारसपत्रे देत. त्यात अगदी स्वर्गप्रवेशाचीही खात्री दिलेली असायची. गटेनबर्गने त्याची छपाई केल्याने धर्मसत्तेच्या वर्चस्वाला ओहोटी लागली आणि सामान्य माणसांमध्ये असलेल्या अज्ञानाचा लोप होऊन ज्ञानाचा प्रसार सुरू झाला. जगात परिवर्तनाची पहाट उगवली. पुस्तकांच्या जोडीला जगात वृत्तपत्रांचाही प्रसार आणि प्रभाव वाढला. आज प्रगत आणि पुरोगामी देशांमध्ये अस्तित्वात असलेली लोकशाही हे या पंधराव्या शतकापासून सुरू झालेल्या ज्ञानप्रसाराचे फलित आहे.

सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला ज्ञानाच्या आयुधामुळे जगण्याचे बळ लाभते, हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळेच असेल कदाचित अफाट सामर्थ्य असणाऱ्या धर्म आणि राजसत्तेला संपवण्यासाठी लोकांच्या विचारांचे प्रगटीकरण होणे, ही एकच गोष्ट पुरेशी ठरली. युरोप-अमेरिकेप्रमाणे आपल्या देशातही ही वैचारिक लढाई अशाच पद्धतीने उभी राहिली. संत ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील भगवतगीतेचा अर्थ मराठीमध्ये सांगणे हे मोठे बंड होते. ज्ञानेश्वरांपूर्वी जातीय समतेला महत्त्व देणाऱ्या, ज्ञानाच्या कक्षा सर्वासाठी खुल्या आणि विशाल करणाऱ्या नाथपंथीय मच्छिंद्र आणि गोरक्षनाथांनी, महानुभाव संप्रदायाच्या सर्वज्ञ चक्रधरांनी, वीरशैव किंवा लिंगायत तत्त्वज्ञान मांडणाऱ्या बसवेश्वरांनी आपापल्या पद्धतीने प्रस्थापित धर्मसत्तेला सुरुंग लावले होते.

नाथसंप्रदायाच्या ‘गोरक्षगीता’ आणि अन्य ग्रंथामध्ये ज्ञानाचा अधिकार सर्वाना असल्याचे सांगितलेले दिसते. चक्रधरस्वामी जरी गुजराती होते, तरी त्यांनी मराठीला महानुभाव संप्रदायाची धर्मभाषा बनवली. गावकुसाबाहेरील लोकांना खरा धर्म समजावून दिला. त्यासाठी खास साहित्य निर्माण केले. मराठीतील उपलब्ध गद्य-पद्य वाङ्मयाचे कर्तेपण महानुभवांकडे जाते, ते त्यामुळेच.

थोडक्यात, अभिजनांच्या संस्कृत भाषेत आणि ताब्यामध्ये असलेले ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत आल्याने लोकांना देवा-धर्माचे आकलन होऊ लागले. त्या जोरावर ज्ञानोबांच्या नंतर सुमारे तीनशे वर्षानी लिहिते झालेल्या देहूच्या तुकाराम महाराजांनी

वेदांचा तो अर्थ, आम्हासची ठावा

येरांनी वहावा, भार माथा

असे ठामठोक विधान केले. तो काय फाजील अभिमानाचा दंभोद्गार नव्हता, तो होता अखंड अभ्यासाने आलेल्या आत्माभिमानाचा आवाज. ‘तुकारामाची गाथा’ हातात घेतली, तर प्रत्येक अभंगातून हा आवाज वेगवेगळ्या पद्धतीने ध्वनित होतो. दुर्दैवाने आपल्याकडे अगदी शंभर-सव्वाशे वर्षापर्यंत ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, एकनाथी भागवत किंवा नामदेवादी संतांचे अभंग फक्त वारकरी संप्रदायाच्या लोकांपुरतेच मर्यादित होते. आजही स्थिती फारशी बदललेली नाही.

स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिशांच्या प्रभावामुळे तथाकथित मराठी सारस्वतावर खूप आधीपासून इंग्रजी ज्ञानविचारांचे अंधानुकरण करणाऱ्या नवमतवादी विचारांचा पगडा बसला. आजही तो कायम आहे. अर्थात त्याला मधूनमधून हादरे बसत असतात; परंतु त्याचा पाया उखडणे शक्य झाले नाही, पुढेही होणार नाही. कारण आजही मराठीत निर्माण होणाऱ्या बहुतांश साहित्याची निर्मिती आणि प्रसार याची व्याप्ती शहरी, निमशहरी भागातील मध्यमवर्गीय वाचकांपुरतीच आहे. या वाङ्मयात रंजकतेला प्राधान्य असल्याने देशी लोकांच्या प्रबोधनाचा विचारही केलेला दिसत नाही. परिणामी मोठ्या-मोठ्या लेखकांच्या पुस्तकांची एक आवृत्ती म्हणजे अकराशे प्रती संपायला महाराष्ट्रात वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते.

त्या तुलनेत प्रगत तंत्रज्ञानाने, संगणकयुगाच्या नवनव्या शोधांनी युरोप-अमेरिकेतील पुस्तक छापणा-यांसमोर खूप मोठी आव्हाने उभी केली. तरीही त्या प्रगत देशातील पुस्तक छपाई आणि विक्री दररोज, होय दररोज खपाचे नवनवे टप्पे पार पाडत आहे. ई-बुक रीडर, किंडल, टॅब्लेट या नव्या साधनांनी पुस्तकांना ‘स्वस्त’ केले. शिवाय मध्यस्थांची-पुस्तक वितरक, विक्रेते अशी जी -साखळी होती, तीसुद्धा तोडली होती. परंतु गेल्या नाताळात अमेरिकेतील ई-वाचकांना पुन्हा पुस्तकाच्या जुन्या ‘फॉर्म’कडे वळावेसे वाटले. जानेवारी 2012मध्ये अमेरिकन बुकसेलर्स असोसिएशनने सांगितले की, ‘आधीच्या हंगामापेक्षा नाताळातील पुस्तकविक्री तब्बल 16 टक्क्यांनी वाढली.’ हीच स्थिती इंग्लंडमध्ये आहे. पण तरीही तंत्रज्ञानाच्या सुलभीकरणामुळे पुस्तक वाचकांचा ई-वाचनाकडे वळणारा लोंढा मोठा आहे, हे नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर पुस्तक लेखन करणाऱ्या मंडळींना कोट्यवधी रुपये मिळवून देणा-या या व्यवसायाला आपल्या महाराष्ट्रात मात्र अजूनही प्रकाशकाधीनच राहावे लागलेले दिसते. वर्षानुवर्षे प्रकाशन व्यवसायात राहून नवनवीन पुस्तके काढणाऱ्या प्रथितयश प्रकाशकांनी तोट्याचे रडगाणे गाणे कधीच थांबवलेले दिसत नाही. स्वत:ला मराठी भाषा, संस्कृतीचे मक्तेदार म्हणवणारे मोठे प्रकाशक आणि त्यांचा कारभार हा साराच गंभीर मामला आहे. लेखकाच्या लिखाणाचे संपादन-संशोधन करण्याच्या फंदात पडण्यापेक्षा आर्थिक फायद्याचा विचार करणे हे पुढारलेल्या प्रकाशकाच्या यशाचे गमक असते. त्यामुळे प्रकाशकाच्या ‘हिशेबा’मध्ये न बसणाऱ्या विचारांची पुस्तके छपाईच्या यादीतून आपोआप गळतात. त्यातही छपाईची यादी मोठी असेल तर ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मंडळींच्या तुलनेत नवोदितांच्या कलाकृतीवर फुली मारली जाते, भलेही ते किती चांगले पुस्तक असो. याचा परिणाम असा होतो की, प्रतिभावान कवी वा लेखक अशा प्रकाशकांचा नाद सोडतो. परिणामी समाज एका दर्जेदार वाङ्मयीन निर्मितीपासून दूर राहतो. समजा त्या लेखक वा कवीकडे आर्थिक पाठबळ असेल तर तो स्वत:च पुस्तक छपाईच्या क्षेत्रात उडी मारतो. येथेही त्याची उडी चुकते. कारण छपाईच्या क्षेत्रातील कागदांपासून छपाईपर्यंतच्या कामात खर्चाचे आकडे नवख्यांसाठी वाढणारे असतात. त्याचा त्याला चांगलाच ‘अनुभव’ येतो आणि त्यानंतरची खरी कसोटी असते पुस्तक वितरणाची. या क्षेत्रात हा नवखा साहित्यिक मार खातो. अगदी पदरमोड करून प्रकाशित केलेली साहित्यकृती वितरण अवस्थेअभावी वाचकांपर्यंत पोचत नाही. पुस्तकाचे दुकानदार पुस्तकाला निम्म्या दरातही स्वीकारायला तयार नसतात. परिणामी स्वखर्चाने केलेल्या प्रकाशन सोहळ्याच्या भरुदडासह पुस्तकाच्या निर्मितीसाठी केलेल्या सगळा खर्च आणि खटाटोप साहित्यिकाच्या डोक्यावर पडतो. त्यामुळे कितीही प्रतिभावान वा धनवान लेखक पुन्हा पुस्तक प्रकाशनाच्या भानगडीत पडत नाही. परिणामी वाचक एका चांगल्या लेखकापासून दुरावतात.

थोडक्यात, पुस्तक प्रकाशन आणि वितरणाच्या साखळीवर हुकूमत असणा-या मूठभर मंडळींनी मराठी सारस्वताची दशा आणि दिशा काय असावी, असे ठरवल्याने मराठी वाङ्मयाची फारशी प्रगती झाली नाही. त्या तुलनेत इंग्रजीचा वाढता व्याप पाहिल्यास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या भाषेत प्रचंड प्रमाणावर पुस्तके प्रसिद्ध होताना दिसतात. अमेरिकेत दरवर्षी आठ ते अकरा हजार नवे प्रकाशक उदयाला येतात. प्रस्थापित पन्नास हजारहून अधिक प्रकाशकांच्या माध्यमातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर पुस्तके बाजारात येतात. एक चांगला प्रकाशक वर्षाला 10 ते 50 पुस्तके प्रसिद्ध करतो. विशेष म्हणजे या एकूण पुस्तकांपैकी 78 टक्के पुस्तकांची निर्मिती छोट्या प्रकाशकांकडून झालेली असते. सुमारे 52 टक्के पुस्तके दुकानात जात नाहीत. इंटरनेट, बुक क्लब आदी माध्यमातून ती वाचकांपर्यंत पोहचतात. पुस्तकविक्रीचे आकडे हजारांपासून लाखांपर्यंत सहजपणे फिरत असतात; कारण युरोप-अमेरिकेतील साक्षरतेला समृद्धी आणि सजगतेची जोड लाभलेली आहे.

आपल्याकडे 2011च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 75.6 टक्के असल्याचे दिसते. जगाच्या एकूण लोकसंख्येची सरासरी साक्षरता 84 टक्के आहे. म्हणजे आपण त्या सरासरीच्या जवळपासही अजून गेलेलो नाही. त्यामुळे भारतात आज जेवढे निरक्षर आहेत (30 कोटी लोकांहून जास्त) तेवढे जगातील कोणत्याच देशात नाहीत. त्याहून खेदाची गोष्ट म्हणजे स्त्री आणि पुरुषांच्या साक्षरतेच्या प्रमाणातील तफावत, पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण 82.14 टक्के आहे तर स्त्रियांमध्ये ते प्रमाण 65.46 टक्के असल्याचे 2011च्या जनगणनेत स्पष्ट झाले आहे.

घरातील महिला निरक्षर असणे ही बाब कुटुंबनियोजन, कौटुंबिक आरोग्य आणि शिक्षण या सगळ्याच गोष्टींना मारक ठरते, हे येथे वेगळे सांगायला नको. सध्या तर अशा निरक्षरांना साक्षर करण्यासाठी शासकीय पातळीवर होत असलेले प्रयत्न ब-यापैकी मंदावलेले दिसत आहेत. गेल्या दशकातील साक्षरतेची वाढ (नऊ टक्के) त्याची साक्ष पटवते. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठी एक मोठी जनमोहीम उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या ओळखीतील निरक्षर व्यक्तीला साक्षरतेचा आणि शाळेत न जाऊ शकणा-या मुलाला शाळेचा मार्ग दाखवला तरी या समस्येवर वेगाने मात करता येईल; परंतु दुर्दैवाने सगळ्याच गोष्टींसाठी सरकारला जबाबदार ठरवून टीका करण्याचे अधिकार मध्यमवर्गीय लोकांनी हाती घेतले आहेत. त्याच वेळी स्वकर्तव्याकडेही त्यांनी सोयीस्करपणे पाठ फिरवल्याने साक्षर- निरक्षरतेचा भेद दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.

भारतात एकीकडे निरक्षर आणि नवसाक्षरांचा प्रश्न आहे, तर दुसरीकडे इंग्रजी शिकलेल्या लोकांची संख्याही वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शाळांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढताना दिसत आहे.

भारतातील पुस्तकांची बाजारपेठ अन्य भाषिक पुस्तकांच्या तुलनेत वेगाने प्रस्थापित होताना दिसत आहे. ‘निल्सन बुक स्कॅन इंडिया’च्या आकडेवारीनुसार 2011च्या पहिल्या सत्रामध्ये भारतातील पुस्तकांची विक्री 45 टक्क्यांनी वाढली. चेतन भगत यांच्यासारख्या प्रसिद्ध लेखकाच्या पुस्तकाच्या तीन लाखांहून अधिक प्रती खपतात, हे या आकडेवारीवरून सिद्ध होते. त्याच जोडीला भारतीय बाजारात जेफ्री आर्चर असो व स्टिव्ह जॉब्स्चे चरित्र असो, यांना चांगलीच बाजारपेठ आहे, हे कळल्यामुळे जगातील बहुतांश नामवंत कंपन्यांनी भारतीय सुशिक्षितांकडे लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे. मोठे बजेट, मोठा आवाका आणि संपादन-संशोधनातील प्रावीण्य यामुळे भारतीय प्रकाशकांना या बहुराष्ट्रीय प्रकाशकांची बरोबरी करता येणे शक्य नाही.

अशा वेळी भारतातील सर्वच भाषेतील प्रकाशकांना आपापल्या भाषेशिवाय पर्याय उरणार नाही. शहरातील ऑनलाईन किंवा वातानुकूलित दुकानात खरेदी करणा-या मंडळींना बहुराष्ट्रीय किंवा बड्या कंपन्यांनी आपल्याकडे खेचून घेतलेले असल्याने ग्रामीण आणि निमशहरी वाचक हेच छोट्या-मोठ्या देशी कंपन्यांचे आश्रयदाते असतील; कारण भारतात इंग्रजीचा प्रभाव आणि प्रसार कितीही वाढला तरी अजून किमान शंभर वर्षे तरी ग्रामीण भागात मराठीचाच वापर सर्रासपणे होत राहील. या ग्रामीण आणि बहुजनवाचकांच्या माथ्यावर सुरुवातीपासून अभिजनांच्या भावजीवनाशी किंवा समाजजीवनाशी संबंधित विषय मारण्यात आले. आजही मराठीतील लोकप्रिय कवी, कथाकार वा विनोदी लेखकांनी चितारलेली कथा-कल्पना आणि पात्रे शहरातील चाळ वा फ्लॅट संस्कृतीतीलच असतात. मराठीतील बहुतांश गाजलेली नाटके, कादंब-या, कथासंग्रह या सगळ्याचा केंद्रबिंदू कायमच शहरी मध्यमवर्गाच्या अवतीभवती फिरत राहिलेला दिसतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र प्रज्ञेचा विलास झालेला दिसत नाही. पाश्चात्य वा पौर्वात्य विचारवंतांची भाषांतरे किंवा अनुकरण करून, त्यावर भाष्य करणे ही आपल्याकडे स्वातंत्र्यपूर्वकाळापासून एक पद्धतच बनली. स्वत: एखाद्या विषयाचा पुरेसा अभ्यास करणे, आकलन आणि चिंतन झाल्यावर त्यावर आपले परखड मत व्यक्त करणे आदी विषयात आम्ही मराठी लोक कायमच मागे राहिलो.

यासंदर्भात 1930 मध्ये गोव्यात झालेल्या पंधराव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना   प्रा. वामनराव जोशी म्हणाले होते, ‘‘तत्त्वज्ञान, धर्म, समाजशास्त्र वगैरेंच्या बाबतीत अगदी मुळापर्यंत जाण्याची व स्वतंत्रपणे विचार करण्याची फारशी ताकद आपणात आलेली नाही व म्हणूनच आपण दुस-यांच्या ग्रंथांची भाषांतर करून, टीका आणि सारांश लिहून आपले समाधान करून घेतो आणि लोकांचे समाधान करू पाहतो.’’

प्रा. जोशी तिथेच थांबत नाहीत, ते स्पष्टपणे सांगतात, ‘आपल्याकडे सत्य शोधणारे, सत्य बोलणारे व सत्य ऐकणारे फार थोडे.’ आज सुमारे ८ दशकांनंतरही प्रा. जोशी यांनी वर्णिलेली स्थिती बदललेली नाही.

मराठी साहित्य संमेलनाच्या अगदी आरंभाच्या काळात मराठी प्रकाशकांची, लेखकांची एक संस्था होती,  मराठी ग्रंथकार  सभा . या ग्रंथकार सभेने न्यायमूर्ती रानडे यांच्यामार्फत महात्मा फुले यांना आपल्या साहित्य सम्मेलनाचे  निमंत्रण पाठवले हाते. त्यावर फुले यांनी रोखठोक उत्तर दिले होते, ‘यांच्यात मिसळल्याने आम्हा शुद्रातिशुद्रांचा काहीच फायदा होणे नाही. आम्हीच आमचा विचार केला पाहिजे.’ इतक्या वर्षानंतर आजच्या ग्रंथनिर्मितीकडे पाहिल्यावर फुले यांचे विचार आजही समर्पक वाटतात; पण त्यानुसार सर्वसामान्य लोकांसाठी, लोकभाषेत पुस्तके येत नाहीत, आली तर ती लोकांपर्यंत पोचत नाहीत, ही एक मोठी खंत आहे. ती यावी, चांगली खपावी एवढीच महाबळेश्वराच्या सुरु झालेल्या पुस्तकाच्या गावाच्या  निमित्ताने अपेक्षा. कारण पुस्तक म्ह्णजे निर्जीव वस्तू नाही. पुस्तक आहे कोणतीच अपेक्षा न ठेवता आपले अंतरंग मोकळे करणारा, मनोरंजन करणारा, मार्ग दाखवणारा, कधी गुरू तर कधी वडीलकीच्या नात्याने सल्ले देणारा जिवलग, पण त्यासाठी तुम्हाला त्याच्याजवळ जाता आले पाहिजे. मग पहा त्याच्या पानापानातून कशी ज्ञान-रंजनाची, मार्गदर्शनाची  अखंड सळसळ ऐकू येईल.

दिवंगत रंगकर्मी सफदर हाश्मी यांच्याच शब्दात सांगायचे तर -

किताबें, करती है बाते

बीते जमानों की

दुनिया की, इन्सानो की

आज की, कल की

एक-एक पल की

खुशियों की, गमों की

फुलों की, बमों की

जीत की, हार की

प्यार की, मार की।

क्या तूम नही सुनोंगे

इन किताबों की बातें

किताबे कुछ कहना चाहती है

तुम्हारे पास रहना चाहती है।

Follows us on : @MaheshMhatre

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2017 04:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close