मराठी बातम्या /बातम्या /ब्लॉग स्पेस /

"जाता पंढरीसी सुख वाटे जीवा"

"जाता पंढरीसी सुख वाटे जीवा"

  विठ्ठल, विठोबा, विठाई, पांडुरंग, पंढरीनाथ.... महाराष्ट्राचे आराध्य दैवत. सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून विविध राजे-राजवाडे-सरदारांपर्यंत ज्याची भक्ती प्रसिद्ध तो विठोबा म्हणजे मराठी समाजाचा माय-बाप. ज्याच्या पायावर कोणीही डोके ठेऊ शकतो असा साधा-सरळ देव म्हणजे पांडुरंग.

विठ्ठल, विठोबा, विठाई, पांडुरंग, पंढरीनाथ.... महाराष्ट्राचे आराध्य दैवत. सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून विविध राजे-राजवाडे-सरदारांपर्यंत ज्याची भक्ती प्रसिद्ध तो विठोबा म्हणजे मराठी समाजाचा माय-बाप. ज्याच्या पायावर कोणीही डोके ठेऊ शकतो असा साधा-सरळ देव म्हणजे पांडुरंग.

विठ्ठल, विठोबा, विठाई, पांडुरंग, पंढरीनाथ.... महाराष्ट्राचे आराध्य दैवत. सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून विविध राजे-राजवाडे-सरदारांपर्यंत ज्याची भक्ती प्रसिद्ध तो विठोबा म्हणजे मराठी समाजाचा माय-बाप. ज्याच्या पायावर कोणीही डोके ठेऊ शकतो असा साधा-सरळ देव म्हणजे पांडुरंग.

पुढे वाचा ...

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, IBN लोकमत

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा

आनंदे केशवा भेटताची

या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी

पाहिली शोधोनी अवघी तीर्थे

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार

ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे

ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक

ऐसा वेणूनादी काना दावा

ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर

ऐसे पाहता निर्धार नाही कोठे

सेना म्हणे खूण सांगितली संती

या परती विश्रांती न मिळे जीवा

आकाशात ढगांची गर्दी व्हायला लागली की उन्हाने तप्त झालेल्या धरित्रीला पाऊसधारांची ओढ लागते, अगदी तशीच ओढ आषाढाच्या चाहुलीने प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात जागते. आज शेकडो वर्षांपासून पंढरीच्या वाटेवर अशा लक्षलक्ष वारकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या चालताना दिसतात. कुणाच्या घरात दहा पिढ्यांपासून, कुणाच्या घरात ५ पिढ्यांपासून तर कुणाच्या घरात कुळाचार म्हणून पंढरीची वारी निष्ठेने, आनंदाने, नित्यनियमाने  केली जाते. काय असेल या परंपरेमागील कारणसूत्रं ? कशी सुरू झाली असेल ही परंपरा ? वारीचा लिखित इतिहास तसे पहिले तर तेराव्या शतकापासूनचा आहे. पंढरपुरातील संत नामदेव महाराज यांनी संत निवृत्ती-ज्ञानेश्वरादी भावंडाना आळंदीत भेटून खरेतर वारीच्या परंपरेचे पुनरुज्जीवन केले असावे.

ज्ञानेश्वर माउलींच्या काही अभंगात वारीची परंपरा त्यांच्या घरात आधीपासून आहे असे उल्लेख येतात. माउलींच्या आई-बाबांनी पंढरीची वारी केल्याचं म्हटलं जाते. याचा अर्थ असा आहे की सातशे-साडेसातशे वर्षांपूर्वी वारी नक्कीच सुरू होती. जगद्गुरू तुकाराम महाराजही पंढरीची वारी करत असते. पुढे त्यांचे चिरंजीव नारायण  महाराज यांनी ती परंपरा चालू ठेवली. त्याकाळी म्हणजेच १६८० ते १८३० च्या दरम्यान वारी देहू व आळंदीहून एकत्रितपणे जात असल्याचे उल्लेख सापडतात. त्याकाळात महाराष्ट्र विविध राजकीय  स्थित्यंतरातून जात होता, त्या काळात दिंडी लोकाश्रयाने सुरूच होती. सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी  लष्करी अनुभव असणाऱ्या सरदार हैबतबाबांनी दिंडीला शाही रूप देताना शिस्तही लावली. त्यांच्यामुळे  दिंडीत हत्ती-घोडे आले, त्याच जोडीला दिंडीतील आचारसंहिताही तयार झाली. त्यांनीच दिंडीत म्हणायच्या अभंगांची मालिका बनवली. आज लक्षावधी लोक दिंडीत कोणत्याही गोंधळाविना चालतात, याचे सारे श्रेय हैबतबाबांच्या दूरदृष्टीला जाते...देहू -आळंदीहून निघणाऱ्या दिंड्यांची आता तयारी पूर्ण होत आली आहे. निवृत्तीनाथ आणि मुक्ताई माऊलीच्या पालख्या आधीच पंढरीच्या दिशेने निघाल्यात. अवघ्या दोन-तीन दिवसात देहू- आळंदीहून वारकरी 'ग्यानबा-तुकारामाच्या' जयघोषात पंढरीच्या दिशेने प्रयाण करतील... तेंव्हा टाळ- मृदूंगाच्या घोषाने विठ्ठलाच्या पायाची वीट थरारेल....

विठ्ठल, विठोबा, विठाई, पांडुरंग, पंढरीनाथ.... महाराष्ट्राचे आराध्य दैवत. सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून विविध राजे-राजवाडे-सरदारांपर्यंत ज्याची भक्ती प्रसिद्ध तो विठोबा म्हणजे मराठी समाजाचा माय-बाप. ज्याच्या पायावर कोणीही डोके ठेऊ शकतो असा साधा-सरळ देव म्हणजे पांडुरंग. ज्याच्या दारी जाती-भेदाची बंधने निखळून पडावीत यासाठी नामदेवापासून साने गुरुजींपर्यंत अनेकांनी यशस्वी प्रयत्न केले तो विठोबा म्हणजे अनेकांचा प्राणसखा. त्याचे दर्शन घेण्यासाठी आळंदी-देहूपासून राज्य-परराज्यातून लाखो वैष्णवांच्या शेकडो दिंड्या टाळ-मृदूंगाचा गजर करीत चंद्रभागेच्या तीरावर येऊन दाखल होतात. पंढरीतील कणाकणात ज्यांना विठोबा सापडत असतो. समोर येणाऱ्या प्रत्येक वैष्णव भक्तात ज्यांना 'माउली' दिसत असते. त्या वारकऱ्यांची विठ्ठल मंदिरावर झळकणारा कळस पाहूनही त्यांची विठ्ठल दर्शनाची आस शांत होते. दोन आठवड्यांहून अधिक काळ चालत आलेल्या या भाविकांच्या विठ्ठलभक्तीची ही अनोखी पद्धत तुम्हाला अन्यत्र कुठेच सापडणार नाही. ज्याच्याकडे कोणताही नवस केला जात नाही.

एकदशीच्या उपवासाशिवाय ज्याच्या भक्तीत कठीणता नाही.  कुठल्याही व्रतवैकल्याचा बडिवार नाही.  जो  फक्त नामाचा भुकेला आहे. युगानुयुगे भक्तांसाठी वाट पाहणारा, हा विठ्ठल म्हणजे  भक्तांच्या घरची कामे करणारा हा साधा-भोळा देव. त्याला जो प्रेमाने हाक मारेल, त्याला तेव्हढ्याच प्रेमाने ओ देणारा हा सखा  पांडुरंग म्हणूनच कोट्यवधी मराठी जनांचा जीवनाधार आहे.  तो पांडुरंग  मूळचा 'कानडी' किंवा 'कर्नाटकी' असला तरी शेकडो वर्षांपासून मराठी मनानं मोठया मानानं त्याला स्विकारलं आहे.

अवघीच पापे गेली दिगंतरी । वैकुंठ पंढरी देखिलिया॥

तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक । विठ्ठलचि एक देखिलिया॥

जगदगुरु तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर फक्त ज्याच्या फक्त दर्शनाने जन्माला आल्याचे सार्थक होते, तो देव म्हणजे विठ्ठल. अनेक शतकांपासून मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या विठाई माउलीने मराठी जनांना जी ओढ लावली आहे, तशी ओढ तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेच पाहायला मिळणार नाही. उत्तरेत कावडीये जसे खांद्यावर कावडी घेऊन श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी रस्त्यावर 'शक्ती प्रदर्शन' करतात, तसे तुम्हाला पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीत चुकूनही पाहायला मिळणार नाही. 'स्वामिये शरणं अय्यप्पा' असा जप करीत शबरीमला येथे जाण्यासाठी अय्यप्पाचे भक्त ज्या कठीण मार्गाचा, व्रताचा, नित्यनेमाचे पालन करतात, तसे माउलींच्या दिंडीत आढळणार नाही. येथे भावभक्तीच्या प्रवाहाला संप्रदायाच्या शिस्तीचे कोंदण आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाताना हा लक्षावधी जनांचा प्रवाहो हरिनामाचा गजर करत आणि अवघे आसमंत भक्तिमय करत पुढे जात राहतो.

अर्थात, दिंडी मार्ग असो किंवा पंढरपूरचे वाळवंट, वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या प्रत्येक ठिकाणांवर लोकनियुक्त आणि लोककल्याणकारी  शासनाच्या माध्यमातून अत्यावश्यक सुविधा पुरवल्या गेल्या जाणे अपेक्षित असते, पण तसे आजवर कधीच झाले नाही. वास्तविक पाहता जे शासन नाशिक येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी ३ हजार कोटी खर्च करताना मागे-पुढे पहात नाही, तेच शासन कुंभमेळ्यापेक्षा जिथे जास्त गर्दी होते त्या वारीकडे दुर्लक्ष करते. याला काय म्हणावे ? दरवर्षी आषाढी एकादशीला  महापूजेसाठी पंढरपूरला हजेरी लावणारे मुख्यमंत्री पाऊस, पीक-पाणी चांगले व्हावे यासाठी विठ्ठलाला साकडे घालतात, मग त्यांना त्या  दिंडीत चालणाऱ्या विठ्ठलभक्त वारकऱ्याला रस्त्यात निवारा, पाणी, संडास आदी मूलभूत गोष्टी मिळाव्यात असे का वाटू नये ? दरवर्षी किमान ४ एकादश्या, दसरा, दिवाळी सारखे सगळे मोठे सण अशा , किमान २५ ते ३० दिवसांसाठी पंढरपूर भाविकांनी गजबजलेले असते.

त्यांच्यासाठी सुसज्ज वाहनतळ, एकावेळी किमान २-३ लाख लोक आले तरी पुरतील एवढी संडास-बाथरूमची सोय, चांगली निवासव्यवस्था आणि मोठे रुग्णालय एवढ्या मोजक्या गोष्टी केल्या तरी पंढरपुरात येणाऱ्या खेड्या-पाड्यातील लाखो लोकांचा त्रास आणि जीव वाचू शकेल. पण पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांना या साऱ्या सुविधांची पर्वा नसते. खरेतर त्यांच्या साध्याभोळ्या देवासारखे, त्याचे भक्तही साधेच. ' माझे जिवीची आवडी, पंढरपूर नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले ' या भक्ती भावाने दिंडीत येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांसाठी प्रत्येक दिवस खरे सांगायचे तर प्रत्येक क्षण आनंदाचा वाटत असतो, त्यामुळे त्याची सकाळपासून रात्रीपर्यंतची  प्रत्येक कृती आनंदमय असते.  पाऊस असला की वारकऱ्यांच्या त्रासात वाढच होते, कारण दिंडीतील वाटचाल ते झोप ही सगळीच कामे उघड्यावर होतात, पण त्यांच्या वारीत खंड पडत नाही.  ‘आकाश मंडप। पृथिवी आसन’ असाच सारा कारभार असतो.

पंढरीची वारी, संतांचे दर्शन आणि ‘रामकृष्णहरी’ मंत्राचा ध्यास, ही महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांची जगण्याची त्रिसूत्री आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. भक्तिधर्माची पताका अखंडपणे खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या वैष्णवांनी अनेक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्थित्यंतरे पाहिली. तरी पंढरीची ओढ मात्र कायम आहे. यातच या परंपरेने चालत आलेल्या ठेव्याचे महत्त्व आहे. परंतु येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे वैष्णवांचा धर्म हा वारीपुरता किंवा रामकृष्णहरी मंत्रापुरता मर्यादित नाही.  ‘‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले। तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा।’’ असे 'अभंग शब्द'  मानणारा खरा ‘वारकरी’ असतो. हा वारकरी वर वर  साधासुधा दिसत असतो. वेश बावळा आणि अंतरी नाना कळा असणारा हा ‘‘मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू ऐसे’’ असे म्हणत प्रतिकूल परिस्थितीत ‘धारकरी’ होऊ शकतो, हे महाराष्ट्राने अनेकदा अनुभवलेले आहे. म्हणून स्वत:ला दास मानणारा हा वैष्णववीर, प्रपंचासह परमार्थाच्या वाटेवर येणाऱ्या संकटांवर मोठ्या धीराने मात करतो. यासाठी त्याला उपयुक्त ठरते त्याची परमेश्वरावरील अगाढ श्रद्धा, ‘जेथे जातो तेथे। तू माझा सांगाती। चालविसी हाती। धरोनिया’ अशी भावना उराशी बाळगून वारकरी आयुष्याची वारी चालत असतो.

या वाटेवर ज्यांची पावले अढळ राहतात त्यांना ‘मोक्षपंढरी’ हमखास दिसते. सावळय़ा परब्रह्माचे दर्शन घडते...

अनंताचा शेला। वा-यावरी झुले।

 पाहुनिया डुले। मन माझे।।

दु:खाचे आठव। वाहुनिये गेले।

 विठ्ठला साकव। नाम मुझे।।

आता आदी अंत। नुरले, नुरले।

अनहृत नाद। कानी वाजे।।

First published:

Tags: पालखी, महेश म्हात्रे, वारी