मराठी बातम्या /बातम्या /ब्लॉग स्पेस /

BLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा

BLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा

सत्तेच्या दलालांना पक्षाने दरवाजा दाखवला पाहिजे आणि कलंकित नेत्यांना पायघड्या घालण्याऐवजी, पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना राज्यातदेखील अधिक जबाबदारी दिली पाहिजे. पूर्वीच्या सरंजामी पद्धतीने पक्ष चालवल्यास, काँग्रेस पक्षाचे रूपांतर एका म्युझियममध्ये होईल.

सत्तेच्या दलालांना पक्षाने दरवाजा दाखवला पाहिजे आणि कलंकित नेत्यांना पायघड्या घालण्याऐवजी, पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना राज्यातदेखील अधिक जबाबदारी दिली पाहिजे. पूर्वीच्या सरंजामी पद्धतीने पक्ष चालवल्यास, काँग्रेस पक्षाचे रूपांतर एका म्युझियममध्ये होईल.

सत्तेच्या दलालांना पक्षाने दरवाजा दाखवला पाहिजे आणि कलंकित नेत्यांना पायघड्या घालण्याऐवजी, पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना राज्यातदेखील अधिक जबाबदारी दिली पाहिजे. पूर्वीच्या सरंजामी पद्धतीने पक्ष चालवल्यास, काँग्रेस पक्षाचे रूपांतर एका म्युझियममध्ये होईल.

पुढे वाचा ...

हेमंत देसाई

2019च्या लोकसभा निवडणुकीत देशभर भाजपचीच हवा असली, तरी महाराष्ट्रात लोकसभेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीत रालोआ आघाडी-महायुतीचे पानिपत होईल, असे तीन महिन्यांपूर्वी बडे बडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते छातीठोकपणे सांगत होते. मात्र भारतीय लष्कराने पुलवामाचा बदला घेतल्यानंतर, भाजपने त्याचा पद्धतशीरपणे फायदा उठवला आणि महाराष्ट्रातही भाजपने शिवसेनेला कनवटीला बांधून, वातावरण एकदमच फिरवून टाकले. वास्तविक काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकसभेसाठी आघाडी बांधण्याची चर्चा सर्वात आधी सुरू झाली. परंतु त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीला टांग मारली. सुजय विखे पाटील, रणजितसिंह मोहिते हे भाजपत गेले. तर सांगलीत प्रतीक पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटना व डाव्या पक्षांशीही जागांवरून मतभेद निर्माण झाले.

एकीकडे शिवसेनेशी मतभेद संपवून एकजुटीने सेना-भाजप वाटचाल करत असताना, काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये नगरसारख्या जागांवरून मिठाचा खडा पडला. त्यात भर म्हणून की काय, हिंगोलीचे काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करून पळ काढला. तर प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणात परतण्यासाठी नांदेडमध्ये पत्नीचे नाव पुढे केले. जे दोन खासदारच गेल्यावेळी मोदी लाटेत निवडून आले होते, त्यांनीच शेपूट घातल्यास पक्षाच्या इतर उमेदवारांचे नीतिधैर्य खचेल, नाहीतर काय होईल? औरंगाबादचे काँग्रेसचे नाराज नेते अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमधून तिकीट न मिळाल्यामुळे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. वास्तविक सत्तारभाई हे आमदार असून, ते सिल्लोडचे (हा मतदारसंघ जालना मतदारसंघाचा भाग आहे.) आहेत. तेव्हा त्यांना औंरगाबादमधून कशासाठी उमेदवारी द्यायची? सत्तारभाईंनी कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी, ही विनंती केली होती, पण ती मान्य न झाल्यामुळे ते नाराज झाले. सत्तारभाई अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असून, त्यांनी तिकीट न मिळताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे उजवे हात गिरीश महाजन यांची भेट घेतली.

कोणत्याही पक्षात नेत्याच्या इच्छेप्रमाणे सर्वकाही होत नसते. परंतु लगेच नाराज होऊऩ, संपूर्णतः विरोधी विचारसरणीच्या भाजपशी कोणी दोस्ती करत असल्यास, अशा माणसाच्या निष्ठा कमालीच्या पातळ आहेत, असेच म्हणावे लागेल. उद्या भाजप सत्तारभाईंना औरंगाबादमधून अपक्ष म्हणून उभे राहण्यासाठी बळ देऊन, शिवसेनेचे खासदार युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यंना मदत करतील का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

तिकडे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने विनायक बांगडे यांची उमेदवारी जाहीर करताच, ‘माझे कोणी ऐकायला तयार नाही आणि मीसुद्धा राजीनामा देण्याच्या मनःस्थितीत आहे’ अशी असहायता अशोकरावांनी व्यक्त केली. तशी ऑडिओ क्लिपच व्हायरल झाली. बांगडे हे विदर्भातील काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांचे समर्थक असून, ते तेली समाजाचे आहेत. नागपूर व यवतमाळमध्ये कुणबी समाजाचा उमेदवार दिल्याने, चंद्रपुरात तेली समाजाचा उमेदवार हवा, अशी भूमिका वासनिक यांनी घेतली. तर, दिल्लीत आपल्या मताला फारशी किंमत नाही. वासनिकांच्या कलानुसार सर्वकाही होते, अशा आशयाची स्पष्ट भावना अशोकरावांनी व्यक्त केल्याचे या क्लिपवरून स्पष्ट झाले. वासनिक हे दिल्ली दरबारात वजन असलेले नेते असून, ते फार मोठा जनाधार असलेले वा लोकप्रिय नेते नाहीत. परंतु काँग्रेसचा कारभार याच पद्धतीने चालतो. इंदिरा गांधींनी काँग्रेसमध्ये प्रत्येक राज्यातील लोकप्रिय नेत्याच्या स्पर्धेत लोकांमध्ये फारसे स्थान नसणाऱ्या नेत्यांना उभे केले. समाजात पक्षाची पाळेमुळे रुजवणाऱ्या नेत्यांना फार मोठे होऊ द्यायचे नाही, ही त्यामागील भूमिका.

महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांचे महत्त्व इंदिरा-राजीव गांधींच्या काळात जाणीवपूर्वक कमी करण्यात आले. अशोकरावांचे वडील शंकरराव चव्हाण हेही पवारविरोधी गटातले नेते होते व त्यांना दिल्लीचे समर्थन लाभले होते. अशोकरावही निष्ठावंत फळीतील नेते म्हणूनच ओळखले जात. परंतु आता त्यांनाच दिल्लीच्या दादागिरीचा सामना करावा लागल्यामुळे, त्यांनी दबावतंत्राचा मार्ग स्वीकारला. ऑडिओ क्लिप अचानकपणे व्हायरल होणे, हा योगायोग नव्हे. त्यांच्या दबावानंतर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले सुरेश धानोरकर यांना बांगडे यांच्याऐवजी उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपवर आयात उमेदवारांवरून टीका करणाऱ्या काँग्रेसने स्वतः तोच मार्ग स्वीकारलेला दिसतो.

काँग्रेसची स्थिती जमीनदाराच्या पडक्या वाड्यासारखी झाली आहे, अशा आशयाची टीका एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. ती टीका योग्यच होती आणि आज तर काँग्रेसची स्थिती उद्धवस्त धर्मशाळेसारखीच झाली आहे. एकतर पक्ष चालवण्यासाठी लागणारा निधी एकटे अशोकराव कुठून देणार? त्यांना इतर नेत्यांची आर्थिक मदत नाही. काही वर्षांपूर्वी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विलासरावांबद्दल, ते पक्षनिधीसाठी काहीच मदत करत नसल्याची तक्रार कुणाशी तरी बोलताना केली. तेव्हा चुकून माइक ऑन रहिला आणि हे गाऱ्हाणे चॅनेलच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचले...असो. देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी जी आक्रमक व विजिगिषू वृत्ती हवी, ती अशोकरावांकडे दिसत नाही. त्यांचे नेतृत्व वेळ निभावून नेणारे आहे, ऊर्जा देणारे नाही.

एकेकाळी पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तेथे पक्षास समर्थ उमेदवार मिळू नये, हे दुर्दैवी आहे. वास्तविक शहर काँग्रेसने पात्र व्यक्तींकडून चर्चा करून अर्ज मागवणे, त्याबदल्यात त्यांच्याकडून अनामत रक्कम घेणे, नंतर ही यादी प्रदेशकडे व तेथून दिल्लीकडे पाठवावी, अशी आजवरची पद्धत होती. आता मात्र शहर काँग्रेसच्या बैठकीऐवजी, काही नेत्यांनी क्लबमध्ये बसून नावे ठरवायची, कोणीही अर्ज करायचा, त्याच्या कार्यकर्तृत्वाचा विचारही करायचा नाही, असे सर्व सुरू आहे. पक्षाचे कार्य काही एका नियमाने चालावे. पक्षासाठी समर्पित होऊन काम करणाऱ्यांचा सन्मान व्हावा व त्यांना संधी मिळावी, अशा प्रकारची भूमिका पुण्याचे माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांनी घेतली आहे. परंतु अशा निष्ठावंत नेत्यांच्या मतांची पक्ष दखल घेत नसेल आणि आमदार अनंत गाडगीळ यांच्यासारख्या बुद्धिवंतांचीही कदर केली जात नसेल, तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष टिकणार कसा? राज्यसभेची खासदारकी देताना, रत्नाकर महाजन यांच्यासारख्या पक्षाची ‘ॲसेट’ असलेल्या नेत्यास का डावलण्यात आले?

वास्तविक काँग्रसने पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर, हुसैन दलवाई यांच्यासारख्या अनुभवी आणि काही एक वैचारिक पार्श्वभूमी असणाऱ्यांना अधिक महत्त्व दिले पाहिजे. काँग्रेसपासून मध्यमवर्गही तुटला असून, तो आपल्या बाजूला कसा वळेल, हेही पाहिले पाहिजे. माजी मंत्री आणि संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी तीन महिन्यांपूर्वी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अकोले तालुक्यात शेतकरी मेळावा आयोजित केला होता. त्यात त्यांनी काँग्रेसची परंपरा सांगून, भाजपने शेतकऱ्यांवर कसकसा अन्याय केला आहे, हे सविस्तर विशद केले होते. नगर जिल्ह्यात सुजय विखे पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत आले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी असलेल्या राधाकृष्णजींना घरातल्याच बंडाला थोपवत आले नाही. ते काँग्रेसशी निष्ठावंत आहेत का, हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असल्याचा टोमणा बाळासाहेब थोरात यांनी सार्थपणे मारला आहे. वास्तविक राधाकृष्णजींच्या पक्षनिष्ठेबद्दल अनेक वर्षे शंका असून, ते शिवसेनेत जाऊन मंत्री झालेले नेते आहेत. मंत्री, तसेच विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी कोणतीही चमक दाखवलेली नाही. तरीही पक्ष सोडून जाऊ नये, म्हणून त्यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडली असावी. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बाळासाहेबांना काँग्रेस कार्यकारिणीवर (सीडब्ल्यूसी) घेतले असले, तरी पक्षाने महाराष्ट्रातही त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट केले पाहिजे. बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री व कृषिमंत्री म्हणून उत्तम काम केले असून, त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांच्याविरुद्ध कोणताही आरोप नाही. त्यांचे पिताजी भाऊसाहेब थोरात हे स्वातंत्र्यसैनिक असून, ते मूळचे कम्युनिस्ट होते. सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य उत्तुंग आहे. संगमनेर सहकारी साखर कारखाना काढण्याची मूळ कल्पना त्यांचीच. मुळा नदीच्या खोल पात्रातून थेट डोंगरमाथ्यावर पाणी नेणारे भाऊसाहेब हे भगीरथच होते. जिल्हा बँक, साखर कारखाना, विविध सहकारी संस्था या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याचा विकास घडवला. डिस्टिलरी काढतानाही, कितीही फायदा असला, तरी दारूनिर्मिती करणार नाही, अशी भूमिका घेतली. राज्य सहकारी बँकेचे चेअरमन असताना, भाऊसाहेबांनी ट्रॅक्टरसाठी कर्जाची योजना राबवली. त्यांची नीतिमत्ता, शिस्त हे गुण बाळासाहेबांकडे आले असून, अशा नेत्यांना काँग्रेसने उभारी दिली पहिजे.

गतवर्षी गुजरात विधानसभा निवडणुकीत योग्य उमेदवार निवडण्याची जाबबादारी राहुलजींनी बाळासाहेबांवर सोपवली होती आणि ती त्यांनी समर्थपणे निभावली. मध्यंतरीच्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात मांडलेल्या सर्व ठरावांचा मसुदा त्यांनीच तयार केला होता. नारायण राणेंसारखे वादग्रस्त नेते घेऊन काँग्रेस पस्तावली. दुसरीकडे, पक्षातील दिल्लीकेंद्रित धोरणशैलीत बदल झालेला नाही. सत्तेच्या दलालांना पक्षाने दरवाजा दाखवला पाहिजे आणि कलंकित नेत्यांना पायघड्या घालण्याऐवजी, पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना राज्यातदेखील अधिक जबाबदारी दिली पाहिजे. पूर्वीच्या सरंजामी पद्धतीने पक्ष चालवल्यास, काँग्रेस पक्षाचे रूपांतर एका म्युझियममध्ये होईल.

(ब्लॉगमध्ये व्यक्त झालेली मत हे लेखकाचे वयक्तिक मत आहेत. 'त्याच्याशी न्यूज18 लोकमत' सहमत असेलत असं नाही. )

VIDEO: पार्थ पवारांचा अनोखा अंदाज; गाण्यावर धरला ठेका

First published: