मराठी बातम्या /बातम्या /ब्लॉग स्पेस /

#International Men's Day : पुरुष समजून घेताना...

#International Men's Day : पुरुष समजून घेताना...

प्रत्येक पुरुष हा 'साहिर' नसला तरीही 'इमरोझ' होण्याचा आणि आयुष्य प्रेमानं भारून टाकण्याचा प्रयत्न जरूर करू शकतो. स्त्रीलाही 'पुरुष' समजून घेण्यासाठी आणि पुरुषाच्या प्रेमाचा बहर अनुभवण्यासाठी 'अमृता'सारखे बाहू पसरायला हवेत इतकंच!

प्रत्येक पुरुष हा 'साहिर' नसला तरीही 'इमरोझ' होण्याचा आणि आयुष्य प्रेमानं भारून टाकण्याचा प्रयत्न जरूर करू शकतो. स्त्रीलाही 'पुरुष' समजून घेण्यासाठी आणि पुरुषाच्या प्रेमाचा बहर अनुभवण्यासाठी 'अमृता'सारखे बाहू पसरायला हवेत इतकंच!

प्रत्येक पुरुष हा 'साहिर' नसला तरीही 'इमरोझ' होण्याचा आणि आयुष्य प्रेमानं भारून टाकण्याचा प्रयत्न जरूर करू शकतो. स्त्रीलाही 'पुरुष' समजून घेण्यासाठी आणि पुरुषाच्या प्रेमाचा बहर अनुभवण्यासाठी 'अमृता'सारखे बाहू पसरायला हवेत इतकंच!

यामिनी विलास

पुरुष... या गोष्टीवरच माझं मनापासून प्रेम आहे. कदाचित मुलगी म्हणून जन्माला आले म्हणून असेल किंवा मग पुरुषांविषयी जाणून घेण्याच्या ओढीतून आलेलं असेल....!

'पुरुष समजून घ्यावा लागतो'

अशी ओळ असणारी एक कविता लिहिली होती...

आणि मुळात आजवर जितका प्रयत्न स्त्री समजून घेण्यासाठी कित्येक पिढ्यांनी घालवला तो किंबहुना त्याहून अर्धा प्रयत्न जरी पुरुष समजून घेण्यासाठी वापरला असता तरी आपण आणि आपला समाज भावनिक दृष्ट्या काळाच्या अधिक पुढे जाऊ शकला असता अस वाटतं... माझ्या कित्येक कवितांमधून वाचकांना दिसलेला 'तो' नेहमीच सुंदर , साधा, अफाट प्रेम करणारा असाच जाणवलाय... आणि मी सुद्धा आजवर जितक्या कविता लिहिल्या त्या कधीच ठरवून लिहावा लागल्या नाहीत.  ना की कोणती कलाकुसर करावी लागली...

कित्येकदा तर मीच पुरुष म्हणून कविता लिहिते आहे असं मला वाटून गेलंय... आणि त्यामुळे कवितांमध्ये मुलींचीही तितकीच सुंदर रुपं उभी राहू शकली आहेत.

मुळात आपण जी गोष्ट समजून घेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करत जातो ती गोष्ट आपल्याला अलगदपणे उलगडत जाते...

कोणताही अट्टाहास नसताना, कोणताही भेदभाव नसताना - आव नसताना आपण त्याच्या प्रेमात पडत जातो...!

तसंच माझं एकंदरीत 'पुरुष' या संकल्पनेविषयी झालं असावं...

आजवर पुरुषांची असंख्य रुपं पाहिली...अनुभवली...!

ज्यामध्ये घराची जबाबदारी सांभाळून स्वतः फाटका राहणारा पुरुषही होता आणि घराचं दडपण झुगारून स्वतंत्र राहणारा पुरुषही...

एकावेळी बेभान होऊन प्रेम करणारा आणि दुसरीकडे बाईला लाथा मारणारा...

कुशीत येऊन धुसमुसणारा, कपाळावर ओठ ठेवून विश्वास देणारा, हातात हात धरून फक्त चालत राहणारा... किनाऱ्यावर एक शब्दही न बोलता तासनतास घालवणारा... लाड पुरवणारा, हट्ट करणारा....

तर चिडून- रागावून- भांडून एकटं सोडून निघून जाणारा...

ही आणि अजून कित्तीतरी...

काही वर्णन करता येईल इतकी तर काही वाळू सारखी निसटून जाणारी अगणित रुपं...

बाप, भाऊ, प्रियकर, मित्र, सखा कित्तीतरी पुरूष नावाची पात्र माझ्या समोर आहेत...

पुरुषांची प्रत्येक गोष्ट ही 'पुरुषाची' गोष्ट आहे असं समजून सोडून दिली तर त्यातला भाव आणि ठाव कधीच लागणं शक्य नाही...!

एकाचवेळी शेकडो समुद्र पुरुषांच्या हृदयातून वाहत असतात... पण पुरुष मात्र नदी सारखा भान ठेवून वाहत असतो...

ना फेसाळत वाहाणं.... ना डोळ्यांत खाऱ्या पाण्याच्या लाटा...

त्याच्या आत असणाऱ्या आणि न दाखवता येणाऱ्या समुद्राची गाज आपल्याला ऐकता यायला हवी...

मोकळं होण्यासाठी त्याचे भरून आलेले डोळे आपण टिपून घ्यायला हवेत ओठांनी...

आणि त्याच्या मनाला लागलेलं दुखरं नख नेमकं कशाचं याचा ठावठिकाणाही शोधायला हवा.

आजूबाजूची असंख्य माणसं पाहिली आणि त्या माणसांचा अभ्यास करत गेलो की त्या माणसांनी केलेल्या चुका आपल्याला शुल्लक वाटू लागतात...

तसंच पुरुषाच्या बाबतीतही आहे...

पुरुषांच्या वागण्यामागचे नेमके धागेदोरे समजून घेण्यापर्यंत आपण पोहोचलो की त्या मागची एक नितळ भावना आपल्या समोर उभी राहाते... आणि त्या नंतर उरतं ते पुरुष समजून घेणं...

बाई म्हणून असंख्य वळणं आणि पुरुषांपासून 4 हात लांब राहून आयुष्य काढत असताना 'आपल्या पुरुषांना' जपणं हे ही ओघाने येतंच...

आणि त्यावेळी आयुष्य 'काढणं' न राहता ते सेलिब्रेट होत जातं...

पुरुषांच्या न दिसणाऱ्या अश्रू आणि प्रेम या दोन गोष्टींचा पत्ता लागला की बायकांचं जगणं सोप्पं होऊ शकेल असं वाटतं...

भडाभडा बोलून आपलं प्रेम व्यक्त करणाऱ्या बायका आणि बायकांना घाबरून ( उगाच कशाला भांडण म्हणून ) राहणारे पुरुष हे दोघेही मला फ्लॉप चित्रपटासारखे वाटतात...

कारण तिथे 'दाखवणं' येतं...

ज्यात स्वार्थ असू शकतो... स्त्री- पुरुषाचं नातं हे दाखवण्यापेक्षा जपण्याकडे अधिक भर देणारं असायला हवं...

प्रदर्शनापेक्षा अनुभूतीच्या सकस वाटेवरून नेणारं असायला हवं... आणि ते नातं कोणत्याही नावाशिवाय जगता यायला हवं...

शरीर, पैसा, प्रसिद्धी, मन, भावना , करियर कसलाच कसलाच भेदभाव स्त्री-पुरुष यांमध्ये काचेच्या भिंतीसारखा नसायला हवा...

असे असंख्य पुरुष वाचले.... प्रत्यक्षातलेही आणि पुस्तकातलेही...

सोप्प्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक पुरुष हा 'साहिर' नसला तरीही 'इमरोझ' होण्याचा आणि आयुष्य प्रेमानं भारून टाकण्याचा प्रयत्न जरूर करू शकतो...

या मधलं प्रेम हे कधी मुलीवर, पत्नीवर, प्रेयसीवर, आईवर कुणावरही असू शकतं....

पण स्त्रीलाही 'पुरुष' समजून घेण्यासाठी आणि पुरुषाच्या प्रेमाचा बहर अनुभवण्यासाठी 'अमृता'सारखे बाहू पसरायला हवेत....इतकंच !!!

पुरुष म्हणून जन्माला आलेल्या आणि बाईमधला पुरुष जिवंत असणाऱ्या प्रत्येकाला 'पुरुष' दिनाच्या शुभेच्छा

First published:

Tags: Women