मराठी बातम्या /बातम्या /ब्लॉग स्पेस /

BLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू

BLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू

शक्तिचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.

शक्तिचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.

महामानव डॉ. बाबासाहेब यांनी राजकारण, अर्थशास्त्र, समाजकारण, धर्मचिकित्सा याविषयी अनेक अजोड ग्रंथ लिहिले. त्यांच्या घणाघाती पत्रकारितेबद्दल फार कमी लिहिलं- बोललं जातं. आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या संपादक म्हणून केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल दोन शब्द...

पुढे वाचा ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांएवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वत्तेचा आणि कर्तृत्वाचा दुसरा एकही महाराष्ट्रीय माणूस आज आम्हाला तरी दिसत नाही!  भांडारकर, टिळक, रानडे, तेलंग, केतकर आणि राजवाडे यांची निर्भय ज्ञानोपासनेची पंरपरा तितक्याच तपश्चर्येने आणि अधिकाराने पुढे चालवणारा महर्षी महाराष्ट्रात आज कोण आहे हे आम्ही विचारतो! महार जातीत जन्माला आलेला हा माणूस वृत्तीने, व्यासंगाने आणि अधिकाराने ब्राह्मणापेक्षाही अधिक श्रेष्ठ आणि पवित्र असा ब्राह्मण आहे! एवढेच नव्हे तर ब्रह्मर्षीया श्रेष्ठ पदवीपर्यंत जाऊन तो पोहोचलेला आहे. ज्या कोणा सनातनी ब्राह्मणांना आपल्या जन्मजात ब्राह्मण्यीच घमेंड असेल, त्यांनी या कर्मजात ब्राह्मणाच्या घरात जाऊन त्याचे शुचिर्भूत, सोज्वळ आणि ज्ञानमय जीवन पहावे, म्हणजे श्रीमुखात बसल्यासारखा चेहरा करून नाही तो बाहेर पडला तर तुम्ही सांगाल ते आम्ही मान्य करू! ’ -  आचार्य प्र. के. अत्रे महामानव डॉ. बाबासाहेब यांनी राजकारण, अर्थशास्त्र, समाजकारण, धर्मचिकित्सा याविषयी अनेक अजोड ग्रंथ लिहिले. डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्रकारितेतील असामान्य कामगिरीबद्दल दोन शब्द. डॉ. बाबासाहेबांच्या सामाजिक व राजकीय कार्याची सुरुवात 1919 साली झाली. त्यांची पत्रकारिता 1920 साली सुरू झाली. 31 जानेवारी 1920 रोजी त्यांनी ‘मूकनायक’ पाक्षिक म्हणून सुरू केले. या पत्राच्या प्रकाशनासाठी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी 2500 रुपयांची देणगी दिली होती. ‘मूकनायक’ सुरू झाले तेव्हा लोकमान्य टिळक हयात होते. परंतु त्यांच्या ‘केसरी’ने ‘मूकनायका’ची पोच तर दिली नाहीच, पण पैसे घेऊन जाहिरात देण्याचेसुद्धा नाकारले. हे खुद्द डॉ. बाबासाहेबांनीच नमूद केले आहे. ‘मूकनायका’त बाबासाहेबांनी विविध विषयांवर अग्रलेख लिहिले. डॉ. बाबासाहेबांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ ही संस्था सुरू केल्यानंतर तीन वर्षांनी ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र सुरू केले. ‘बहिष्कृत भारत’ महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाले. त्यामध्ये महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी, महाड येथील धर्मसंगर व इंग्रज सरकारची जबाबदारी अशा विषयांवरचे त्यांचे मौलिक अग्रलेख आहेत. चवदार तळे सत्याग्रहासंदर्भात खास पुरवणीही काढण्यात आली होती. या पत्रातून सनातन्यांशी त्यांनी वाग्युद्धही केले. ‘बहिष्कृत भारता’त बाबासाहेब ‘आजकालचे प्रश्न’ व ‘प्रासंगिक विचार’ या दोन सदरांत स्फुट लेखन करत असत. मराठी-इंग्रजीत घणाघाती लेखन बाबासाहेबांचे महत्त्वाचे सर्व लेखन इंग्रजीतून झाले आहे. मराठी लेखनाचा त्यांना सराव नव्हता. पण मराठीतून सफाईने भारदस्त लेखन करता यावे, म्हणून त्यांनी खूप कष्ट घेतले. संतांच्या व जुन्या नव्या लेखकांच्या वाङ्मयाचे परिशीलन केले. वाचकवर्ग लक्षात घेऊऩ आपले लेखन सोपे ठेवण्याचा त्यांनी जाणीवपूबर्वक प्रयत्न केला. महार आणि त्यांचे वतन, पर्वती सत्याग्रह, अस्पृश्योन्नतीचे विविध प्रश्न, नेहरू कमिटीची योजना व हिंदुस्तानचे भवितव्य, गिरण्यांचे मालक व कामगार, खोती ऊर्फ शेतकरी वर्गाची गुलामगिरी अशा विविध विषयांवर त्यांनी मर्मग्राही लेखन केले. आजकाल कोणालाही न दुखवता, गुळमुळीत व बुळबुळीत लेखन करणारे अनेक आहेत. बाबासाहेब अन्यायाविरुद्ध झुंज देण्यासाठी उभे राहत आणि घणाघाती प्रहार करत. तर्कशुद्ध लेखन करत. त्याकाळी गाजलेल्या खान-मालिनी विवाहाच्या निमित्ताने त्यावेळच्या वृत्तपत्रांबाबत डॉ. बाबासाहेब लिहितात, ‘महाराष्ट्रातील बरीचशी वर्तमानपत्रे म्हणजे अज्ञ लोकांना मूर्ख बनवण्याचे कारखाने आहेत.’ लोकांना कोणत्या मुद्द्यावर मूर्ख बनवून आपल्या पत्राचा खप वाढवता येईल याचे या धूर्त पत्रकारांनी एक शास्त्रच बनवले आहे.’ त्यांचे हे म्हणणे सध्याच्या काळातही तंतोतंत लागू पडते. संपादक म्हणून गाजलेली कारकीर्द ‘बहिष्कृत भारता’चे संपादक म्हणून बाबासाहेबांची कारकीर्द गाजली. नंतरच्या काळातील ‘समता’, ‘जनता’, ‘प्रबुद्ध भारत’ ही पत्रे बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली असली, तरी लौकिकार्थाने ते या पत्रांचे संपादक नव्हते. 4 सप्टेंबर 1927 रोजी दलितेतरांनी ‘समाज समता संघा’ची निर्मिती केली. संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेबांची सन्मानपूर्वक निवड करण्यात आली. बाबासाहेबांच्या चळवळीत सुरुवातीपासून दलितेतर लोक होते. ग. नी. सहस्रबुद्धे यांनी महाडच्या मनुस्मृती दहनाच्या कार्यक्रमात पुढाकार घेतला. कमलाकांत चित्रे, अनंत चित्रे व भा. र. कद्रेकर हे अखेरपर्यंत डॉ. बाबासाहेबांच्या सोबत राहिले. समता संघाचे दे. वि. नाईक यांचा ‘समता’पत्र सुरू करण्यात पुढाकार होता. ‘जनता’ पत्र सुरू करण्यातही नाईक व कद्रेकर यांचा वाटा होता. बाबासाहेबांनी लोकहितवादींची ‘शतपत्रे’ ‘बहिष्कृत भारता’त छापली आणि ती पुस्तकरूपात छापण्यासाठी श्री. रा. टिकेकरांना प्रोत्साहन दिले. कर्मवीर वि. रा. शिंदे यांचे लेख त्यांनी आपल्या पत्रात आवर्जून प्रसिद्ध केले. हिंदू महासभा का ठकांची बैठक, अस्पृश्यांचा प्रश्न घरचा का राष्ट्राचा?, लबाड कोण? काँग्रेस की मजुरांचे पुढारी?, राष्ट्रप्रेम का सवतीची पोटदुखी, इंग्रजांची धोकेबाजी असे बाबासाहेबांचे अनेक अग्रलेख गाजले. हिंदू महासभेवरच्या अग्रलेखात ते म्हणतात, ‘जातिभेद कायम ठेवून हिंदूंच्या संघटना करू म्हणणे म्हणजे आवळ्याची मोट बांधून त्यांचे एकीकरण केल्याचे समाधान मानण्याइतकेच मूर्खपणाचे आहे. येवल्याच्या सभेत स्पष्टपणे जाहीर करण्यात आले होते की हिंदू समाजाची घटना असमानतेच्या पायावर उभारली असल्याकारणाने अस्पृश्यांना त्या धर्मात राहणे शक्य नाही. या असमानतेचे मूळ जातिभेदात आहे आणि त्यावर कुठार घालण्याशिवाय अन्य मार्ग नाही.’ भाषावार प्रांतरचना करताना, ते राज्य आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे आवश्यक असल्याचे बाबासाहेबांचे रास्त मत होते. ‘दंगा झाला, दंगा झाला, काही उपाय नाही त्याला’ या अग्रलेखात बाबासाहेबांनी मुंबईत 1941 साली झालेल्या दंग्याबद्दल लिहिले आहे. हा दंगा धार्मिक नव्हे, तर राजकीय कसा होता, हे बाबासाहेबांनी नीट समजावून सांगितले. ‘ज्या ठिकाणी हिंदूमुसलमानांची तेढ आहे, त्या ठिकाणी हिंदू महासभेचे ढग दिसतात’, असे रोखठोक प्रतिपादन त्यात त्यांनी केले आहे. ‘मुक्ती कोन पथे?’ मध्ये ते म्हणतात, ‘हिंदू तुम्हाला दोन्ही तऱ्हेने मारक झाला आहे. या धर्माने तुमचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेऊन तुम्हाला गुलाम केले आहे व याच धर्माने तुम्हाला व्यवहारात गुलामगिरीच्या दशेत आणून टाकले आहे. तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असेल, तर तुम्हाला धर्मांतरच केले पाहिजे.’ प्रसारमाध्यमांचे आज बाजारीकरण झाले असून, मोदी सरकारने तर अनेक माध्यमांना दत्तकच घेतले आहे. माध्यमांसाठी आर्थिक भांडवल लागतेच. पण बौद्धिक भांडवलही आवश्यक असते. व्यवसाय करतानाच, माध्यमांनी आपले मूलभूत कर्तव्य पाळलेच पहिजे. हल्ली माध्यमे या रस्त्यापासून भरकटत असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला पत्रकारितेतील योग्य मार्ग कोणता, याची वाट दाखवतात. त्यांना मानाचा मुजरा. Hemant.desai001@gmail.com (या लेखातील व्यक्त झालेले विचार लेखकाचे वैयक्तिक मत असून  न्यूज18 लोकमत त्याच्याशी सहमत असेलच असे नाही.)
First published:

पुढील बातम्या