'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे!'

हा दुष्काळ तुम्हाला इतकाच बोचत असेल तर त्यावरही एक सोपा उपाय आहे आपल्याकडं. उत्तर प्रदेशचे एक सदगृहस्थ येऊन तुमच्या या दुष्काळाला चांगलं पाणीदार नाव देतील.

News18 Lokmat | Updated On: Nov 13, 2018 02:25 PM IST

'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे!'

अक्षय शितोळे

दिवाळीत तीन दिवसांची सुट्टी घेऊन गावाकडं गेलो होतो. नोकरीसाठी आता मुंबईत राहत असल्यामुळं इथं पेपरातून आणि टीव्हीवरच्या चॅनलमधून दररोज नवनवीन बातम्या कानावर येतात. सध्या तर देशभरात राम मंदिर ह्या एकाच मुद्द्यावरून रान पेटलं आहे. म्हणून मलाही वाटलं हाच लोकांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे. गावाकडंही लोक याच मुद्द्यावर चर्चा करत असतील. पण गावाकडं गेल्यावर लोकांनी मोठा अपेक्षाभंग केला राव!

लखलखत्या मायानगरी मुंबईतून गावात पोहोचलो तेव्हा राम मंदिराचं लोकांना काही पडलंच नव्हतं. गावकऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी गावाच्या बारवंवर (सार्वजनिक पाणवठा) भली मोठी रांग लावली होती. पारावर बसलेली म्हातारी माणसं येणारे 8-9 महिने पाण्याशिवाय कसे काढणार असं म्हणत निर्जिव चेहऱ्याने रस्त्याच्या गाड्यांकडे बघत बसली होती. हिरव्यागार पिकांनी बहरणारे रान नजर जाईल तिथपर्यंत मोकळं दिसत होतं. जणू ‘स्वच्छ भारत मिशन’ राबवून कोणीतरी या शेतांवर झाडू फिरवलाय. एकदम स्वच्छ! बांधावरची झाडं निर्जिवपणे सगळं पाहात होती. चरण्यासाठी माळावर हुंदडणारी गुरं आत्ता मात्र गोठ्यातच शांतपणे उभी राहिली होती. काही जणांनी आपली जनावरं दूरच्या नातेवाईकांकडं पाठवली होती. पावसावर आशा ठेवून ज्यांनी मातीत बियानं टाकलं होतं, ते तसंच मातीखाली राहिलं. ज्यांच्या शेतात काहीतरी उगवलं तेही पाण्याअभावी आता करपलं आहे.


हे सगळं वातावरण पाहिलं आणि वाटलं लोकांनी घोर निराशाच केली ना! कारण मुंबईत असताना वेगवेगळ्या राजकीय पक्षांची भूमिका बघून वाटलेलं राम मंदिर हाच सर्वांच्या जगण्याचा प्रश्न असेल. जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा अजेंडा येणाऱ्या निवडणुकीत राम मंदिर हाच असणार आहे...ज्यांना आपण सत्तेत आहोत की विरोधात आहोत, ही भूमिका घेता आलेली नाही तेही लोक आता राम मंदिरावर ठाम भूमिका घेणार आहेत...काही दिवसातच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत...ज्यांना लोकांनी खरोखरंच विरोधात बसलवलेलं आहे ते स्वत:ला अधिकार नसलेले सत्ताधीश समजत आहेत... त्यामुळे राम मंदिराला विरोध करायचा की पाठिंबा द्यायचा? हेच त्यांना समजलेलं नाही.

Loading...


एकूणच काय? सर्व पक्षांनी राम मंदिरासाठी स्वत:ला वाहून घेतलेलं आहे. पण खरंच सांगतो, मोठी निराशा केली राव या गावाकडच्या माणसांनी! तो आपला राम मंदिराचा मुद्दा किती छान होता की नाही? पिण्याच्या पाण्याची अन् जनावरांच्या चाऱ्याची चिंता असली म्हणून काय झालं? आभासी राम मंदिरात रमायला या लोकांना कुणी नकार दिला होता? आपले राजकीय पक्ष बघा. त्यांनाही दुष्काळाची परिस्थिती माहिती आहेच की. पण बिचारे किती प्रयत्नपूर्वक दुष्काळाला ‘राम राम’ करत आहेत. आणि हो, हा दुष्काळ तुम्हाला इतकाच बोचत असेल तर त्यावरही एक सोपा उपाय आहे आपल्याकडं. उत्तर प्रदेशचे एक सदगृहस्थ येऊन तुमच्या या दुष्काळाला चांगलं पाणीदार नाव देतील. मग कसला दुष्काळ अन् कसलं काय? सगळीकडे रामराज्यच!

म्हणून सांगतो, चला अयोध्येकडे कूच करूयात. वीट नाहीच मिळाली तरी भट्टीत करपलेलं आयुष्य घेऊन मंदिराच्या उभारणीसाठी निघुयात. राम मंदिर बांधल्यानंतर तुमचे प्रश्न, समस्या कुठच्या कुठे पळून जातील. पाऊस न पडताही शेती बहरून जाईल, तुमची मुलंही दर्जेदार शिक्षण घेतील. आरोग्य आणि रस्त्यासारखे क्षुल्लक प्रश्न तर राहणारच नाहीत. सगळं कसं छान छान होईल.

खोटं वाटतंय हे सगळं? अहो, हवं तर आपल्या राजकीय पक्षांना विचारा. उद्याही त्यांच्यासाठी राम मंदिर हाच जीवन-मरणाचा प्रश्न असेल. विश्वास बसत नाही? उद्याचा एखादा पेपर उघडून पाहा, कोणीतरी पुन्हा एकदा राम मंदिरासाठी हुंकार भरला असलेच!

चला, दुष्काळ विसरा आता. आणि मंदिर मंदिर बोला. बोला जय श्री राम!


(लेखातले विचार हे लेखकाचं व्यक्तिगत मत आहे. त्या विचारांशी 'न्यूज18 लोकमत' सहमत असेलच असं नाही.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2018 10:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...