मराठी बातम्या /बातम्या /ब्लॉग स्पेस /

आषाढी वारी म्हणजे जन्माची शिदोरी...

आषाढी वारी म्हणजे जन्माची शिदोरी...

माऊली...तुकोबांचं बोट धरून आपण विठुरायाच्या भेटीसाठी जातोय हा भाव प्रत्येक वारकऱ्यांचा असतो...त्यामुळं नाचत गात, खेळ खेळत, फेर धरत उत्साहात प्रतेक गोष्ट केली जाते त्यामुळं वारकरी कधीच थकत नाही आणि बसतही नाही...चालुन थकल्यानंतर पालखी जेव्हा विसाव्याला थांबले तेव्हा तर वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांमध्ये आणखी बळ येतं...टाळांचा स्वर उंचावतो...पावलं उंच उड्या घेतात...महिलांची फुगडी सुरू होते...पाऊलीचा खेळ रंगतो...मनोरे उभे राहतात...

माऊली...तुकोबांचं बोट धरून आपण विठुरायाच्या भेटीसाठी जातोय हा भाव प्रत्येक वारकऱ्यांचा असतो...त्यामुळं नाचत गात, खेळ खेळत, फेर धरत उत्साहात प्रतेक गोष्ट केली जाते त्यामुळं वारकरी कधीच थकत नाही आणि बसतही नाही...चालुन थकल्यानंतर पालखी जेव्हा विसाव्याला थांबले तेव्हा तर वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांमध्ये आणखी बळ येतं...टाळांचा स्वर उंचावतो...पावलं उंच उड्या घेतात...महिलांची फुगडी सुरू होते...पाऊलीचा खेळ रंगतो...मनोरे उभे राहतात...

माऊली...तुकोबांचं बोट धरून आपण विठुरायाच्या भेटीसाठी जातोय हा भाव प्रत्येक वारकऱ्यांचा असतो...त्यामुळं नाचत गात, खेळ खेळत, फेर धरत उत्साहात प्रतेक गोष्ट केली जाते त्यामुळं वारकरी कधीच थकत नाही आणि बसतही नाही...चालुन थकल्यानंतर पालखी जेव्हा विसाव्याला थांबले तेव्हा तर वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांमध्ये आणखी बळ येतं...टाळांचा स्वर उंचावतो...पावलं उंच उड्या घेतात...महिलांची फुगडी सुरू होते...पाऊलीचा खेळ रंगतो...मनोरे उभे राहतात...

पुढे वाचा ...

अजय कौटिकवार, मुंबई

दुपारी तीन नंतर वाखरीत माऊलींच्या गोल रिंगणाला सुरवात झाली...मैदान वारकऱ्यांनी खच्चून भरलं होतं...सूर्य आग ओकत होता, पण त्याची फिकीर कुणालाच नव्हती...रिंगण लागलं होतं...मधल्या वर्तुळात दिंड्या येत होत्या...पताकाधारी येत होते...ज्या बाहेरच्या मोठ्या वर्तुळात अश्व धावणार होता...तिथं रांगोळीच्या पायघड्या घालण्याचं काम सुरू होतं....टाळ मृदुंगांचा आवाज टिपेला पोहोचला होता...सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या प्रवेशव्दारावर...प्रतिक्षा होती माऊलींच्या पालखीची...वारकऱ्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता...माझ्या शेजारी एक माऊली बसल्या होत्या...मराठवाड्यातून वारीत आल्या होत्या...पंधरा दिवसांच्या प्रवासानं रापलेला चेहेरा...धुळीनं माखलेले केसं...डोळ्यात बोलके भाव...प्रत्येक गोष्ट डोळ्यात साठवून ठेवत होत्या...मी त्या माऊलींच्या चेहेऱ्यावरचा आनंद टीपत होतो...माऊलींची पालखी आली...माऊली....माऊली...चा घोष सुरू झाला आणि या माऊलींचा पदर डोळ्याला लागला...तीचे बोलके डोळे पाणावले...ह्रदय भरून आलं होतं...मी त्या माऊलीकडे बघत होतो...तीच्या चेहेऱ्यावरचा आनंद आणि समाधान खरच सांगतो शब्दात नाही व्यक्त करता येत...ती म्हणाली...असा सुख सोहळा स्वर्गी नाही...

वारीच्या वीस दिवसांच्या प्रवासात मी हे वाक्य अनेकदा अनेकांच्या तोंडून ऐकलं...वाखरच्या रिंगणात त्या माऊलींच्या डोळ्यातल्या पाण्यानं आणि चेहेऱ्यावरच्या आनंदानं एका क्षणात मला त्याचा अर्थ नुसता कळलाच नाही तर अनुभवताही आला. त्याच आनंदाचा, प्रेमाचा उत्सव म्हणजे वारी...चैत्यन्याचा महासोहळा म्हणजे वारी. आषाढी वारीच्या प्रवासात वाखरीचं रिंगण सगळ्यात मोठं. सर्व नद्यांचे प्रवाह एकत्र येवून जेव्हा सागराला मिळतात तेव्हा विशाल रूप प्राप्त होतं, तसं वाखरीत राज्यातल्या सर्व दिंड्या एकत्र येतात आणि वैष्णवांचा महासागर तयार होतो आणि त्या सागराला येतं विठ्ठल प्रेमाचं भरतं.....

वारी म्हणजे आनंदाचा सोहळा

वारी म्हणजे वैष्णव भक्तांचा महामेळा

वारी म्हणजे विठ्ठल भक्तीचा लळा

वारीच्या प्रवासात मला सर्वात जास्त भावलं ते वारीतलं प्रेम. वारकऱ्यांचं बा विठ्ठलावर, ज्ञानोबा, तुकोबांवर अफाट, उत्कट आणि असीम निरपेक्ष प्रेम. वारकऱ्यांना हे संत आपले सांगाती वाटतात आणि संतांना आणि वारकऱ्यांना विठ्ठल म्हणजे मायबाप, सखा, सहोदर. ही नात्याचं विण गेल्या साडेतासशे वर्षांपासून एवढी घट्ट आले की त्याचा एक धागाही कधी सैल झाला नाही. वारकऱ्यांचं हे नातं किती घट्ट आहे याचं एक उदाहरण मी वारीत एकलं आणि भारवूनच गेलो. काही वर्षांपूर्वी विठ्ठल मंदिरातल्या दानपेटीतले पैसे मोजताना एक चिठ्ठी सापडली...ती चिठ्ठी गावातल्या एका महिलेनं विठ्ठलाला लिहिली होती...त्यात तक्रार होती सासूची...विठ्ठला माझी सासु खूप छळते रे...खूप त्रास देते...मला काहीही नको फक्त या त्रासातून सोडव...आपल्या मोडक्या तोडक्या शब्दात तीनं विठ्ठलाकडे आपलं मन मोकळं केलं... विठ्ठलाचं आणि भक्ताचं हे नातं इतकं उत्कट आहे. ज्ञानोबा, तुकोबा, नाथ महाराज, जनाबाई, मुक्ताबाई, नामदेवराया यांच्या रचना वाचत असताना विठ्ठलाबद्दलच त्यांचं उत्कट प्रेम मला कायम आकर्षीत करत आलं...नेहमी वाटायचं काय असेल हे नातं...का वाटत असावं विठ्ठलाबद्दल एवढं अफाट प्रेम आणि आकर्षण त्याचं उत्तर या वारीच्या प्रवासात मिळालं. तुकाराम महाराजांचा हा अभंग याच उत्कट प्रेमाचं दर्शन घडवतो..

तू माउलीहून मयाळ  I चंद्राहुनि शीतळ I

पाणियाहूनि पातळ I  कल्लोळ प्रेमाचा II

कन्या सासुऱ्यासि जाये I मागे परतोनी पाहे I

तैसे जाले माझ्या जिवा केव्हा भेटसी केशवा II

चुकलिया माये I बाळ हुरू हुरू पाहे I

जीवना वेगळी मासोळी I तैसा तुका तळमळी II

वारीत वारकऱ्यांचा दिवस सुरू होतो तो प्रेमानं आणि संपतो तोही प्रेमानच. हेच प्रेम सर्व प्रवासात पाझरत असतं.

यवतचं भाकरी पिठलं

याच प्रेमानं सर्व जाती पातीची बंधन तोडली तशीच अनेकांना जवळही आणलं. याचं दर्शन घडलं ते यवतमध्ये. तुकोबारायांची पालखी यवतमध्ये होती...रमजानचा महिना होता. यवतमध्ये भाकरी आणि पिठल्याचा प्रसाद देण्याची परंपरा आहे. पालखीचा मुक्काम ज्या मंदिरात असतो त्या भैरवनाथ मंदिरात आम्ही पोहोचलो. काही मुस्लिम बांधवही तिथेच होते...आजचा रोजा ते मंदिरातून आलेल्या पिठलं भाकरीने सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि सर्व मुस्लिम बांधव आज शाकाहारी पदार्थच खाणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. नंतर आम्ही गेलो तिथल्या मशिदीमध्ये....मशिदिच्या समोरच भट्टी लागली होती...पिठलं आणि भात तयार होत होता...अडीचशेच्यावर भाकरी तयार झाल्या होत्या हे सर्व भैरवनाथ मंदिरात वारकऱ्यांसाठी पाठवलं जाणार होतं...मशिदितल्या भाकरी मंदिरात...मंदिरातलं पिठलं मशिदीत...प्रत्येकाला वारकरी आणि पालखीबद्दल तेच प्रेम आणि जिव्हाळा. रमजान आणि पालखी एकत्र आल्याचा आनंदही त्यांच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होता. जे यवतमध्ये दिसलं तेच फलटणमध्येही दिसलं माऊलींची पालखी ज्या दिवशी फलटणमध्ये होती त्याचं दिवशी ईदही होती. राजवाड्याजवळच्या दर्ग्यासमोर मुस्लिम बांधव केळीचं वाटप करत होते. वारकऱ्यांना बोलावून आग्रहानं त्यांना केळी दिली जात होती. वारकरीही त्याच भक्तीभावानं तो प्रसाद ग्रहण करत होते. ही कमाल होती...तुकोबांची...ही कमाल होती ज्ञानोबांची...भेदा भेद नाही आम्हा असं सांगत या संतांनी समाजाला एक केलं. त्याचं विराट दर्शन त्या दिवशी वारीत झालं.

 

अभंग, ओव्या आणि गावातल्या बहिणाबाई

वारीतली महिलांची संख्याही लक्षणीय...त्यातल्या नव्वद टक्के महिला या कष्टकरी...लौकीकार्थानं शिक्षण नावापुरतचं पण हरिपाठ, अभंग, ओव्या, भारूडं त्यांना मुखोद्गद. काहींना तर तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरीही पाठ होती. माऊलींची पालखी दिवेघाटात येण्याच्या दिवशी सकाळी सहा वाजताच आम्ही घाटात बस्तान मांडलं. वारकऱ्यांचा घाटातून वरपर्यंत येण्याचा प्रवाह सुरूच होता...काही महिला अभंग म्हणत होत्या...त्यांच्याजवळ जावून बसलो...त्यातल्या एका आजीच्या परफॉर्मन्सनं तर थक्कच झालो. तिचा आवाज, गाण्याची ढब, जोडीला अभिनय अचाट होता...गवळण, भारूडं, अभंग सर्व आजीच्या जीभेवर...बारामतीजवळच्या एका गावातून ती वारीला आली होती...हे सगळं कुठं शिकलीस?हा माझा प्रश्न संपायच्या आधीचं तीचं उत्तर होतं...माऊलीनं शिकवलंय वारीत. वारीची ओढ लागलीय पण घरी नवरा, सासू, सुन, नंणंद काही जावू देत नाही, तेव्हा घरातली माऊली बंडाचा झेंडा उभारते हे तीनं भारूडातून जी उदाहरणं देवून साभिनय सांगितलं त्याला खरचं तोड नव्हती...चेहेऱ्यांवरच्या सुरकुत्यांवरून आजीचा अनुभव लक्षात आला...डोक्यावर बोचकं घेऊन ती निघाली तेव्हा तीच्या पायाला हात लावला, मी वाकताच तीही वाकली, आजी नको, अगं मी तुझा नातू हाय...या माझ्या प्रश्नावर तीचं उत्तर होतं...वारीत सगळेच माऊली असतात, कुणी मोठा नाय, की कुणी छोटा नाय म्हणूनच दोघानही एकमेकाच्या पाया लागायचं असतं. त्या माऊलीनं शिकवलेला धडा पुढं पूर्ण वारीत मी कायम लक्षात ठेवला आणि आचरणातही आणला.

वारीतली शिस्त

वारीतल्या प्रवासात कायम लक्षात राहणारी दुसरी गोष्ट म्हणजे शिस्त. देहू, आळंदीच्या प्रस्थान सोहळ्यापासून ते पंढरपूरच्या नगरप्रदक्षिणेपर्यंतच्या वीस दिवसांच्या प्रवासात वारकऱ्यांची शिस्त डोळ्यात भरण्यासारखी होती. या प्रवासात साध्या पोलिस कर्मचाऱ्यांपासून ते सर्वात वरच्या स्तरावर काम करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांशी बोललो...त्या सगळ्यांचं एकमतं होतं वारीच्या काळात कधीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही. कुठेही चेंगराचेंगरी नाही, भांडणं नाहीत की अव्यवस्था नाही...सगळ्या गोष्टी नियोजित आणि आखीव रेखिव. याचं सर्व श्रेय जातं वारकऱ्यांना.  गळ्यात जेव्हा तो तुळशीची माळ घलतो तेव्हाच तो शिस्तीच्या बंधणात स्वत:ला बांधून घेतो...माऊलींच्या पालखीत अंदाजे साडे चार ते पाच लाख आणि तुकोबांच्या पालखीत साडेतीन ते चार लाख वारकरी चालत असतात म्हणजे फक्त या दोनच पालख्यांमध्ये आठ ते नऊ लाख भाविक रस्त्यावर असतात...अशा शंभर पेक्षा जास्त दिंड्या सर्व राज्यातून पंढरीकडे निघालेल्या असतात...हा सर्वांची संख्या गृहीत धरली तर तो आकडा होतो अंदाजे १२ ते १५ लाखांच्या आसपास...एवढे लाखो लोक रस्त्यावर शिस्तीत चालतात हे वारकरी संप्रदायाच्या शिस्तीचं यश आहे.

हे झालं वारकऱ्यांचं...प्रत्येक पालखीचीही एक शिस्त आहे. रथाच्या मागे पुढे किती दिंड्या असतात...त्यांना क्रमांक दिलेला असतो. त्यांच्या मुक्कामाची जागा ठरलेली असते...पताकाधारी कुठे असावेत...तुळशीधारी महिला कुठे असाव्यात...विणाधारी अशा प्रत्येकाची जागा नेमुण दिली जाते...प्रत्येक दिंडीनं काय म्हणायचं हेही त्यांना सांगितलं जातं...कुणाला अभंग, कुणाला हरिपाठ, कुणाला नामघोष तर कुणाला ठरवून दिलेल्या ओव्या...त्यामुळं प्रत्येक दिंडीच वेगळा गजर असतो...पुनरावृत्ती होत नाही आणि कंटाळाही येत नाही. कॉरपोरेट ट्रेनिंग मध्ये जसं ट्रेनिंग काळातल्या प्रत्येक दिवसाचं त्यातल्या प्रत्येक मिनीटांचं नियोजन केलं जातं तस वारीच्या प्रत्येक दिवसाचं नियोजन केलंलं आहे. रिंगण, धावा, नदीचं स्नान, भजन, भारूड, गौळण, आरती, टाळ, मृदुंग, पखवाज, झेंडा, तुळशी, वीणा अशा सगळ्या प्रतिकांचा वापर वारीत अतिशय कौशल्यानं केला गेलाय. त्यामुळं उत्साह तर टीकून राहतोच त्याचबरोबर नवी ऊर्जाही मिळते.

परंपरा आणि मान

वारीत परंपरा आणि मान यांना खूप महत्व आहे..म्हणजे इथली प्रत्येक गोष्ट शेकडो वर्षांपासून चालत आलेली...माणसं बदलली पण त्यांच्या क्रमात बदल झाला नाही....चोपदार, भालदार, अश्वचालक, माऊलींचा नैवैद्य, तुतारी, कर्णा वाजवणारे, अब्दागिरी, नगारा, बैलजोडी, खांदेकरी अशा प्रत्येक गोष्टी इथं परंपरेनं चालत आल्या आहेत...पाच दहा पिढ्यांपासून या गोष्टी त्या त्या घराण्यातली माणसं इमाने इतबारे करतात त्यामुळं त्यांच्यात सातत्य अजुनही टिकून आहे. पालखीची रचनाही ठरलेली आहे...सुरवातीला असतो नगारखाणा, नंतर माऊलींचा अश्व, नंतर मानाचा अश्व रथाच्या पुढं मानाच्या दिंड्या नंतर रथ आणि मागे मानाच्या दिंड्या. दररोज १८ ते २० किमीचा प्रवास...सुर्यास्तानंतर मुक्कामाच्या ठिकाणी असतो पालखी तळ तिथे समाज आरती होते...तो सोहळाही दिमाखदार असतो. पालखी तळावर मध्यभागी माऊलींचा तंबू त्याच्या दोनही बाजूंना मानांच्या दिंड्यांचे तंबू...सर्व दिंड्या गोलाकार उभ्या राहतात...टाळ मृदुगांचा गजर टिपेला पोहोचतो माऊलींच्या पालखी नाचत, नाचत मध्यभागी ठेवली जाते आणि चोपदार आपला चोप उंचावतात आणि हो...अशी ललकारी देतात त्यावेळी सर्वत्र शांतता पसरते एका क्षणात हजारोंचा जमाव शांत होतो...हा वारीतच्या शिस्त आणि व्यवस्थापनाचा माझ्या दृष्टीनं सर्वोच्च क्षण होता...

 

वारी म्हणजे आनंद सोहळा

वारीत प्रत्येक गोष्ट केली जाते ती फक्त आणि फक्त आनंदानेच. प्रस्थान सोहळ्यापासून ते पंढरपूरच्या विसाव्यापर्यंत. माऊली...तुकोबांचं बोट धरून आपण विठुरायाच्या भेटीसाठी जातोय हा भाव प्रत्येक वारकऱ्यांचा असतो...त्यामुळं नाचत गात, खेळ खेळत, फेर धरत उत्साहात प्रतेक गोष्ट केली जाते त्यामुळं वारकरी कधीच थकत नाही आणि बसतही नाही...चालुन थकल्यानंतर पालखी जेव्हा विसाव्याला थांबले तेव्हा तर वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांमध्ये आणखी बळ येतं...टाळांचा स्वर उंचावतो...पावलं उंच उड्या घेतात...महिलांची फुगडी सुरू होते...पाऊलीचा खेळ रंगतो...मनोरे उभे राहतात....आणि काही क्षणांची विश्रांती घेतल्यानंतर जनांचा हा प्रवाह पुढच्या वाटचालीला सुरवात करतो.

वारी म्हणजे लोकपीठ

वारीत अध्यात्म आहे, मॅनेजमेंट आहे, लोककला, संगित, संस्कृती, मानवी भाव भावनांचा संगम असं सर्वच बघायला मिळतं. त्यामुळं वारीला शिक्षणाचं लोकपीठ का म्हटलं जातं हे वारीत आल्यानंतरच कळतं. वारीतला तरूणांचा सहभागी लक्षणीय आहे...कुणी फेसबुवर वारीचं अपडेट देतो तर कुणी व्हॉसअपवर...हौशी फोटोग्राफर्सचा एक ग्रुप वारीचे क्षणचित्र जगापुढं मांडण्याचा प्रयत्न करतो...वारीत सहभागी होणारी ८० टक्के जनता ही शेतकरी, कष्टकरी आहे...हातावर ज्यांचं पोट अवलंबून आहे अशी आहे...त्यांना प्रत्येक गोष्टीत दिसतो तो फक्त सावळा पांडुरंग....त्यांची कुठलीही तक्रार नसते, काही मागायचं नसतं...की काही घ्यायचं नसतं, कुठे फिरायला जावं जग पाहावं ऐवढी आर्थिक ताकदही त्यांच्यात नसते...त्यामुळं आषाढातली वारी हा त्यांच्या ऊर्चेचा स्त्रोत असतो...अकरा महिने अंग मोडून काम करायचं आणि महिनाभर वारीत ऊर्जा भरून घ्यायची आणि वर्षभर ती पुरवायची पुढची वारी येईपर्यंत हे वारकरी नेटानं करतो... नुसतं वाचून जसं वेदांताचा अनुभव येत नाही, तसं कितीही बोललं आणि कितीही लिहिलं तरी आणि वाचलं तरी वारी कळणार नाही...त्यासाठी वारीतच गेलं पाहिजे...आम्हीही वारी कव्हर करायल गेलो आणि वारकरी होऊन आलो... त्यातुन मिळाली जन्माची शिदोरी कधीही न संपणारी.

जय हरी....!!!

First published:

Tags: पंढरपूर, वारी