ती 'अस्वस्थ' गर्दी !

  • Share this:

amit modak- अमित मोडक , सीनिअर प्रोड्युसर, आयबीएन लोकमत 

एक फाशी...तीही दहशतवाद्याला...शेकडो जीव घेणार्‍या नराधमाला. पण त्यावरही एवढा गदारोळ होईल. इतकी चर्चा होईल अशी कल्पनाही कधी केली नव्हती. पण त्याहूनही अस्वस्थ करणारी होती 'ती' गर्दी. याकूब मेमनच्या अंत्ययात्रेसाठी झालेली गर्दी, का जमली होती ती 'गर्दी'? कल्याण, मुंब्रा, वांद्रे... मुंबईच्या अनेक भागातून लोक याकूबच्या अंत्ययात्रेसाठी का आले? हे सगळे विचार डोक्यात घोळत असतानाच मोबाईलची रिंगटोन वाजली... एका मित्राचा फोन होता. हॅलो म्हणायच्या आधी त्यानं भळाभळा बोलायला सुरुवात केली. बोल आता... सांग मला याकूब मेमन महात्मा होता का? त्याच्या अंत्यविधीला इतकी गर्दी? ही गर्दी म्हणजे भारतीय लोकशाहीचा अपमान आहे. मी काही बोलण्याचा प्रयत्न करतच होतो, की तो परत बोलला, थांब आज माझं ऐक, ज्या न्यायाधीशांनी निर्णय दिला, ज्या पोलिसांनी जीवाचं रान करून तपास केला, ज्या वकिलांनी जीव धोक्यात घालून खटला लढवला. ही गर्दी म्हणजे त्या सगळ्यांचा अपमान आहे. त्याच्या आवाजात संताप होता. ही गर्दी मुंबई बॉम्बस्फोटात जीव गमावलेल्या प्रत्येक जीवाचा अपमान आहे. त्यांच्या नातेवाईकांचा अपमान आहे. हा अपमान भारतीय न्यायव्यवस्थेचा आहे. मी फक्त ऐकत होतो. काय बोलावं सुचत नव्हतं आणि तो बोलायचा थांबत नव्हता. मी बोललो होतो ना, मुस्लिमांना भारत मान्य नाही. ते स्वत:ला भारतीय समजत नाहीत. हा त्याचा पुरावा. मग माझाही पारा चढला, त्याला थांबवत बोललो, आता जरा अति होतंय. पण माझं वाक्य म्हणजे आगीत तेल ठरलं. तो आणखी संतापला, अति होतंय...अजूनही माझं बोलणं अति होतंय. मग ती गर्दी काय होती बोल?

एक दहशतवादी, बॉम्बस्फोट घडवतो, शेकडो जीव घेतो आणि त्याला दफन करण्यासाठी इतका मोठा जमाव येतो, हे अति नाही? अरे, तुमचे डोळे उघडणार की नाही? त्याचं बोलणं सुरू असताना मी मात्र स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. एक गोष्ट लक्षात आली. आता याला काहीही समजवण्यात अर्थ नव्हता. तो तावातावानं बोलत होता. मनात येईल ते तोंडात येईल ते... आणि मग अचानक म्हणाला, देशाची वाट लागल्यावर तुम्हाला जाग येईल एवढं बोलून फोन ठेवला. त्याचा राग शांत झाला की, मी काहीही बोलत नाही म्हणून वैतागून फोन ठेवला माहीत नाही.

yakub-mourners_647_073115113424 तो फोन मात्र मला अस्वस्थ करून गेला. त्याच्या प्रत्येक प्रश्नाचा विचार करू लागलो. खरंच का जमला असेल एवढा मोठा जमाव? मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचं मुस्लिमांना दु:ख नाही का? मुंबईवरचा हल्ला फक्त हिंदूंपुरता मर्यादित होता का? मुंबईला झालेली जखम ही मुस्लिमांची नव्हती. की मग ती गर्दी समर्थन करत होती मुंबई बॉम्बस्फोटाचं...

याकूबच्या अंत्यविधीला त्याच्या नातेवाईकांनी येणं हे समजू शकतो. पण मुंबईच्या प्रत्येक भागातून मुस्लिमांनी एवढी गर्दी का केली? जमावबंदी झुगारून गर्दी वाढत होती. गर्दी एवढी होती की दोनवेळा प्रार्थना घ्यावी लागली. याकूब मेमनसाठी एवढी प्रार्थना का? या प्रश्नाचं उत्तर काही केल्या सापडत नाहीय. पण त्या गर्दीनं खूप चुकीचा संदेश दिला एवढं नक्की. मुस्लीम समाजानं एक मोठी संधी गमावली असं सतत राहून-राहून वाटतंय. जर याकूबच्या अंत्यविधीसाठी गर्दी जमली नसती, तर एक कठोर संदेश गेला असता, की मुस्लीम समाज हा फक्त दहशतवादाचं समर्थन करत नाही तर अशा कृत्यात सहभागी असणार्‍यांना बहिष्कृत करतो. दहशतवादाला मुस्लीम थारा देत नाही. असं घडलं असतं तर एक वेगळं वातावरण तयार झालं असतं. हिंदू-मुस्लीम ऐक्याला एक नवं बळ मिळालं असतं. कॉस्मोपॉलिटिन म्हणवणार्‍या मुंबईनं देशाला वेगळा संदेश दिला असता. कट्टर हिंदुत्ववाद्यांची तोंडं बंद झाली असती, अतिरेकी मुस्लिमांना कठोर संदेश गेला असता. ओवेसीसारख्या नेत्यांना चपराक बसली असती. पण दुदैर्वानं तसं झालं नाही आणि एक मोठी संधी गमावली. (संधी मुस्लिमांनी गमावली, तरी त्याचे परिणाम सगळ्यांवर होणार.)

31yakub-funeral1 'त्या' गर्दीमुळे पाकिस्तान आणि इतर भागात भारताविरुद्ध कट-कारस्थान करणार्‍या दहशतवादी शक्तींना नक्कीच बळ मिळालं असणार यात शंका नाही. आयसीससारख्या दहशतवादी संघटना, ज्यांच्या रडारवर भारत आहे, त्यांनाही बळ मिळालं असणार, कारण 'अस्वस्थ' मुस्लीम हेच या संघटनांचं बळ आहे आणि त्या गर्दीत प्रचंड अस्वस्थता होती. 'त्या' अस्वस्थ गर्दीतून नव्यानं याकूब, कसाब शोधण्याचा प्रयत्न होणार, या अस्वस्थतेचा वापर होणार (राजकीय आणि अतिरेकी), भारतीय समाजातली  झाकलेली अस्वस्थता उघड्यावर आली.  'त्या' गर्दीतून जसं दहशतवादी संघटनांना बळ मिळेलं तसंच कट्टर हिंदुत्ववाद्यांनाही. आता 'ती' गर्दी दाखवून ते परत भीती दाखवू शकतात. 'त्या' गर्दीवरून पुन्हा अस्वस्थ करणारे प्रश्न विचारू शकतात. माथी भडकवू शकतात. 'ती' गर्दी विश्वासाला धक्का देणारी होती? की मग पुन्हा अविश्वासाची बीज रोवणारी? ती गर्दी 'ओवेसी'चा विजय होता? की मग हिंदू-मुस्लीम ऐक्य कमजोर होत असल्याचं द्योतक? 'ती' गर्दी अतिरेकी विचारधारेच्या प्रत्येक संघटनेच्या पथ्यावर पडणारी ठरली किंवा ठरू शकते. एक नक्की 'ती' गर्दी पराभव आहे भारतीय लोकशाही मूल्यांचा, 'ती' गर्दी पराभव आहे हिंदू-मुस्लीम ऐक्य जपणार्‍यांचा, पराभव आहे भारतीय समाजाला एकसंध ठेवण्याच्या प्रत्येक प्रयत्नाचा.

BL31YAKUB_MEMON_2492101f बाबरी मशिदीला उत्तर म्हणून मुंबई बॉम्बस्फोट, पडसाद म्हणून दंगल. हिंदू-मुस्लिमांमधल्या दुफळीची पार दरी झाली. राजकीय पक्ष...कट्टर धर्मांध संस्था यांनी ही दरी कधीही भरून निघणार नाही, याची काळजी घेतली आणि ती दरी भरून निघण्याऐवजी वाढत गेली. जखम भरण्याआधी नवे घाव देण्यात आले. नाहीतर मग जुन्या घावांच्या नव्या जखमा करण्यात आल्या. म्हणून तर हजारोंच्या गर्दीला याकूब जवळचा वाटला.

लालबागच्या गणपतीची आरती करणारे मुस्लीम, हाजीअलीच्या दर्ग्यावर हजारोंच्या संख्येनं जाणारे हिंदू... ईदच्या काळात मोहम्मद अली रोडवर मुस्लिमांच्या बरोबरीनं गर्दी करणारे हिंदू...पण यातली एकही गर्दी कधीही आपल्या नजरेत येत नाही. यातली कुठलीही गर्दी बघून विश्वास का निर्माण होत नाही की, धार्मिक एकात्मता अबाधित राहील? ही गर्दी का आश्वासक वाटत नाही? ...आणि याकूबच्या अंत्ययात्रेला आलेली गर्दी का अविश्वास बीज पेरून जाते. हे न समजण्यासारखं. एक मात्र नक्की आहे.

मुंबई अस्वस्थ आहे. 1993च्या बॉम्बस्फोटानंतर होती. तशीच आणि तितकीच अस्वस्थ... इतकी वर्षं दोन समाजांना एकत्र बांधण्याचे प्रयत्न एका झटक्यात शून्य करण्याची ताकद त्या 'गर्दीत' होती. ती 'गर्दी' अस्वस्थतेचं प्रतीक होती. ती 'गर्दी' सांगतेय सगळं काही आलबेल नाही. ती 'गर्दी' सांगतेय सामाजिक एकात्मता पुन्हा एकदा कमजोर होतेय. आता गरज आहे त्या 'अस्वस्थ'तेला वेळीच समजून घेण्याची... नाहीतर या धुमसत्या ठिणगीची उद्या आग होऊ शकते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published: