नवी दिल्ली, 19 मे : रॉयल एनफील्डने (Royal Enfield) भारत, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलीपिन्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या सात देशांमध्ये विक्री केलेल्या मीटिओर 350, क्लासिक 350 आणि बुलेट 350 या मॉडेलच्या 2 लाख 36 हजार 966 दुचाकी माघारी घेणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या गाड्यांच्या इग्निशन कॉइलमध्ये कदाचित बिघाड होऊ शकतो. कॉईलमध्ये बिघाड झाल्यास काही गाड्यांच्या इंजिनामध्ये बिघाड होऊ शकतो, गाडीची कार्यक्षमता कमी होण्याची किंवा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटही होण्याची शक्यता असते. कंपनीने म्हटले आहे की, गाड्यांच्या नियमित तपासणीदरम्यान हा दोष दिसून आला आहे. त्याचा बारकाईनं अभ्यास करून धोका लक्षात घेऊन गाड्या परत मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाईकच्या इग्निशन कॉइलमध्ये दोष? माघारी बोलावण्यात आलेल्या बाईक्सची निर्मिती कंपनीकडून डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021 च्या दरम्यान केली गेली आहे. यामध्ये मीटिओर 350 बाईकचा समावेश आहे, ज्यांची निर्मिती आणि विक्री डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021 च्या दरम्यान करण्यात आली होती. तर क्लासिक 350 आणि बुलेट 350 ज्या आहेत, त्यांची निर्मिती आणि विक्री जानेवारी ते एप्रिल 2021 च्या दरम्यान केली गेली होती. रॉयल एनफील्ड चे म्हणणे आहे की, सर्वच गाड्यांमध्ये हा दोष असणार नाही, त्यामुळे ग्राहकांनी चिंता करू नये. परंतु, कंपनीच्या सुरक्षिततेचे नियम आणि खबरदारीच्या उपाययोजना पाहता सर्व मॉडेल्सना रिकॉल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे वाचा - कोरोना लशीची कमाल! 10 वर्षांपासून असलेला आजार 5 दिवसांतच गायब झाल्याचा व्यक्तीचा दावा माघारी बोलावण्यात आलेल्या या मोटारसायकलींची तपासणी केली जाईल आणि ज्या भागामध्ये दोष आहे तो भाग कंपनीकडून कोणत्याही शुल्काशिवाय बदलला जाईल, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. रॉयल एनफील्डच्या अंदाजानुसार 10 टक्के पेक्षा कमीच गाड्यांचे भाग बदलण्याची गरज पडू शकते. मात्र, सर्व गाड्यांची तपासणी होईल. रॉयल एनफील्डची सर्व्हिस टीम आणि स्थानिक डिलर ज्या गाड्यांना माघारी बोलावण्यात आले आहे, त्यांच्या मालकापर्यंत पोहचतील. जर ग्राहकाला तसा दोष दिसून येत असेल त्यांनी डिलरशी संपर्क साधावा किंवा कंपनीच्या हॉटलाईनवर कॉल करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.