नवी दिल्ली, 12 जून: एका अहवालानुसार, भारतात 400 दशलक्षांहून अधिक लोक डिजिटल पद्धतीनं आर्थिक व्यवहार करतात. किराणा खरेदी-विक्री, फूड डिलिव्हरी आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांतील 80 टक्क्यांहून अधिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीनं होतात. या ऑनलाइन व्यवहारांमध्ये गुगल पेचा मोठा वाटा आहे. कोट्यवधी नागरिक गुगल पे अॅपचा वापर करतात. गुगल पेदेखील आपल्या ग्राहकांसाठी सेवा अधिकाधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतंच गुगल पेनं एक नवीन फीचर सादर केलं आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांना नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (एनपीसीआय) त्यांचा ‘आधार कार्ड नंबर’ वापरून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) सेट करता येईल. डिजिटल पेमेंट अॅप्लिकेशन असलेल्या गुगल पेनं बुधवारी हे फीचर लाँच केलं. हे फीचर वापरकर्त्यांना त्यांच्या डेबिट कार्डच्या तपशीलांची मागणी न करता यूपीआय पिन सेट करण्याची सुविधा देतं. सध्या, हे फीचर निवडक बँकांच्या खातेधारकांसाठी उपलब्ध आहे. येत्या काळात अधिकाधिक बँका हे फीचर लागू करण्याच्या प्रयत्नात आहेत. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
गुगलचे प्रॉडक्ट मॅनेजमेंट डायरेक्टर शरथ बुलुसू यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, “आर्थिक समावेशकतेला चालना देण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाला हे फीचर पूरक आहे. भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रामध्ये सखोल प्रवेश करण्याच्या आमच्या प्रयत्नांसाठी हे फीचर अधिक बळकट करेल. गेल्या काही वर्षांमध्ये, देशात डिजिटल पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यानं आम्हाला खूप आनंद झाला आहे. आमचं नवीन फीचर यूपीआय इकोसिस्टमला आणखी चालना देण्यास मदत करेल."
गुगलनं म्हटलं आहे की, गुगल पेचं नवीन फीचर वापरकर्त्यांचा आधार क्रमांक स्टोअर करणार नाही. हे क्रमांक एनपीसीआयसोबत शेअर करण्यासाठी केवळ एक सुविधा म्हणून ते काम करेल. वापरकर्त्यांची संख्या वाढवणं आणि डिजिटल पेमेंट अधिक सुलभ करणं, हे या आधार-बेस्ड यूपीआय फीचर सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे.
आधार-बेस्ड यूपीआय सेट करण्यापूर्वी, यूआयडीएआयकडे नोंद असलेला (आधारशी लिंक केलेला) आणि तुम्ही लिंक करू इच्छित असलेल्या बँक खात्याशी जोडलेला फोन नंबर एकच असल्याची खात्री करावी लागेल. तुमचं बँक खातं तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेलं आहे, याचीही खात्री करा.
कसा करावा यूपीआय सेट?
- तुमच्या स्मार्ट फोनमध्ये गुगल पे अॅप उघडा आणि त्याचा वापर सुरू करण्यासाठी ‘अॅड अकाउंट’वर टॅप करा.
- तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असलेली बँक निवडा आणि ‘नेक्ट’ या ऑप्शनवर टॅप करून पुढे जा.
- तुमचा मोबाईल नंबर आणि बँक खातं दोन्ही व्हेरिफाय करण्यासाठी ‘आधार’ मोड निवडा.
- तुमच्या बँक खात्याशी लिंक असलेल्या तुमच्या आधार क्रमांकातील पहिले सहा अंक एंटर करा.
- चार किंवा सहा अंकी यूपीआय पिन तयार करा जो तुमच्या व्यवहारांसाठी ऑथरायझेशन म्हणून काम करेल.
- पडताळणीसाठी बँक तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवेल.
- तुमचा इच्छित यूपीआय पिन सेट करा आणि तो एकदा कन्फर्म करा.
- तुमचं बँक खातं आता प्रदान केलेल्या आधार क्रमांकाशी यशस्वीरित्या जोडलं जाईल.