मुंबई, 13 जानेवारी : अमेरिकन कार कंपनी टेस्लाची (Tesla) अखेर भारतामध्ये एंट्री झाली आहे. दिग्गज उद्योगपती एलन मस्क (Elon Musk) यांनी यापूर्वी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. टेस्ला कंपनीनं 8 जानेवारी रोजी भारतामध्ये नोंदणी केली आहे.
कुठं असेल टेस्लाचं ऑफीस?
टेस्ला कंपनीनं त्यांचं ऑफिस सुरु करण्यासाठी बंगळुरुची (Bengaluru) निवड केली आहे. बंगळुरुमधील रिचमंड सर्कल जंक्शन भागात टेस्ला कंपनीचं ऑफिस असेल. या ठिकाणी कंपनीचा संशोधन आणि विकास (research and development) ऑफिस असेल, अशी माहिती आहे. कंपनीनं भारतामधील कामकाज पाहण्यासाठी तीन संचालकांची देखील नियुक्ती केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा (BS Yediyurappa ) यांनी कंपनीचं स्वागत केलं आहे.
टेस्लाची कारही लवकरच धावणार
भारतीय रस्त्यांवर यावर्षी टेस्ला कंपनीची इलेक्ट्रीक कार (Electric Car) धावणार आहे. भारतीय बाजारपेठेत पूर्ण तयारीसह येण्याची कंपनीची योजना आहे. त्यामुळे अगदी लगेच जानेवारी महिन्यात नव्या कारचं बुकींग सुरु होण्याची शक्यता नाही. नव्या कारच्या बुकींगसाठी मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.
टेस्ला कंपनीची Tesla Model 3 ही इलेक्ट्रीक कार भारतामध्ये सर्वात प्रथम दाखल होणार आहे. ही कंपनीची सर्वात जास्त वापरली जाणारी कार असून जागतिक बाजारपेठेत 2013 साली दाखल झाली आहे. त्याचबरोबर ही टेस्लाची सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे.
काय आहे वैशिष्ट्य?
Tesla Model 3 चे चार वेगवेगळे प्रकार असून 60 लाख ही सर्वात स्वस्त प्रकाराची किंमत असू शकते. या प्रकरातील बॅटरीची क्षमता ही 50 किलो मीटर प्रती तास ते 75 किलो मीटर प्रती तासापर्यंत आहे. त्याचबरोबर ही कार बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर 381 किलोमीटर ते 560 किलोमीटर्यंतचा प्रवास करु शकेल.
टेस्ला कंपनीचं यापूर्वीचं सर्व उत्पादन हे युरोपीन बाजारपेठ तसेच त्या देशातील रस्त्यांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठ आणि विशेषत: देशातील खराब रस्ते यांचा विचार करुन कंपनी यामध्ये काही बदल करते का हे पाहवं लागणार आहे. त्याचबरोबर टेस्ला कार ही अनेक स्वयंचलित फिचर्ससाठी (Autonomous Features) ओळखली जाते. भारतामधील रस्ते विचारात घेता या फिचर्समध्येही काही बदल होऊ शकतो.