मुंबई, 10 फेब्रुवारी : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि प्रदूषणाच्या वाढत्या समस्येमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत आहे. सध्या बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर आणि कारची विविध मॉडेल्स उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक कारमध्ये सामान्यपणे लिथियम बॅटरीचा वापर केला जातो. त्यामुळे साहजिकच लिथियमला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे; पण लिथियमचा साठा कमी आणि मागणी जास्त असं विषम चित्र आहे. 2040पर्यंत लिथियमचा वापर 50 पटींनी वाढेल असं साधारण चित्र आहे. त्यामुळे भविष्यात लिथियमचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही स्थिती लक्षात घेऊन संशोधकांनी वेगवेगळ्या पर्यायांवर संशोधन सुरू केलं आहे. भविष्यात लिथियमऐवजी मीठ आणि माती हे ऊर्जेचे पर्याय असू शकतात, असा दावा संशोधकांनी केला आहे. याचाच अर्थ भविष्यात मिठावरही कार चालू शकते. यावर जगभरातल्या अनेक कंपन्यांनी संशोधन सुरू केलं आहे. कारमध्ये पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी वापरण्याचं टेन्शन कायमचं दूर झालं तर, कार मिठावर चालू लागली तर, हे ऐकून कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल. इलेक्ट्रिक उपकरणांपासून इलेक्ट्रिक कारपर्यंत सर्व वस्तूंमध्ये लिथियम बॅटरीचा वापर होतो; पण लिथियमची मागणी आणि पुरवठा यांचं प्रमाण विषम आहे. लिथियम सेक्टरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि चीनचं वर्चस्व आहे. अर्जेंटिना, युक्रेन, चिली यांसारख्या देशांमध्ये लिथियमचे साठे आहेत. भारतात जम्मू-काश्मीरमध्ये नुकताच लिथियमचा साठा सापडला आहे. 2040पर्यंत लिथियमचा वापर 50 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज व्यक्त होतोय. या पार्श्वभूमीवर एवढं लिथियम आणायचं कुठून असा प्रश्न नजीकच्या काळात निर्माण होऊ शकतो. शास्त्रज्ञांच्या मते लिथियमऐवजी मीठ आणि माती हे ऊर्जेचे स्रोत ठरू शकतात. हे पर्याय विकसित होण्यासाठी काही कालावधी लागेल; पण हे घटक लिथियमच्या तुलनेत स्वस्त आणि कायमस्वरूपी पर्याय ठरू शकतात. या शक्यतेवर जगभरातल्या अनेक कंपन्यांनी संशोधन सुरू केलं आहे. बॅटरीमुळे इलेक्ट्रिक कार महाग आहेत. लिथियमच्या तुलनेत सोडियम शेकडो पटींनी स्वस्त आहे. कार किफायतशीर बनवण्यासाठी सोडियम आयन बॅटरीचा वापर केला जाऊ शकतो. इलेक्ट्रिक वाहनाच्या किमतीचा एक मोठा भाग म्हणजे बॅटरी होय. यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की जर बॅटरी 100 पटींनी स्वस्त झाली तर इलेक्ट्रिक वाहनं किती स्वस्त होऊ शकतात. ही गोष्ट लक्षात घेऊन संशोधकांनी सोडियम बॅटरीवर संशोधन सुरू केलं आहे. मिठाचं शास्त्रीय नाव सोडियम क्लोराइड आहे. यातलं क्लोरिन वेगळं काढलं तर सोडियम मिळतं. रसायनशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सरयुग गुप्ता यांनी सांगितलं की, `सोडियम आणि लिथियममधले गुणधर्म सारखे असतात. हे दोन्ही क्षारयुक्त धातू पृथ्वीवर आढळतात. दोघांच्या बाह्य आवरणात एक इलेक्ट्रॉन असतो. हे दोन्ही धातू ऑक्साइड तयार करत नाहीत आणि यांच्या प्रतिक्रिया सारख्या असतात. लिथियमच्या तुलनेत सोडियम खूप स्वस्त आहे. त्यामुळे तुम्ही सोडियमला गरिबांचं लिथियम असं म्हणू शकता.` सोडियम बॅटरीबाबत विचार करायचा झाला तर लिथियमची बॅटरी सोडियम बॅटरीपेक्षा चांगली असल्याचं म्हटलं जातं; पण लिथियमला मागणी जास्त आणि साठे कमी आहेत. अशा परिस्थितीत सोडियम बॅटरी हा स्वस्त पर्याय ठरू शकतो. सुमारे दहा वर्षांपूर्वी लिथियमची किंमत 4500 डॉलर प्रतिटन होती; मात्र आज याची किंमत 80,000 डॉलर प्रतिटनापर्यंत पोहोचली आहे. दुसरीकडे लिथियमच्या तुलनेत सोडियमचे साठे शेकडो पट जास्त आहेत. किमतीचा विचार करायचा झाला तर सोडियम हायड्रॉक्साइडची किंमत 800 डॉलर प्रतिटनापेक्षा कमी आहे. याचा अर्थ सोडियम स्वस्त असून त्याचा पुरवठादेखील पुरेसा आहे. लिथियम जगात सर्वत्र उपलब्ध नाही; मात्र सोडियम सर्वत्र सहज उपलब्ध होऊ शकतं. खासकरून भारतातल्या किनारपट्टी भागात सोडियमचे मुबलक साठे आहेत. आज अनेक कंपन्यांनी सोडियम आयन बॅटरी तयार करण्यासाठी संशोधन सुरू केलं आहे. लिथियमच्या तुलनेत सोडियम आयन बॅटरी कमी प्रमाणात ऊर्जा साठवून ठेवू शकतात. म्हणजेच लिथियम आयन बॅटरीइतकी ऊर्जा मिळवण्यासाठी त्यापेक्षा खूप मोठी बॅटरी लागेल. लिथियम आयन बॅटरी हजारो वेळा चार्ज-डिस्चार्ज करता येते, तर सोडियम आयन बॅटरीमध्ये तेवढी क्षमता नाही. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने फेराडियन ही ब्रिटिश कंपनी खरेदी केली आहे. ‘आमच्या बॅटरीज प्रतिकिलो 160 वॅट/प्रतितास ऊर्जा स्टोअर करू शकतात,’ असा दावा फेराडियनने केला आहे. त्यामुळे अन्य कंपन्यादेखील या दिशेनं संशोधन वाढवत आहेत. भविष्यात सोडियम आयन बॅटरीचा पर्याय उपलब्ध झाला तर इलेक्ट्रिक कारच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ शकतात आणि प्रदूषणाचं प्रमाण, पेट्रोल, डिझेल, सीएनजीचा वापर कमी होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.