हरियाणा राज्यातील तरुणांमध्ये खूप टॅलेंट आहे. क्रीडा, शिक्षण, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये राज्यातील असंख्य अशा तरुणांनी आपल्या राज्याचे नाव देशात, जगात मोठे केले आहे. आता याच नावात आणखी एका तरुणाची भर पडली आहे. मोहित यादव असे या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो भिवानी येथील रहिवासी आहे.
मोहितने कमाल करुन दाखवली आहे. त्याने एक सॉफ्टवेअर बनवले आहे. असा दावा केला जात आहे की, त्याने बनवलेले हे सॉफ्टवेअर फक्त रस्ते अपघातच थांबवणार नाही तर 50 टक्के इंधन बचतही करेल. यामुळे लाखो लोकांचा जीव वाचवता येणार आहे.
भारतात दरवर्षी दीड लाखांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, 2021 मध्ये एकूण 412432 रस्ते अपघात झाले. यामध्ये 153972 लोकांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत हे सॉफ्टवेअर प्रभावी ठरले तर दररोज अनेकांचे प्राण वाचू शकतील असे म्हटले जात आहे.
मोहित म्हणाला की, अनेक वर्षांपूर्वी ट्रक-कारच्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला होता. हे दृश्य मी स्वत: माझ्या डोळ्यांनी पाहिले होते. यानंतर मी असे अपघात टाळण्यासाठी सॉफ्टवेअर बनवण्याचा विचार केला. दरम्यान, चंदीगड विद्यापीठातून बीटेकला असताना मोहितने त्यावर काम केले आणि शेवटच्या वर्षापर्यंत हे सॉफ्टवेअर बनवले.
मोहिते असे म्हणणे आहे की, ज्या गाडीत सॉफ्टवेअर असेल, त्या वाहनाचा अपघात होणार नाही. तसेच जर चालक नशेत असेल तर हे सॉफ्टवेअर त्या वाहनाचा सुरुच होऊ देणार नाही. सोबतच सॉफ्टवेअर वाहनात डिझेल आणि पेट्रोलला रिसायकल करुन 50 टक्के इंधन वाचवता येणार आहे.
मोहित म्हणाला की, हे सॉफ्टवेअर त्याने देशातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी बनवले आहे. त्याचे म्हणणे आहे की, टाटा मोटर्सने हे सॉफ्टवेअर विकत घेण्यासाठी 50 कोटी रुपये देऊ केले, पण त्याने ते विकले नाही. हे सॉफ्टवेअर त्याला सनसामांन्यांच्या हितासाठी सरकारला द्यायची इच्छा आहे, जेणेकरुन सरकारने प्रत्येक वाहनात ते अनिवार्य करावे आणि नागरिकांचा जीव वाचवता येईल.
एका कार्यक्रमात त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर त्यांच्या सॉफ्टवेअरचे लाईव्ह प्रेझेंटेशन दिले होते, असेही त्याने सांगितले. त्यानंतर नितीन गडकरींनी त्याचे कौतुक केले आणि आपणही याबद्दल ऐकले असल्याचे सांगितले होते, असे तो म्हणाला. याबाबत संपूर्ण माहिती घेण्यासाठी नितीन गडकरी यांनी ऑगस्टमध्ये त्याला दिल्लीला बोलावले असल्याचेही त्याने सांगितले.
तर मोहितचे वडील अनिल यादव म्हणाले की, मुलाची कामगिरी पाहून आनंद होते. परीक्षेत जास्त गुण मिळवण्यासाठी मुलांवर आई-वडिलांनी कधीच दबाव आणू नये. मात्र, आपल्या मुलांमधील गुण ओळखून त्यांना त्यानुसार पुढे जायला मदत करावी, असे ते म्हणाले.