कुरनूल, 22 मार्च : इंधनाचे वाढते दर, वाढतं प्रदूषण आदी कारणांमुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे कल वाढत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन कंपन्यांनी खास फीचर्स असलेल्या स्कूटर आणि कार बाजारात लाँच केल्या आहेत. किमती काहीशा जास्त असल्या तरी अनेकांचा या वाहनांकडे कल वाढताना दिसत आहे.
टेस्लासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या ऑटोमोबाइल उद्योगाचं भविष्य मानल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी लाखो डॉलर्स खर्च करत असताना, आंध्र प्रदेशातल्या एका सर्वसामान्य माणसाने एक आश्चर्यकारक गोष्ट साध्य केली आहे. त्याने उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांचा वापर करत कार्यक्षम इलेक्ट्रिक वाहन तयार केलं आहे. या व्यक्तीचं नाव बीचुपल्ली असं असून, तो आंध्र प्रदेशातल्या कुरनूलमधल्या उंडवल्ली मंडलातल्या बोनकुरू गावाचा रहिवासी आहे. तो निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. तो रिक्षाचालक असून, यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
100 किमी अंतर धावू शकते -
बीचुपल्लीला लहानपणापासून कार खरेदी करायची खूप इच्छा होती. परंतु, कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने आपलं हे स्वप्न पूर्ण होईल की नाही, असा प्रश्न त्याला पडत असे. मात्र, स्वतःला जगासमोर सिद्ध करण्याचा निर्धार त्याच्या आर्थिक असहायतेवर मात करून पुढे गेला. त्याने सुरुवातीला डिझेल रिक्षाचं इलेक्ट्रिकल रिक्षात रूपांतर केलं आणि त्याचा हा प्रयोग यशस्वी झाला.
पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्यानंतर त्याचा उत्साह वाढला आणि त्याने बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक कार बनवली. या नवीन शोधामुळे बीचुपल्ली आता स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. त्याची ही 1,20,000 रुपयांत बनलेली इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जवर 100 किलोमीटर अंतर धावू शकते. त्यामुळे त्याच्या या नावीन्यपूर्ण शोधाची कहाणी सगळीकडे पसरली आहे.
भारतातील या भागात 24 तास जनतेची सेवा करणार 'राष्ट्रपती', नेमकं काय आहे प्रकरण?
नुकत्याच हैदराबादमध्ये झालेल्या कार्निव्हल कार्यक्रमात बीचुपल्लीने बनवलेली कार ठेवण्यात आली होती. ही कार बघण्यासाठी परिसरातल्या नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. ही इलेक्ट्रिक कार शेतीकामासाठी वापरली जाऊ शकते. चार्ज केल्यानंतर ती 100 किलोमीटरचा पल्ला गाठते आणि दुर्गम खेड्यांतल्या रस्त्यांवरही या कारने प्रवास शक्य आहे, असं बीचुपल्लीनं सांगितलं. हे वाहन पाच क्विंटलपर्यंतचं वजन वाहून नेऊ शकतं, असा दावा बीचुपल्लीनं केला आहे.
कोणतीही व्यक्ती प्रबळ इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयाच्या जोरावर अडचणींवर मात करून स्वप्न पूर्ण करू शकते, या उक्तीची आठवण बीचुपल्लीच्या प्रवासाकडे पाहून होते. बीचुपल्ली आता अनेकांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andhra pradesh, Autorickshaw driver, Electric vehicles, Local18, Vehicles