बीड, 9 जून : पहिल्याच पावसात बीड जिल्ह्यातील परळी-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गाच्या चालू कामाचा खेळ खंडोबा झाला आहे. परळी शहराजवळील कन्हेरवाडी येथे पुलाचे काम सुरू आहे. तात्पुरता वाहतुकीसाठी बनवलेला पुल पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. परळी तालुक्यात आज जोरदार पावसाने हजेरी लावताच परळी ते अंबाजोगाई मार्गावरील पुलच वाहून गेला. त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आता या मार्गावरून प्रवास करता येत नाही. आता वाहन धारकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक कोंडी निर्माण झाली असून दुसरीकडे पूल वाहून गेलेल्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती.
मोसमी पावसाला सुरुवात झाली असून आज दुपारी नंदागौळ परिसरात ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. या पावसाचे पाणी घाटातून शेतकऱ्यांच्या शेतात नदीला आल्याने हा पूल वाहून गेला आहे. यामुळे या राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहनाच्या जवळजवळ दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या. दरम्यान नंदागौळ कनेरवाडी घाट परिसरात असलेल्या शेतीचेही फार मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा-दुर्दैवी! विजेचा शॉक लागून खाली कोसळली पत्नी, पती उचलायला गेला आणि...
पाहिल्याच पावसात बीड जिल्ह्यातील परळी-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गाजवळील पूल वाहून गेल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्याचा व्हिडीओ.. pic.twitter.com/FxDe688VRc
— News18Lokmat (@News18lokmat) June 9, 2021
गेल्या अनेक वर्षांपासून परळी आंबेजोगाई रस्त्याचे काम रखडले आहे. या रखडलेल्या कामामुळे अपघात घडून अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळं पालकमंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्याकडे नागरिकांनी वारंवार रस्ता पूर्ण करा यासाठी निवेदन पत्र दिले आहेत, मात्र तीन वर्षे उलटूनही अद्याप हा रस्ता पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. आंबेजोगाई ऊन परळीला येत असताना मोठा वळसा घ्यावा लागत आहे. राजकीय दुर्लक्षामुळे हा रस्ता पूर्ण होत नाही असा आरोप देखील नागरिक करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.