लातूर, 28 एप्रिल: कोरोनाच्या (Corona) आजाराचा आज सर्वांनीच धसका घेतलाय. रुग्ण बरा होण्यासाठी मोठ्या खाजगी हॉस्पिटल्स (Private Hospital)कडे लाखो रुपये मोजून उपचार करण्याकडे प्रत्येकाचाच कल वाढतोय. मात्र लातूर जिल्ह्यातल्या औसा ग्रामीण रुग्णालयात (Ausa Rural Hospital Latur) डॉक्टर्स आणि स्टाफच्या परिश्रमामुळं गंभीर अवस्थेत असलेल्या १६ कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन (Remdesivir Injection) शिवाय उपलब्ध औषधांचा योग्य वापर करून कमीत कमी खर्चात रुग्णांना कोरोनमुक्त करण्यात आलं आहे.
लातूर जिल्ह्यात दररोज किमान दीड हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढत असताना आणि त्यात डॉक्टरांनी रेमाडेसिवीर इंजेक्शनचं प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्यावर नातेवाईकांना होणार त्रास, ऑक्सिजन, बेड यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतोय. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी 16 एप्रिलला ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड तयार करून कोविड रुग्णालय सुरू केलं. औसा इथं आजपर्यंत 40 अत्यवस्थ रुग्ण दाखल झाले, ज्यात अनेकांचा CT स्कॅनमध्ये काहींचा 20 पेक्षा जास्त स्कोअर होता. ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध औषधं आणि इंजेक्शन याचा योग्य वापर करून डॉक्टर आणि त्यांच्या टीमने आज 16 अत्यवस्थ रुग्ण कोरोनामुक्त केले आहे. इथं कोरोना वार्डात काम करताना सुरुवातीला भीती वाटत होती पण या कामात समाधान मिळत असल्याचे नर्सेस सांगतात आहेत . तर औषधांचा काटकसरीने आणि योग्य वापर केल्यानेच हे शक्य झालं असं डॉक्टर सांगतात.
वाचा: राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला!
रुग्णांची अवस्था बिकट असताना देखील डॉक्टरांनी कमी वेळात कसलाही अधिकचा खर्च लागू न देता रुग्णाला ठणठणीत बरं केल्याचं समाधान रुग्णांच्या नातेवाईकांना वाटतंय. एकीकडं गंभीर कोरोना रुग्णांवर उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतोय मात्र ग्रामीण भागातल्या लोकांना हा खर्च सहजासहजी परवडणारा नाही, त्यामुळं ग्रामीण रुग्णालयांनी ग्रामीण भागातल्या लोकांसमोर नवा आदर्श ठेवलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus